रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 ऑगस्ट 2023 (08:09 IST)

शरद पवार की अजित पवार , नवाब मलिक कोणासोबत जाणार? अखेर मलिकांनी स्पष्ट केली भूमिका

nawab malik
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर गट वाढवण्यावर भर दिला जात आहे. राज्यातील संघटन मजबूत करण्यासाठी शरद पवार आणि अजित पवार गटातील नेते पक्षातील नेत्यांना आपल्या गटात घेण्यासाठी भेटीगाठी घेताहेत. याचं ताजं उदाहरण म्हणजे बुधवारी (16 ऑगस्ट) दोन्ही गटातील नेत्यांनी महाराष्ट्राचे माजी मंत्री नवाब मलिक यांची घेतलेली भेट. त्यामुळे सध्या मलिकांच्या राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते नवाब मलिक यांची नुकतीच जामिनावर सुटका झाली आहे. त्यामुळं आता ते कोणत्या गटात सामिल होणार यावरुन तर्कवितर्क लढवले जात होते. पण आता त्यांनीच स्वतः आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एक वृत्त संस्थेने याबाबत वृत्त दिलं आहे.
 
न्यायालयीन कोठडीत असताना नवाब मलिकांवर किडनीच्या आजारामुळं रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांची प्रकृती ढासाळत असल्यानं वैद्यकीय कारणासाठी सुप्रीम कोर्टानं त्यांना दोन महिन्यांचा जामीन मंजूर केला आहे. जामिनानंतर तीन दिवसांनी मलिकांना मुंबईच्या सिटी केअर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे या अनेक तास रुग्णालयाबाहेर उपस्थित होत्या.
 
दरम्यान, अजित पवार गटाचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी देखील स्वतः मलिक यांना फोन करुन त्यांची विचारपूस केली होती. तर शरद पवारांसोबत असलेले अनिल देशमुख यांनी त्यांच्या भेटीनंतर प्रतिक्रिया दिली होती. “अजूनही ते आमचे वरिष्ठ सहकारी आहेत. ते लवकर बरे होतील याची मला खात्री आहे, असं देशमुख म्हणाले होते.
 
तसेच अजित पवारांनी देखील मलिकांना फोन करुन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. पण यावेळी आमच्यात कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं अजितदादांनी म्हटलं होतं. तसेच शरद पवारांनी देखील मलिकांची फोनवरुन विचारपूस केली होती.
 
दरम्यान, एका वृत्त संस्थेशी बोलताना मलिक म्हणाले की, “मी कुठल्याही गटात जाणार नाही. मी मूळ राष्ट्रवादीसोबत असणार आहे” तसेच मलिकांची कन्या निलोफर मलिक यांनी म्हटलं की, “माझ्या वडिलांसाठी सर्वात प्राधान्याचं काम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष केंद्रीत करणं असेल. त्यांना आम्ही उत्तम वैद्यकीय सुविधा पुरवू तसेच त्यांना पुन्हा कामासाठी तयार करु”
 
दरम्यान खरी राष्ट्रवादी आमचीच असल्याचा दावा शरद पवार समर्थक नेते करत आहेत. तसेच अजित पवार गटातूनही असेच बोलले जात आहे. मात्र, असे असले हे तरी प्रकरण केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कोर्टात गेले आहे.

Edited By- Ratnadeep Ranshoor