मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 24 मार्च 2020 (09:49 IST)

सोशल मीडियावर वृत्तपत्रांसंदर्भात फिरणारा 'तो' संदेश खोटा, गुन्हा दाखल

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या अनुषंगाने वृत्तपत्रांबाबत व्हॉटसॲपवरून खोटा संदेश पसरविणा-याविरुध्द जिल्हा माहिती अधिकारी यांच्या तक्रारीवरून यवतमाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८ नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी दिली.
 
जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर यांना व्हॉट्सॲप ग्रुपवर ‘जिल्हाधिकारी यांच्या सुचना’ या अंतर्गत खोटा मॅसेज निदर्शनास आला. शिवाय या मॅसेजच्या खाली जिल्हा माहिती कार्यालय असे लिहिलेले आढळले. ही बाब जिल्हा माहिती अधिका-यांनी जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून यात वृत्तपत्रासंदर्भात खोटी माहिती असल्याचे प्रशासनाला सांगितले. यावर तात्काळ कार्यवाही करून पोलिस स्टेशमध्ये तक्रार नोंदवा, असे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले. त्यानुसार या संदर्भात शहर पोलिस स्टेशमध्ये अज्ञात व्यक्तींविरुद्ध तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वृत्तपत्रे स्वयंचलित मशीनवर तयार केली जातात. कोणत्याही मॅन्युअल टचशिवाय तसेच  ग्लोव्हज आणि फेसमास्क घातलेल्या हँडलरद्वारे वर्तमानपत्रांच्या छापील गठ्ठे वाहून नेले जातात.  वाचकांच्या घरी पाठवण्यापूर्वी वृत्तपत्र डेपोमध्ये हायजीन प्रोटोकॉलचे अनुसरण केले जाते.  जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, घरांमध्ये वस्तूंच्या वितरणामध्ये दूषित होण्याचे प्रमाण अत्यंत कमी असते.  अग्रगण्य विषाणूशास्त्रज्ञांसह प्रख्यात डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, घरी वितरित केलेल्या वृत्तपत्रांचा संसर्ग होण्याचा धोका नाही.  कोरोना विषाणू संसर्गाबाबत जनजागृती करण्यासाठी तसेच आजारपणासंबंधीची सत्य माहिती लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी वृत्तपत्र हे विश्वासार्ह स्त्रोत आहे. त्यामुळे अफवा पसरविणा-या लोकांविरुध्द प्रशासनातर्फे कडक कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी एम. डी.सिंह यांनी सांगितले.