वानखेडेंनी सुशांतसिंह प्रकरणात आरोपी बनण्यास सांगितलं
नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीचे माजी विभागीय प्रमुख समीर वानखेडे वादाच्या भोवऱ्यात अडकत आहेत. अलीकडेच केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) समीर वानखेडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आर्यन खान अटकप्रकरणी समीर वानखेडे यांनी २५ कोटींची लाच मागितली, असा आरोप सीबीआयने केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून समीर वानखेडे यांच्याशी संबंधित २९ ठिकाणांवर सीबीआयच्या पथकाने छापेमारी केली आहे.
२५ कोटींच्या लाचप्रकरणी सीबीआयकडून तपास सुरू असताना ड्रग्ज प्रकरणातील आरोपी करण सजनानी यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. समीर वानखेडे आणि आशिष रंजन यांनी सुशांतसिंह राजपूत मृत्युप्रकरणात कटकारस्थान रचण्यासाठी आपल्याला आरोपी बनण्यास सांगितलं होतं, असा गौप्यस्फोट सजनानी यांनी केला. सुशांतसिंह मृत्यूप्रकरणात आरोपी बनल्यास तुला लवकरात लवकर तुरुंगातून बाहेर काढू, असं आश्वासन समीर वानखेडे यांनी दिलं होतं, असा दावाही सजनानी यांनी केला.