मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 17 नोव्हेंबर 2022 (07:52 IST)

थंडीचा कडाका वाढताच विठुरायाला परिधान केला उबदार पोशाख

pandharpur
पंढरपूर : सध्या राज्यभर थंडीचा कडाका वाढू लागल्याने विठुरायाला उबदार पोशाख परिधान करण्यास सुरुवात झाली आहे. कार्तिकी यात्रेच्या प्रक्षाल पूजेनंतर दुसऱ्या दिवशीपासून दरवर्षी देवाला उबदार पोशाख परिधान करण्यास सुरुवात केली जाते. यामध्ये उब देण्यासाठी देवाला मऊ काश्मिरी शाल आणि डोक्याला रेशमी मुंडासे बांधण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
 
दरम्यान, मंगळवारी (दि. 15) रात्री शेजारातीनंतर जेव्हा विठुराया निद्रेसाठी जात असतात तेव्हा त्यांच्या अंगावरील पोशाख काढण्यात येतो. देवाचे अंग पुसून घेतल्यावर देवाच्या डोक्यावरील मुकुट काढून तेथे 150 हात लांबीचे हे खास उबदार मुंडासे देवाच्या मस्तकावर वैशिष्ठ्यपूर्ण पद्धतीने बांधण्यात येते. यानंतर देवाच्या कानाला थंडी वाजू नये म्हणून मस्तकी असलेल्या मुकुटावर सुती उपरण्याची पानपट्टी देवाच्या कानाला बांधण्यात येते.
 
यावर पारंपरिक असलेली देवाची उबदार काश्मिरी शाल अंगावर घालण्यात येते. या कपड्यांमुळे देवाला नखशिखांत उबदारपणा जाणवेल याची खबरदारी घेतली जाते. यानंतर देवाला तुळशीहार व फुलांचे हार घातले जातात. आरती करून देवाला निद्रेसाठी सज्ज केले जाते.
 
त्यानंतर पहाटे काकड्याच्यावेळी देवाच्या अंगावरील ही काश्मिरी रजई फक्त काढून बाकीचे उबदार कपडे तसेच ठेवले जाते. रुक्मिणी मातेला देखील अशाच पद्धतीने उबदार रजई गुंडाळून ठेवली जाते. साधारणपणे प्रक्षाळपुजेच्या दुसऱ्या दिवसापासून देवाची हुडहुडी घालविण्यासाठी हा खास पद्धतीचा पोशाख देवाला घालण्याची ही परंपरा शेकडो वर्षांपासून चालत आली आहे. साधारण होळीपर्यंत हे उबदार कपडे देवाला घातले जातात.

Edited by: Ratnadeep Ranshoor