गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: पुणे , शुक्रवार, 17 डिसेंबर 2021 (21:22 IST)

टीईटी परीक्षा गैरव्यवहार; तुकाराम सुपेंसह २ जणांना अटक, ८९ लाखांची रोकड जप्त

आरोग्य भरती आणि म्हाडा पेपर फुटीचे प्रकरण हाताळत असताना शिक्षक पात्रता परिक्षेत म्हणजेच टीईटीच्या परिक्षेत गैरव्यवहार होत असल्याचे समोर आले. याप्रकरणी पुणे पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे आणि अभिषेक सावरीकर यांना अटक करण्यात आली आहे. यासंदर्भात पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आज पत्रकार परिषद घेऊन धक्कादायक खुलासे केले. याप्रकरणातील आरोपींकडून ८९ लाख रुपयांची रोख ताब्यात घेतली आहे. तसेच या प्रकरणात बऱ्याच लिंक असून आणखीन काही जणांना अटक करण्यात येणार आहे, असे पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता म्हणाले.
 
सुरुवातीला आम्ही दोन पेपर फुटीचे प्रकरण हाताळत होतो. आरोग्य भरतीच्या परीक्षांचा तपास सुरू होता. त्याचा तपास करताना म्हाडाच्या परीक्षेची लिंक लागली आणि परीक्षा होण्यापूर्वी आम्ही आदल्या रात्री सर्वांना अटक केली. या प्रकरणाचा तपास करत असतानाच टीईटीच्या परीक्षेत गोंधळ असल्याचे समोर आले. यावेळी टीईटीच्या परीक्षेत गैरव्यवहार सुरू होता. त्यानुसार दोन जणांना अटक केली आहे. सुपे यांच्यासोबत आणखीन एकाला अटक केली आहे. या आरोपींना कोर्टासमोर हजर केले जाणार आहे. सध्या पुढील तपास सुरू आहे, असे पुणे पोलीस आयुक्तांनी सांगितले.
 
महाटीईटी परीक्षेची जाहिरात २०१९ मध्ये देण्यात आली होती. त्यानंतर याची परीक्षा जानेवारी २०२० मध्ये झाली होती. त्या शिक्षक पात्रता परीक्षेत पैसे घेऊन उत्तीर्ण केल्याचा ठपका तुकाराम सुपे यांच्यावर आहे. प्राथमिक अंदाजानुसार, आरोपी ३५ हजार ते १ लाखापर्यंत घ्यायचे. जवळपास साडे चार कोटी घेतल्यांचा अंदाज आहे. दरम्यान परीक्षेनुसार हे आरोपी पैसे घेत होते. आता आरोपींकडून ८९ लाख रुपये जप्त केले आहेत. तसेच काही सोनं आणि एफडी सापडले आहेत. याप्रकरणातील पुढील तपास सुरू आहे, असे अमिताभ गुप्ता म्हणाले.
 
म्हाडाच्या परीक्षेसंदर्भात प्रीतीश देशमुख यांच्या घरी केलेल्या छापेमारीत २०२० च्या टीईटी परीक्षेचे सुमारे ४० ते ५० विद्यार्थ्यांचे ओळखपत्र सापडले होते. यामुळं टीईटी परीक्षेसंदर्भात चौकशी सुरु करण्यात आली होती. तुकाराम सुपे याने १ कोटी ७० लाख, प्रीतिश देशमुख याने १ कोटी २५ कोटी, तर अभिषेक सावरीकर याने १ कोटी २५ लाख असे एकूण ४ कोटी २० लाख रुपये घेतल्याचं चौकशीत कबुल केलं आहे. त्यापैकी ९० लाख रुपये जप्त करण्यात आलेत. यात आणखी आरोपी आहेत, ही लिंक वाढत जाणार असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.
 
दोषींवर कठोर कारवाई करणार; वर्षा गायकवाड यांचा इशारा
राज्यातील विविध परीक्षांच्या पेपरफुटीचे रॅकेट सुरुच असून त्यामुळे प्रामाणिकपणे तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होतोय. आरोग्य विभाग, म्हाडा आणि आता टीईटी या परीक्षेचा पेपर फुटल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे. टीईटी परीक्षेच्या पेपर फुटीसंदर्भात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिला आहे.