मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 29 ऑगस्ट 2022 (21:27 IST)

परवानगी मिळो अथवा न मिळो शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार

uddhav
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला अद्याप प्रशासनाकडून परवानगी मिळालेली नाही. पण यामुळं राज्यामधील राजकारण मात्र चांगलंच तापलं आहे. हा सोहळा शिंदे गटाकडून हायजॅक करण्यात येणार असल्याच्याही चर्चा सर्वत्र सुरु आहे. यापार्श्वभूमीवर परवानगी मिळो अथवा न मिळो शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार, अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे.
 
दरम्यान, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर गणेशोत्सवानंतरच निर्णय घेण्यात येईल याबाबतची माहिती पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी दिली आहे. शिवसेनेनं दसरा मेळाव्यासाठी शिवाजीपार्कमधील परवानगीसाठी दोनदा परवानगीसाठी पत्र दिलं पण अद्यापही महापालिकेनं याबाबत निर्णय स्थगित ठेवला आहे. सध्या सर्व स्टाफ गणेशोत्सवाच्या तयारीत व्यस्त असल्यानं हा निर्णय प्रलंबित ठेवला असल्याचं पालिकेकडून सांगण्यात आलं आहे.
 
उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसैनिकांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दसऱ्याला शिवतीर्थावर येण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेनं अद्याप परवानगी दिलेली नाही हा तांत्रिक भाग असेल तो ते बघून घेतील. पण शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार आहे. या मुद्द्यावरुन शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये यावरुन कुठलेही मतभेद व्हावेत असा हेतू नाही. पण मेळावा घ्यायचाच असेल तर तो शिवतीर्थावरच व्हावा असं काही नाही. शेवटी दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा आहे. परंतू हा मेळावा स्वतः एकनाथ शिंदे यांनी घ्यावा की नाही याबाबत शिंदेच यावर योग्यवेळी सांगतील. पण सध्यातरी अशी काही चर्चा झालेली नाही. मी ज्यावेळी काही बोलतो तर मुख्यमंत्र्यांशी बोलल्यानंतरच बोलतो, त्यामुळं यावरुन वाद निर्माण करण्याचा त्यांचा काही हेतू नाही. असे ते म्हणाले.