शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 16 फेब्रुवारी 2022 (08:21 IST)

म्हणून राज्यातील सहा मीटर रीडिंग एजन्सी महावितरणकडून बडतर्फ

महावितरणने वीजग्राहकांकडील मीटरचे रीडिंग अचूक होण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यास सुरवात केली आहे. यामध्ये चुकीचे मीटर रीडिंग घेऊन महावितरणच्या महसुलाचे नुकसान करणाऱ्या तसेच वीजबिल दुरूस्तीसाठी ग्राहकांना नाहक त्रास, मनस्ताप देणार्‍या राज्यातील सहा मीटर रीडिंग एजन्सीना महावितरणकडून बडतर्फ करण्यात आले आहे.
 
पुणे जिल्ह्यातील २ तसेच औरंगाबाद, वसई, नांदेड व अकोला येथील प्रत्येकी एक अशा सहा मीटर रीडिंग एजन्सीविरुद्ध गेल्या चार दिवसांमध्ये थेट बडतर्फीची कारवाई करण्यात आली असून काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया देखील सुरु करण्यात आली आहे.
 
उर्जामंत्री नितीन राऊत यांनी कोणत्याही परिस्थितीत प्रत्येक वीजमीटरचे रीडिंग १०० टक्के अचूक झालेच पाहिजे असे निर्देश दिले होते.त्यानुषंगाने महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी १ फेब्रुवारीला राज्यभरातील मीटर रीडिंग एजन्सीसोबत व्हीडीओ कॉन्फरसिंगद्वारे थेट संवाद साधला होता. चुकीच्या वीजबिलांमुळे ग्राहकांना होणारा मनस्ताप व महावितरणच्या महसूलाचे नुकसान अजिबात सहन केले जाणार नाही. मीटरचे अचूक रीडिंग घेण्यात हयगय करणाऱ्या मीटर रीडिंग एजन्सी विरुद्ध महसूलाचे नुकसान केल्याप्रकरणी फौजदारी कारवाई सोबतच एजन्सी व संबंधित कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी काळ्या यादीत टाकण्याची कठोर कारवाई करण्यात येईल असा निर्वाणीचा इशारा देण्यात आला होता.