सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 7 ऑक्टोबर 2021 (22:38 IST)

पोलिसांची पायी गस्त, गुन्हेगारीवर असेल आता बारीक नजर

नाशिक पोलिसांनी पंचवटीमधील धार्मिकस्थळ आणि आठवडे बाजार, गोदाघाट, रामकुंड अश्या परिसरात पायी गस्त सुरू केली आहे. या गस्तीने टवाळखोरांवर डोळे ठेवता येणार आहे. तसेच रस्त्यावर घडणाऱ्या गुन्ह्यांवर देखील आळा बसणार आहे.
 
पंचवटी धार्मिकस्थळ म्हणून प्रसिद्ध असून देशभरातून भाविक गोदावरी दर्शन आणि रामकुंड येथे वेगवेगळ्या विधी व श्राद्ध करण्यासाठी येत असतात. गोदाघाटावर आलेल्या या भाविकांच्या वस्तू, पाकिट आणि लुटमारीचे प्रकार घडत असल्याच्या तक्रारी वरिष्ठ निरीक्षक डाॅ. सीताराम कोल्हे यांना प्राप्त झाल्या होत्या, या तक्रारींची दखल घेत पोलिस ठाण्यांंतर्गत असलेल्या पोलिस चौक्यांच्या अधिकाऱ्यांना पायी गस्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
 
सायंकाळी होणाऱ्या या गस्तीमुळे टवाळखोरांची पळापळ होत असून चौक, गल्ली, कट्ट्यांवर बसलेल्या टवाळखोरांना वेळप्रसंगी दंडुक्याचा प्रसाद दिला जात असल्याने या गस्तीचा प्रभाव वाढत आहे. सहायक आयुक्त मधुकर गावित यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक डाॅ. कोल्हे, अशोक भगत, गुन्हे शोधपथकाचे सहायक निरीक्षक सत्यवान पवार यांच्यासह अधिकारी व कर्मचारी नियमित गस्त करत आहे.