गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 2 जून 2022 (21:36 IST)

औरंगाबाद शहरातील पाणीपुरवठ्याचा आढावा कारणे सांगत बसू नका, तातडीने मार्ग काढा; मुख्यमंत्र्यांचे कठोर निर्देश

uddhav thackeray
मला कारणे सांगत बसू नका, तातडीने मार्ग काढा. कोणत्याही परिस्थितीत औरंगाबाद शहरातील नागरिकांना व्यवस्थित पाणीपुरवठा झाला पाहिजे. याकरिता सध्याच्या पाणी वितरणात आणखी जादा पाणी कसे उपलब्ध होईल, यासाठी विभागीय आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून नागरिकांना योग्य रितीने पाणी मिळेल हे पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी आज दिले.
पाणी योजनेच्या कामात कंत्राटदाराने हलगर्जीपणा दाखविल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला. दरम्यान, औरंगाबाद शहराच्या १६८० कोटी रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना गतीने पूर्ण करण्यासाठी या योजनेचा मुख्यमंत्री संकल्प कक्षातून नियमितपणे आढावा घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्री ठाकरे यांनी  दिले.
 
औरंगाबाद शहर पाणीपुरवठा प्रकल्पाच्या कामाचा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी बैठकीत आढावा घेतला. या बैठकीत उद्धव ठाकरे म्हणाले, औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करणे हे प्राधान्याचे काम असून शहर पाणीपुरवठा योजनेचे काम निधीअभावी काम रेंगाळणार नाही, याची दक्षता शासनाने घेतली आहे.
 
शहराच्या पारोळ्यापर्यंत पाणी आणणे, ते साठविण्यासाठी टाक्या बांधणे ही कामे तातडीने करावी लागणार असून या योजनेचा काही भाग हा जायकवाडी प्रकल्पात असल्याने त्यासाठी केंद्रीय वन विभागाची परवानगी आवश्यक आहे. ही परवानगी मिळविण्यासाठी वन विभागाने तातडीने केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी दिल्या.
 
शहरात पाणीपुरवठ्याची नवीन योजना पूर्ण होईपर्यंत कालावधी लागणार असून कोणत्याही परिस्थितीत शहरात पाण्याअभावी परिस्थिती बिकट होणार नाही. यासाठी गतीने कार्यवाही करून विभागीय आयुक्तांनी सर्व आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले.
 
शहर पाणीपुरवठा प्रकल्पाचे काम कंत्राटदार संथ गतीने करीत असल्याच्या तक्रारी आहेत ही अतिशय गंभीर बाब असून त्यांनी कामाच्या बाबतीत हलगर्जीपणा दाखविल्यास विविध कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. वेळेत काम पूर्ण करुन घेण्यासाठी संबंधित कंत्राटदारांकडून हमीपत्र लिहून घेण्याबरोबरच कालबद्धरित्या काम पूर्ण होण्यासाठी वेळापत्रक तयार करा आणि मुख्यमंत्री संकल्प कक्षातून योजनेच्या कामाचा नियमित आढावा घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी दिल्या.