शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 28 सप्टेंबर 2020 (17:03 IST)

५०-५० फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेने भाजपसोबत सरकार बनवावे ; आठवले

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मोठे वक्तव्य केले आहे. फडणवीस आणि राऊत यांच्या भेटीचा संदर्भ देत आठवले यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना, भाजपशी युती झाल्यास शिवसेनेला फायदा होईल, असे म्हटले आहे. ५०-५० फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेने भाजपसोबत सरकार बनवावं. शिवसेनेने भाजपसोबत रिपाईंला देखील सोबत घ्यावं, असे आठवले यांनी म्हटले आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
 
देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांची शनिवारी एका पंचतारांकित हॉटेलात बैठक झाली. सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीत राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याचे समजते.
 
दुसरीकडे फडणवीस - राऊत यांच्यातील बैठकीनंतर राष्ट्रवादी आणि विशेषतः काँग्रेस या शिवसेनेच्या मित्रपक्षात अस्वस्थता निर्माण झाली आहे. शिवसेनेबद्दल संशय व्यक्‍त होत आहे. काँग्रेसकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे आक्षेप नोंदवला गेला आणि त्यानंतरच पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, असे सांगितले जाते. वर्षा बंगल्यावर झालेल्या या भेटीत या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली.