मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शुक्रवार, 7 जुलै 2023 (20:18 IST)

समृद्धी बस अपघात : त्या बसचालकाच्या रक्तात सापडले अल्कोहोल, फॉरेन्सिक तपासात उलगडा

buldhana bus accident
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरून प्रवास करत असलेल्या एका खासगी बसला 1 जुलैच्या पहाटे भीषण अपघात झाला होता. अपघातानंतर बसने पेट घेतल्याने 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेत आता गंभीर माहिती पुढे येत आहे.
 
बसचा ड्रायव्हर दानिश इस्माईल शेख याच्या रक्तात अल्कोहोलचं प्रमाण आढळून आल्याचं फॉरेन्सिक तपासात निष्पन्न झालं आहे.
 
बुलढाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांनी याबाबत माहिती दिली. या प्रकरणी माहिती दिली. दारू पिऊन गाडी चालवत असल्याचा गुन्हाही शेख याच्यावर दाखल होणार असल्याचं पाटील यांनी स्पष्ट केलं.
 
समृद्धी महामार्गावर गेल्या काही महिन्यांपासून अपघातांचं सत्र सुरूच आहे. यातला सगळ्यांत मोठा अपघात 1 जुलैच्या पहाटे घडला.
 
यात 33 प्रवाशांनी भरलेली स्लीपर कोच बस नागपूरहून पुण्याच्या दिशेनं येत होती. दरम्यान, बुलडाण्यातील सिंदखेड राजाजवळ बसचं टायर फुटून ती चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेली. पुढे ती एका खांबाला जाऊन धडकली. यानंतर फरपटत एका छोट्या पुलावर जाऊन आदळली.
या धडकेत बसच्या डिझेल टँकवर आघात होऊन तो फुटला. दरम्यान, ठिणग्याही उडाल्याने बसने पेट घेतला. या आगीतच 25 प्रवाशांना दुर्दैवाने प्राण गमवावे लागले.
 
या अपघातात वाचलेल्या 8 प्रवाशांनी काच फोडून कसाबसा बाहेर प्रवेश मिळवल्याने त्यांना आपले प्राण वाचवता आले. यातल्या मृतांचे मृतदेहांवर प्रशासनानेच सामूहिक अंत्यसंस्कार केले.
 
या घटनेचा बुलढाणा पोलीस सविस्तर तपास करतायत. यात ड्रायव्हर शेख याने सुरुवातीला बसचा टायर फुटून हा अपघात झाल्याचं सांगितलं होतं. मात्र, आता पोलीस तपासात वेगळंच कारण पुढे आलंय.
 
बुलढाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरावतीच्या फॉरेन्सिक लॅबमधून ड्रायव्हरच्या ब्लड सँपलचा अहवाल प्राप्त झाला आहे.
 
त्यात 0.30 टक्के अल्कोहोल त्यांच्या रक्तात अल्कोहोल आढळला आहे. अपघाताची घटना रात्री 1.30 वाजताची आहे आणि ब्लड सँपल सकाळी घेतलं होतं. दारू प्यायल्यानंतर बराच कालावधी यात निघून गेला होता. त्यामुळं शरीरातील अल्कोहोलचे प्रमाण कमी कमी होत गेलं आहे, असं पोलिसांनी सांगितलं.
 
त्यांच्या मते, दारू प्यायल्यानंतर लगेच सँपल घेतलं तर जास्त येतं. परंतु या घटनेत दारू पिऊन 12 तासांचा अवधी उलटून गेला होता. तरीही त्याचा दारू प्यायल्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अपघाताला हे सुद्धा एक कारण आहे. अधिक चौकशी सुरू आहे त्यानंतर अनेक बाबी स्पष्ट होतील. दारू पिऊन गाडी चालवत असल्याचा गुन्हाही त्याच्यावर दाखल होणार आहे.
Published By- Priya Dixit