मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 23 फेब्रुवारी 2023 (21:29 IST)

भावी मुख्यमंत्री आशयाचे पोस्टर लावण्याचा सिलसिला अजूनही सुरु, लवकरच पोलीस तपास करणार

supriya sule
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयासमोर भावी मुख्यमंत्री या आशयाचे नेत्यांचे पोस्टर लावण्याचा सिलसिला अजूनही सुरु असून जयंत पाटील, अजित पवार यांच्यानंतर सुप्रिया सुळे यांच्या नावाचे बॅनर झळकले.
 
आधी जयंत पाटील यांचा भावी मुख्यमंत्री असा पोस्टर लावण्यात आले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसाच्या दिवशी 16 फ्रेब्रुवारी रोजी मुंबईतील नेपियन्स रोड परिसरात महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असे जयंत पाटील यांचे पोस्टर लावण्यात आले होते. महत्त्वाची बाब म्हणजे हे पोस्टर कुणी लावले, त्या कार्यकर्त्याचे नाव देखील खाली लिहिण्यात आले होते.
 
त्यानंतर अजित पवार यांचा भावी मुख्यमंत्री असा पोस्टर लावण्यात आले .राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील कार्यालयाबाहेर अजित दादा भावी मुख्यमंत्री असे होर्डिंग लावले आहेत. “महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री.., एकच दादा, एकच वादा, अजित दादा..” अशा आशयाचा मजकूर या होर्डिंगवर लिहिलेला आहे. मुंबई राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर अजित पवार भावी मुख्यमंत्री अशी पोस्टरबाजी केली आहे. यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
 
काय म्हणाले अजित पवार…..
काही उत्साही कार्यकर्त्यांनी मी मुख्यमंत्री व्हावं म्हणून बॅनर लावले, पण १४५ आमदारांच्या पाठिंब्याशिवाय मुख्यमंत्री होता येत नाही, असं अजित पवार म्हणाले. असे पोस्टर लागले असतील तर त्याला मनावर घेऊ नका, फार महत्त्व देऊ नका. उद्या जर मी तुमचं होर्डिंग लावलं, तरी १४५ आमदारांचा पाठिंबा मिळत नाही तोपर्यंत त्या होर्डिंग लावण्याला काहीही अर्थ नाही. हे फक्त कार्यकर्त्याचं वैयक्तिक समाधान असतं, असं उत्तर अजित पवारांनी दिलं.
 
आधी जयंत पाटील त्यानंतर अजित पवार आणि आता पहिल्या महिला मुख्यमंत्री असा सुप्रिया सुळे यांचा पोस्टर झळकला.यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे
या संपूर्ण प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी संवाद साधला असता या प्रकरणी माहिती घेण्यात येत असून विरोधी पक्षाचं तर हे काम नाही ना अशी शंका मनात येत असल्याची प्रतिक्रिया देण्यात आली आहे. शिवाय लवकरच पोलीस तपासात हे कृत्य कुणाचं आहे आणि त्यांचा उद्देश काय आहे हे देखील उघड होईल असं ही सांगण्यात आलं आहे.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor