बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 2 नोव्हेंबर 2023 (21:49 IST)

अजगर, घोरपडी, पाली, सरडे चोरून नेले चोरून नेले ; नेमकं काय आहे प्रकरण?

चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. तर सोने -चांदीचे दागिने, पैसे चोरीच्या घटना तुम्ही दररोजच ऐकत असता. मात्र, मुंबईत चक्क एका प्राणी संग्रहालयातून प्राणीच चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
 
याबाबत आश्चर्य म्हणजे मोठे प्राणी तर सोडाच पाली सरडे पण चोरीला गेले आहेत. त्यामुळे मुंबई सध्या मगर, अजगर, पाली, सरड्यांवरून बरीच चर्चेत आहे. शिवाजी पार्क येथील मरीन एक्वा झूमधून ६ अजगरांसह दोन घोरपडी, एक पाल आणि एक सरडा चोरीला गेला आहे. चोरीला गेलेले सगळे प्राणी परदेशी प्रजातीचे असल्याची माहिती समोर आली आहे.
 
मरीन एक्वा झूमधील कथित अनधिकृत बांधकामावरती पालिकेने सोमवारी कारवाई करत बांधकामावर हातोडा चालवला होता. या कारवाईनंतर लगेचच एक्झॉटिक एनिमल चोरीला गेले आहेत. दरम्यान प्राणी संग्रहालयावरील कारवाईमागे राजकीय सूडबुद्धी असल्याचा आरोप प्राणी संग्रहालय प्रशासनाचा होता.  
 
प्राणी संग्रहालयाच्या शेजारी असलेल्या पालिकेच्या जलतरण तलावामध्ये मगरीचे पिल्लू सापडल्यानंतर हे प्राणी संग्रहालय चर्चेत आले होते.
 
दरम्यान प्राणी संग्रहालयाच्या विश्वस्तांच्या तक्रारीवर शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरी झालेल्या प्राण्यांची किंमत साडेचार लाख रुपयांच्या घरात असल्याचे सांगितले जात आहे.