तुळजाभवानीचे कोट्यवधींचे दागिने वितळवणार
Tulja Bhawani's jewels worth crores will be melted महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या चरणी अर्पण करण्यात आलेले सोन्या - चांदीचे दागिने आता वितळवण्यात येणार आहे. भक्तांनी तुळजाभवानाली (Tuljapur) अर्पण केलेले दागिने वितळवण्यास विधी व न्याय विभागाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता या निर्णयाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाली आहे.
विधी व न्याय विभागाने दिलेल्या मंजुरीनुसार देवीला अर्पण करण्यात आलेल्या दागिन्यांपैकी 204 किलो सोने तर 3000 किलो चांदीचे दागिने वितळविले जाणार आहेत. जानेवारी 2009 ते जून 2023 या कालावधीमध्ये देवीच्या चरणी अर्पण केलेले दागिने वितळे जाणार आहेत. भक्तांनी देवीला अर्पण केलेल्या सोन्या-चांदीच्या मौल्यवान वस्तू वितळवून त्या बँकेत ठेवण्याचा ठराव तुळजाभवानी मंदिर समितीने घेतला होता. त्यानंतर समितीने हे दागिने वितळवता यावेत याची रीतसर परवानगी राज्य सरकारकडे मागितली होती. त्यानुसार राज्य सरकारच्या विधी व न्याय विभागाने गुरुवारी ती परवानगी तुळजाभवानी मंदिर संस्थानाला दिली आहे. त्यामुळे आता तुळजाभवानी देवीच्या दैनंदिन व यात्रा काळात वापरायचे दागिने पुरातन व दुर्मिळ दागिने वगळून केवळ भाविकांनी देवीला अर्पण केलेलेच दागिने वितळविले जाणार आहेत.