सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 18 सप्टेंबर 2021 (08:02 IST)

वीज बील ऑनलाईन भरणाऱ्या वीज ग्राहकांसाठी प्रथमच ‘लकी ड्रॉ’ संकल्पना

बेस्ट उपक्रमाने ऑनलाईन वीज बील भरणा पद्धतीला चालना देण्यासाठी व वीज बीलाची जास्तीत जास्त वसुली होण्याच्या अनुषंगाने वीज बील ऑनलाईन भरणाऱ्या वीज ग्राहकांसाठी प्रथमच ‘लकी ड्रॉ’ संकल्पना राबवली. या ‘लकी ड्रॉ’ ची सोडत बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांच्या हस्ते कुलाबा डेपोत काढण्यात आली. त्यामध्ये ९ वीज ग्राहकांना घरबसल्या फ्रीज,वॉशिंग मशीन, स्मार्ट मोबाईल, फूड प्रोसेसर, मिक्सर ग्रायंडर, डिनर सेट अशा भन्नाट बक्षिसांची लॉटरी लागली आहे.
 
बेस्ट उपक्रमाने राबवलेल्या या लकी ड्रॉ पद्धतीला चांगला प्रतिसाद लाभला आहे. या पहिल्याच ‘लकी ड्रॉ’ची पालिका कार्यालये, बेस्ट उपक्रम आदी ठिकाणी चांगलीच चर्चा रंगली आहे. बेस्ट उपक्रमाच्या वीज विभागाने, ऑनलाईन वीज बील भरणाऱ्या शहर हद्दीतील प्रभाग ‘ए’ ते एफ/ उत्तर अशा ९ प्रभागातून सुरेश पुरी, भिकू सेवरा, रेखा म्हात्रे, एफ. जे. परडीवाला, फर्नांडीस रोमिओ, बाबासाहेब पाटील, उमा केळुस्कर, संध्याकिरण गुरव आणि सुंदरी वेंकट अशा ९ वीज ग्राहकांची विजेते म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांना फ्रीज,वॉशिंग मशीन, स्मार्ट मोबाईल, फूड प्रोसेसर, मिक्सर ग्रायंडर, डिनर सेट अशा महागड्या वस्तूंची लॉटरी लागली आहे.