सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 11 मे 2023 (07:43 IST)

राज्य सरकारची मोठी घोषणा: जालना नगरपालिकेचं महापालिकेत रुपांतर

jalna jilaparishad
जालना: गेल्या अनेक वर्षांपासून जालना नगरपालिकांचे रूपांतर महानगरपालिकेत करावी अशी मागणी काही पक्षाकडून केली जात होती. दरम्यान, जालनाकरांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. जालना नगरपालिकेचं महापालिकेत रुपांतर करण्यात आलं आहे. जालना नगरपालिकेचे रुपांतर आता महापालिकेत होणार असून तशी घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे जालना आता राज्यातील 29 वी महापालिका घोषित करण्यात आली असून, सरकारने तसे आदेश काढले आहेत.
 
दरम्यान याबाबत नगरविकास विभागाच्या उपसचिवांनी अधिसूचना जारी केली आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून जालना नगरपालिकेचे रुपांतर महानगरपालिकेत करण्यासंदर्भात राजकीय हालचाली सुरू होत्या. यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडून प्रस्ताव मागवण्यात आला होता. त्यामुळे हा निर्णय शासनाच्या विचाराधीन होता. यासाठी सूचना आणि हरकती देखील मागवण्यात आल्या होत्या. त्यानंतर अखेर सरकारने जालना नगरपालिकेचे रुपांतर आता महापालिकेत करण्याचे आदेश काढले आहे.
 
राज्य शासनाच्या वतीने जालना महानगरपालिकेची घोषणा करण्यात आली आहे. जालन्याची स्टील इंडस्ट्रीज म्हणून ओळख आहे. तर मोसंबी उत्पादक जिल्हा म्हणून देखील जालना शहराची राज्यभरात ओळख आहे. त्यात वाढती लोकसंख्या पाहता आणि शहराच्या विकासाच्या दृष्टीने जालना महानगरपालिका घोषित करावी यासाठी अनेक वर्षे मागणी सुरू होती. दरम्यान आता या पाठपुराव्याला मोठं यश आलं आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor