फेरीवाल्यांकडून शिवसेना खंडणी वसूल करत त्यांना पावत्या देते, संदीप देशपांडे यांनी सादर केले पुरावे
शिवसेनेला विरप्पनची उपमा देणारे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत शिवसेना खंडणीखोर असल्याचा आरोप केला आहे. याबाबतचे पुरावे देखील संदीप देशपांडे यांनी सादर केले आहेत. फेरीवाल्यांकडून शिवसेना खंडणी वसूल करत त्यांना पावत्या देते, असा आरोप करत संदीप देशपांडे यांनी त्या पावत्या देखील सादर केल्या. शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा फोटो पावतीवर छापून फेरीवाल्यांकडून खंडणी वसूल केली जात आहे, असं संदीप देशपांडे यांनी सांगितलं. दरम्यान, याबाबत मुंबई पोलिसांना भेटून सविस्तर तक्रार देणार असल्याचं देखील देशपांडे यांनी सांगितलं.
काही दिवसांपूर्वी संदीप देशपांडे यांनी ट्विट करत शिवसेनेला विरप्पन गँगची उपमा देत खंडणी वसून करत असल्याचा आरोप केला. दरम्यान, आज याबाबतचे पुरावे सादर केले. संदीप देशपांडे यांनी काही पावत्या सादर केल्या. “आम्हाला पैसे द्या. पालिकेचे कर्मचारी तुमच्या स्टॉलला हात लावणार नाहीत. पोलिसांना आम्ही मॅनेज करु, असं शिवसेना फेरीवाल्यांना सांगतेय,” असा घणाघात संदीप देशपांडे यांनी केला आहे. मला सगळ्यात जास्त दु:ख याचं वाटतंय की या पावतीवर बाळासाहेबांचा फोटो आहे. या खंडणीखोरांना चाप बसला पाहिजे. महानगरपालिकेचे कर्मचारी या खंडणी प्रकरणात सामिल आहेत का? याची उच्चपदस्थ चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी देखील संदीप देशपांडे यांनी केली आहे. या खंडणीखोरांच्या हातून मुंबई वाचवणम गरजेचं असून चंबळखोरांचं राज्य मुंबईत आलंय की काय? असा प्रश्न मला कधीकधी पडतो, असं संदीप देशपांडे म्हणाले.