मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 14 जुलै 2020 (08:44 IST)

पक्क झालं, राज्यात अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार नाहीत

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांच्या मुद्द्यावर महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीनं राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. कोरोना व्हायरच्या पार्श्वभूमीवर मागील काही बैठकींमध्ये राज्यात अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर राज्य शासन ठाम असल्याचं सामंत यांनी स्पष्ट केलं.
 
आपत्ती व्यवस्थापन समितीशी झालेल्या महत्त्वाच्या चर्चेनंतर समितीच्या सल्ल्यानुसार राज्य शासन आपल्या निर्णयावर ठाम असल्याचं सांगत पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अखेरच्या वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यास नकार दिला. युजीसीकडून परीक्षा घेण्याचा अट्टहास असला तरीही कोरोनाचा वाढता संसर्ग आणि त्यामुळं उदभवणारा संभाव्य धोका पाहता आपण आपल्या निर्णयावर ठाम असल्याचं सामंत म्हणाले.
 
कोरोना परिस्थितीमुळं अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर सरकार ठाम असलं तरीही परीक्षा घेऊच शकत नाही अशा प्रकारचा कोणताही जीआर राज्य शासनाकडून जारी करण्यात आला नव्हता. शिवाय सरकारमधील कोणाही व्यक्तीनं अशा धर्तीवरील वक्तव्य केलं नसल्याचं सामंत यांनी यावेळी अधोरेखित केलं.