शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 9 ऑक्टोबर 2022 (17:22 IST)

शिवसेना-धनुष्यबाण चिन्हं वाद: 'आमचं बाळासाहेबांवर प्रेम आहे, म्हणून आम्हाला धनुष्यबाण पाहिजे'- दीपक केसरकर

Deepak Vasant Kesarkar
"धनुष्यबाणावर आमचाच अधिकार आहे. आम्ही रडत राहत नाही, लढत राहतो आणि तोच खरा शिवसैनिक. आमचं बाळासाहेबांवर प्रेम आहे, म्हणून आम्हाला धनुष्यबाण चिन्ह हवं आहे," असं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले. "आमच्यावर अन्याय झालाय. विचारांपासून तुम्ही लांब गेलात, आम्ही नाही, म्हणून ही वेळ आली. आम्ही प्रतिज्ञापत्रं कधी दिली याचा तपशील आहे. जे जे आवश्यक आहे ते आम्ही दिलं आहे. आमच्याकडे काही शिल्लक नाही.
 
त्यांची बाजू खोटी आहे. चिन्ह आमचं आहे, ते गोठल्याचं दु:ख आम्हाला आहे. पर्यायी चिन्हासाठी त्यांची पत्रं गेली आहेत. आमचा दावा धनुष्यबाणासाठीच आहे. आम्हाला हे चिन्ह मिळायला हवं. आम्ही निवडणूक आयोगाकडे आमची भूमिका मांडणार आहोत", असं ते म्हणाले.
 
त्यांनी पुढे सांगितलं, "भारत ही सगळ्यात मोठी लोकशाही आहे. ही लोकशाही शाबूत राखण्याचं काम निवडणूक आयोगाने केलं आहे. भारतातल्या निवडणुकांची जग दखल घेतं. हरलो की घटनात्मक संस्थांची भूमिका चुकीची असं म्हटलं जातं. हे चूक आहे".
 
"लोक कोणाला निवडून आणतात ही लोकशाही आहे. लोकांनी युतीला निवडून दिलं होतं. त्यांना बाजूला ठेऊन दुसऱ्याच लोकांना घेऊन सरकार स्थापन होत असेल तर युतीचा अपमान आहे. लोकांचं मत डावललं जातं त्याला लोकशाहीची हत्या म्हटलं जातं.
 
चिन्ह गेलं म्हणून लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न. बाळासाहेबांनी सहानुभूतीचा आधार घेतला नाही. आम्ही बाळासाहेबांना मानतो. कामाने लोकांना जिंकायला लागतं. बाळासाहेबांना जसं काम अपेक्षित होतं तसं एकनाथ शिंदे गट करत आहे. असा राजकारणी दाखवा ज्याने 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण केलं आहे", असं ते म्हणाले.
 
"चिन्ह गेल्यावर बाळासाहेबांचं नाव लावणार असा दावा केला जातोय. इतक्या वर्षात नाव लावावं असं का वाटलं नाही. हिंदुत्वाचा ज्यांनी अपमान केला, हिंदू देवतांना ज्यांनी शिव्या दिल्या त्या लोकांना तुम्ही व्यासपीठावर स्थान दिलंत", अशी टीका केसरकर यांनी केली.

निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून प्रतिक्रिया दिली आहे.
 
इन्स्टा पोस्टमध्ये उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंसोबतचा फोटो पोस्ट करत लिहिलं की, "जिंकून दाखवणारच."
युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत म्हटलंय की, "खोकेवाल्या गद्दारांनी आज शिवसेना नाव आणि चिन्ह गोठवण्याचा नीच आणि निर्लज्ज प्रकार केला आहे. महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही. लढणार आणि जिंकणारच! आम्ही सत्याच्या बाजूने! सत्यमेव जयते!"
 
"निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय आम्हाला स्वीकारावा लागेल. दोन्ही बाजूंनी चिन्ह मिळवण्याचे प्रयत्न झाले. पण आयोगाचा निर्णय स्वीकारणं आम्हाला बंधनकारक आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक बैठक घेऊन आम्ही आमची पुढची रणनीती ठरवणार आहोत," असं शिंदे गटाचे प्रवक्ते भरत गोगावले म्हणाले.
 
तुम्ही बाळासाहेबांचा कोणता विचार पुढे घेऊन जाणार? - भास्कर जाधव
हा निर्णय सर्वांना धक्का देणारा आहे. लोकशाहीचे भविष्य काय हा प्रश्न निर्माण करणारा आहे. संसदीय लोकशाही प्रणाली आहे की नाही? इंदिरा गांधींनी जाहीरपणे आणीबाणी लावली होती. पण देशात आता अघोषित आणीबाणी केलीय, असं मत आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केलं आहे.
 
ते पुढे म्हणाले, "मी मागेही म्हटलं होतं की, शिवसेनेबाबत जो निर्णय होईल, तो केवळ शिवसेनेवर आघात करणारा नसेल, तर लोकशाहीवर आघात करणारा असेल. माझे ते शब्द खरे ठरले आहेत.
 
"ज्या पक्षासोबत 25 वर्षं युती केली तो पक्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यावर पेढे वाटत होता. ज्या चिन्हावर तुम्ही आमदार-खासदार म्हणून निवडून आला, तेच चिन्ह गोठवलं. शिवसेना हा शब्द गोठवला. आता तुम्ही बाळासाहेबांचा कोणता विचार पुढे घेऊन जाणार आहेत, हा माझा एकनाथ शिंदेंना प्रश्न आहे."
 
उद्धव ठाकरे निर्णय घेतील- अनिल देसाई
"निवडणूक आयोगाचा निर्णय अनाकलनीय आहे. सोमवारी दोन्ही पक्षांना बोलावून बैठक होईल अशी अपेक्षा होती, पण आयोगाने आधीच दिलेला निर्णय अनपेक्षित होता," असं मत खासदार अनिल देसाई यांनी व्यक्त केलं आहे.
"फ्री सिम्बॉल बाबत उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीत चर्चा होईल आणि मग निर्णय घेऊन आयोगाला ते सादर करू," असंही देसाई म्हणाले.
 
आज दोन्ही गटाच्या बैठका
निवडणूका आयोगाच्या निकालानंतर पक्षाच्या नावावर चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक खासदार-आमदारांची आज संध्याकाळी सायंकाळी बैठक आयोजित केली आहे.
 
निवडणूक आयोगाचा निकाल काय?
शिवसेनेचं 'धनुष्यबाण' हे चिन्ह निवडणूक आयोगानं 8 ऑक्टोबर रोजी गोठवलं आहे. उद्धव ठाकरे तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला अंधेरी-पूर्व निवडणुकीत हे चिन्ह वापरता येणार नाही, असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं.
 
अंधेरी पोटनिवडणूक 3 नोव्हेंबर रोजी होणार आहे. अर्थात, हा निर्णय केवळ पोटनिवडणुकीपुरता नसून चिन्हाबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत लागू राहील.
 
'शिवसेना' पक्षाचे नाव देखील या दोन्ही गटांना वापरता येणार नाही. नव्या चिन्हासाठी सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत आयोगाला पर्याय देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
 
शिवसेना कुणाची या वादाबाबत सुनावणी निवडणूक आयोगात सुरू असल्याने आगामी निवडणुकीत कोणताच पक्ष किंवा गट या चिन्हाचा वापर करू शकणार नाही.
 

Published By- Priya Dixit