मंगळवार, 7 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated: बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (21:12 IST)

यंदाचा दसरा मेळावा प्रतिष्ठेचा, तयारी जोरात सुरु

uddhav thackeray
यंदाचा दसरा मेळावा प्रतिष्ठेचा होणार आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे संपूर्ण राज्याला दसरा मेळाव्यातून संबोधित करणार आहे. गटनेत्यांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी तुफान भाषण केले होते. त्यामुळे दसरा मेळाव्याला ते कोणता विषय छेडतात आणि शिंदे गट व भाजपावर निशाणा साधतात याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे. दरम्यान, यंदाचा मेळावा आजपर्यंत झाला नाही असा भरवण्याकरता पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. त्यासाठी शाळास्तरावरून नियोजन करण्यात आलं आहे.
 
यंदा  उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर तर, शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीच्या मैदानावर होणार आहे. या दोन्ही मैदानांवरून तुफान शाब्दिक फटकेबाजी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही गटांकडून दसरा मेळाव्याकरता जय्यत तयारी सुरू आहे.
 
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला तब्बल दीड लाखांपर्यंत शिवसैनिकांची गर्दी जमण्याची शक्यता आहे. विविध जिल्ह्यांतून येणाऱ्या शिवसैनिकांना शिवतीर्थावर पोहोचवण्याची जबाबदारी जिल्हाप्रमुखांवर सोपवण्यात आलीय. तसंच, मुंबईतील शिवसेनेच्या शाखाप्रमुखांकडून शिवसैनिकांचं स्वागत करण्याची जबाबदारी दिली आहे. तसंच, दादर, माहिम, प्रभादेवी परिसरात शिवसैनिकांच्या स्वागतासाठी विशेष गट उभारण्यात येणार आहेत. स्वागतासाठी राम गणेश गडकरी चौक, राजा बढे चौक, सावरकर मार्ग, सिद्धीविनायक मार्ग इथे गेट उभारले जाणार आहेत.
 
दसरा मेळाव्यातील भाषणात सर्वांचं लक्ष असतं. शिवाजी पार्कात प्रचंड गर्दी असते. त्यामुळे अनेकांना पार्कात प्रवेश मिळत नाही. अशा कार्यकर्त्यांना भाषण ऐकता यावं याकरता दादर आणि आजूबाजूच्या परिसरात स्क्रीन लावण्यात येणार आहेत.
 
दादर-शिवाजी पार्क संदर्भातील सर्व परवानग्या घेण्याची जबाबदारी विशाखा राऊत, महेश सावंत यांच्यावर देण्यात आली आहे. तर, मेळाव्यासाठी येणाऱ्यांच्या सुरक्षेसाठीही चोख व्यवस्था करण्यात आली आहे. फायर ब्रिगेड, अॅम्ब्युलन्स सेवा, वॉटर टँकर, शौचालये, अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरा यांची व्यवस्था करण्यात येणार आहे.