सोमवार, 11 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

दुष्काळ असेल, तर पाहुण्यांकडे जनावरे सोडण्याचा अजब सल्ला!

महाराष्ट्र दुष्काळाने होरपळू लागला असतानाच, फडणवीस सरकारमधले मंत्री आपण कसे निर्दयी आहोत, याचे जणू पुरावेच देऊ लागले आहेत... याचा प्रत्यय नुकताच नगर जिल्ह्यात आला. जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात यंदा दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे या तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी काही जण पालकमंत्री राम शिंदे यांच्याकडे निवेदन घेऊन गेले. या शेतकऱ्यांना दिलासा देणे, मदत करणे तर राहिलेच, मंत्रिमहोदयांनी त्यांना "दुष्काळ पडलाय तर बघत काय बसलाय, जनावरे पाहुण्यांकडे सोडा," असा अजब सल्ला दिला !
 
माणुसकीने न वागणाऱ्याला, माणूस आहेस की जनावर, असा प्रश्न केला जातो. मग दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या शेतकऱ्यांची अशी क्रूर थट्टा करणाऱ्याला काय म्हणायचे, हा प्रश्नच आहे. महाराष्ट्रात दुष्काळाची समस्या गंभीर होत चालली आहे. पण भाजपाचे सरकार शेतकऱ्यांना मदत करायला तयार नाही. काही भागांतच दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळी भागाच्या यादीमध्ये आपल्याही गावाचा समावेश होण्यासाठी शेतकरी नाईलाजाने प्रयत्न करतो आहे. पण त्याच्या नशिबी शिंदे यांच्यासारख्यांकडून होणारी थट्टा लिहिलेली आहे.
 
राम शिंदे यांच्या या असंवेदनशील वक्तव्यामुळे संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी संतप्त झाले आहेत. भाजपाच्या या असंवेदनशील सरकारबद्दल शेतकऱ्यांमध्ये वाढती नाराजी आहे. शिंदे यांच्या वक्तव्यामुळे त्यात मोठीच भर पडली आहे.