1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 19 ऑक्टोबर 2021 (16:07 IST)

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरला ७ डिसेंबरपासून प्रस्तावित

महाराष्ट्र विधिमंडळाचे यंदाचे तिसरे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे ७ डिसेंबरपासून  प्रस्तावित आहे. याबाबत तयारीचे नियोजन करण्यासाठी  सर्व संबंधित विभागांची उच्चस्तरीय बैठक विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. कोविडच्या पार्श्वभूमीवर या अधिवेशनासाठी विशेष प्रतिबंधात्मक तयारी करण्यात येणार आहे.  मुंबई येथे पुढील आठवड्यात विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार आहे. त्यादृष्टीने आजच्या बैठकीत अनुषंगिक तयारीसाठी सर्व विभागाने केलेल्या प्राथमिक तयारीचा आढावा घेण्यात आला. यंदाचे हिवाळी अधिवेशन कोरोना पार्श्वभूमीवर होत आहे. त्यामुळे त्यात सहभागी होणाऱ्या विधिमंडळ सदस्यांपासून तर कर्मचाऱ्यांपर्यंत लसीकरणाचे दोन डोस पूर्ण असणे अनिवार्य आहे.
 
त्यामुळे अधिवेशनासाठी येणाऱ्या प्रत्येकाला आपल्यासोबत दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र आणणे आवश्यक आहे. याशिवाय, दोन्ही डोस घेतल्यानंतरही या अधिवेशनादरम्यान प्रत्येकाला पुन्हा आरटीपीसीआर टेस्ट अनिवार्य असेल. त्यामुळे विधिमंडळ सदस्य, त्यांचे स्वीय सहायक, सर्व अधिकारी-कर्मचारी, वृत्तसंकलनासाठी येणारे माध्यम प्रतिनिधी, सुरक्षेसाठी तैनात पोलीस, राज्यभरातून येणारे वाहनचालक या सर्वांच्या आरटीपीसीआर टेस्ट अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पूर्ण करण्याची महत्त्वपूर्ण सूचना भागवत यांनी आरोग्य विभागाला केली. कोरोना पार्श्वभूमीवर मर्यादित प्रवेश राहील. त्यामुळे विधिमंडळ परिसरात  सभागृह सदस्यांच्या स्वीय सहायकांना प्रवेश दिला जाणार नाही. त्यांच्यासाठीची आवश्यक व्यवस्था परिसरात करण्यात यावी. याशिवाय सभागृहामध्ये ‘सोशल डिस्टंसिंग’  राखायचे असल्यामुळे सदस्यांना एक आसन सोडून बसण्याची व्यवस्था लक्षात घेता यावेळी अभ्यागतांना कामकाज बघण्यासाठी प्रवेश दिला जाणार नाही.
 
विधिमंडळ परिसरात नवीन इमारत कार्यान्वित झाली आहे. या  इमारतीसाठी आवश्यक असणारी सुरक्षा व्यवस्था व अनुषंगिक उपाययोजना करण्याची सूचना यावेळी करण्यात आली. यासोबतच विधान भवन, विधान भवनाबाहेर परिसर, आमदार निवास, रविभवन, १६० खोल्यांचे गाळे, सुयोग पत्रकार निवास या ठिकाणच्या सुरक्षा व्यवस्थेबाबतचे निर्देश देण्यात आले.