इंस्ट्राग्रामवर बनावट अकाऊंट तयार करुन तरुणीने केली तरुणाची बदनामी
तरुणी, महिला यांच्या नावाने Facebook, Instagram, सोशल मिडियावर बनावट अकाऊंट तयार करुन त्यांची बदनामी केली जात असल्याचे दिसून येते. मात्र, एका तरुणीने तरुणाच्या नावाचा व फोटोचा गैरवापर करुन बनावट अकाऊंट तयार करुन त्यांची बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी उंड्री येथे राहणार्या एका ३७ वर्षाच्या तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात (९२४/२१) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी बिबवेवाडी येथील एका तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २० ते २३ जूनमध्ये घडला होता.
आरोपी तरुणीने फिर्यादीच्या नावाचा व फोटोचा गैरवापर करुन इंस्ट्राग्राम या सोशल मिडियावर बनावट खाते तयार केले. त्यावरुन फिर्यादीच्या सोसायटीमधील एका महिलेला खासगी मेसेज केले. हे मेसेज फिर्यादीनेच केल्याचे त्याच्या सोसायटीमधील या महिलेला वाटले. हा प्रकार समजल्यावर फिर्यादीने आपली बदनामी केल्याची फिर्याद दिली आहे.