बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 जुलै 2021 (21:44 IST)

पंकजा मुंडे यांनी नाराजी न बोलून दाखवण्यामागे काय कारणं असावीत?

केंद्रातील टीम 'नरेंद्र' मध्ये प्रीतम मुंडेंना डावलून, डॉ. भागवत कराड यांना राज्यमंत्री बनवण्यात आलं. त्यामुळे, पंकजा मुंडे नाराज आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. त्यात, दोन दिवस प्रतिक्रिया न दिल्याने, नाराजीच्या चर्चेला अधिक बळ मिळालं.
 
पंकजा मुंडेंनी अखेर आपलं मौन सोडलं. "प्रीतम मुंडेंना मंत्रिपद न मिळाल्याने मी नाराज नाही. पंकजा आणि प्रीतम यांनी मंत्रिपदाची कधीच मागणी केली नव्हती," असं त्या म्हणाल्या.
 
राजकीय विश्लेषकांच्या मते, सध्याच्या स्थितीत पंकजा पक्षावर आपली नाराजी जाहीर करू शकत नाहीत.
 
पण, मंत्रिमंडळ विस्ताराच्या दिवशी, "आम्ही मुंबईत आहोत, असं म्हणत, आम्हाला विचारात घेतलं जात नाही," याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले, असं औरंगाबादच्या पुढारी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक संजय वरकड यांचं मत आहे.
 
पंकजा मुंडे नाराज आहेत?
पंकजा मुंडेंचं राजकारण जवळून पहाणारे राजकीय विश्लेषक म्हणतात, पंकजा जाहिरपणे नाराजी बोलून दाखवत नसल्या, तरी पक्षावर त्या नाराज आहेत.
 
शुक्रवारी त्यांनी, "प्रीतमचं नाव चर्चेत होतं. त्यामुळे, कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना असल्याचं वक्तव्य केलं." त्याचबरोबर, केंद्रातील मंत्र्यांनी ओबीसी समाजाला मदत करावी, असा खोचक टोमणाही मारला.
राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांच्या मते, भागवत कराड यांच्या नियुक्तीनंतर, पंकजा जाहिरपणे नाराजी बोलून दाखवत नसल्या, तरी, मनातील अस्वस्थता आणि शल्य त्यांना लपवता आलं नाही.
 
"राज्यसभेची जागा त्यांना मिळाली नाही. प्रीतम मुंडेंना मंत्रिपदाची संधी न मिळणं, आणि, मुंडेंच्याच समर्थकाला, त्यांना विश्वासात न घेता मंत्री केलं. याचं शल्य त्यांच्या बोलण्यातून जाणवत होतं," असं ते पुढे म्हणाले.
संजय वरकड पुढे सांगतात, "विधानपरिषदेला पंकजांच्या नावाचा विचार न केल्यामुळे, त्या सर्वात जास्त दुखावल्या गेल्या."
 
राजकीय जाणकारांच्या मते, नाराजीचं दुसरं कारण म्हणजे, डॉ. कराड यांची मंत्रीपदी नियुक्ती. "डॉ कराडांना संसदीय कामकाजाचा अनुभव नाही. ते पहिल्यांदाच खासदार झालेत. फक्त, महापौर म्हणून त्यांनी काम केलंय. त्यामुळे, त्यांना थेट राज्यमंत्री बनवणं, हा पंकजा मुंडेंना बसलेला सर्वात मोठा धक्का आहे."
 
पंकजा नाराजी का बोलून दाखवत नाहीत?
पक्षावर नाराज असूनही पंकजा मुंडे, नाराजी कधीच उघडपणे दाखवून देत नाहीत. याची कारणं काय असू शकतात?
संजय वरकड याची प्रमुख पाच कारणं सांगतात,
 
· साईडलाईन केलं असलं तरी भविष्यात चांगल्या पदाची अपेक्षा असावी.
 
· पक्षाविरोधात बंड करून फायदा नाही.
 
· निवडणूक हरल्यामुळे आणि आमदारकी नसल्यामुळे, आक्रमक पवित्रा घेण्यापेक्षा सावध पावलं टाकत आहेत.
 
· पक्षात सावरून घेणारं किंवा कव्हर करणारं कोणीच नाही.
 
· शिवसेनेत गेल्या तरी मोठं होता येणार नाही.
 
औरंगाबाद येथील राजकीय पत्रकार धनंजय लांबे म्हणाले, "पक्षावर नाराज असूनही, नाराजी जाहिरपणे बोलून न दाखवणं याला राजकीय परिपक्वता म्हणावं लागेल."
 
राजकीय जाणकारांच्या मते, नेत्यांची नाराजी ही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पक्षातील वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचत असते. पंकजा देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये मंत्री होत्या. त्यामुळे, प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते असा विचार त्यांनी नक्कीच केला असेल.
 
"ओबीसींचा प्रश्न खूप मोठा आहे. पंकजांना नाराज करून भाजपला परवडणार नाही. बहुदा, त्यांची समजूत काढण्यात आली असेल. म्हणून, त्या बॅकफूटवर आल्याचं पहायला मिळतंय," असं धनंजय लांबे पुढे म्हणाले.
 
देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात बोलणं शक्य नाही?
राज्यात देवेंद्र फडणवीस भाजपचे सर्वोच्च नेते आहेत. पण, "जनतेच्या मनातली मुख्यमंत्री मीच," असं म्हणत त्यांनी थेट फडणवीसांना आव्हान दिलं होतं. त्यानंतर, फडणवीसांशी जळवून घेतलं असलं, तरी, ते वक्तव्य पंकजा यांना डॅमेज करणारं ठरलं हे नक्की.
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सांगतात, "देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदींना चॅंलेंज करणं शक्य नाही. जोपर्यंत, केंद्रीय नेतृत्व फडणवीसांच्या पाठी खंबीरपणे उभं आहे. तोपर्यंत, देवेंद्र किंवा केंद्रीय नेतृत्वावर नाराजी व्यक्त करून काहीच फायदा होणार नाही."
 
दरम्यान, विधानपरिषदेचं तिकीट न मिळाल्याने नाराज पंकजा मुंडेंनी राज्याचा दौरा करणार असल्याचं सांगत, पक्षाला आव्हान दिलं होतं. पण, पक्षाच्या दबावामुळे त्यांनी दौरा केला नाही.
 
मुक्त पत्रकार श्रृती गणपत्ये सांगतात, "नरेंद्र मोदींच्या विरोधात जाण्याची भाजपच्या कोणत्याही नेत्यात हिंमत नाही. त्यामुळे, उघडपणे नाराजी व्यक्त न होता, बातम्या किंवा समर्थकांच्या माध्यातून ही नाराजी व्यक्त करण्याचा प्रयत्न केला जातोय."
 
निवडणूक हरल्यामुळे बॅकफूटवर?
2019 मध्ये विधानसभेच्या निवडणुकीत धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला. देवेंद्र फडणवीसांनी पंकजांच्या पराभवासाठी मदत केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.
त्यानंतर विधानपरिषदेवर वर्णी लागेल अशी पंकजा मुंडेंना अपेक्षा होती. पण, त्यांना आमदारकी देण्यात आली नाही.
 
"भाजपमध्ये पंकजा मुंडेंची कोंडी झालीये. पण, ही कोंडी फोडण्यासाठी, मोठं पाऊल उचलावं, तडकाफडकी निर्णय घेण्याची ही योग्य परिस्थिती नाही," हे त्या जाणून आहेत," असं संजय वरकड म्हणतात.
 
पक्षात मोठं पद नाही, त्यामुळे, आक्रमक होण्यापेक्षा, सावधपणाची भूमिका त्यांनी घेतल्याचं दिसून येत असल्याचं राजकीय जाणकार म्हणतात.
 
केंद्रीय नेतृत्वाकडून राज्यात संधी मिळण्याची आशा असल्याने, त्या सद्य स्थितीत बॅकफूटवर दिसून येत आहेत.
 
बंड करून पक्ष सोडू शकतात?
भाजपत नाराज असलेल्या पंकजा मुंडे, शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा, दरम्यानच्या काळात ऐकू येत होती.
 
संजय वरकड म्हणतात, "मुंडे आणि ठाकरे यांचे संबंध महाराष्ट्रातील राजकारणात सर्वांनाच माहित आहेत. त्यामुळे पंकजा मुंडेंसमोर शिवसेनेचा पर्याय नक्कीच आहे."
 
पण, "राज्यात तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचं सरकार. त्यात, शिवसेनेत प्रवेश केला. तर, नेता म्हणून मोठं होता येणार नाही. हे त्या नक्कीच लक्षात ठेऊन आहेत," असं वडकर पुढे म्हणाले.
 
राजकीय विश्लेषक सांगतात, धनंजय मुंडे राष्ट्रवादीत असले तरी त्यांचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी अत्यंत चांगले संबंध आहेत. "भाजपविरोधी भूमिकेचा धनंजय मुंडेंना फायदा होऊ शकतो," याची त्यांना जाणीव पंकजा यांना असल्याचं संजय वडकर पुढे म्हणाले.
 
गोपीनाथ मुंडेंप्रमाणेच 'वेट अॅंड वॉच'ची भूमिका?
 
शुक्रवारी (9 जुलै) पत्रकारांशी बोलताना गोपीनाथ मुंडेंची आठवण आल्याचं सांगत पंकजा भावूक झाल्या होत्या.
 
संजय वडकर यांना गोपीनाथ मुंडेंचं राजकारण जवळून पाहिलंय. ते म्हणतात, "गोपीनाथ मुंडेंनाही पक्षात खूप त्रास सहन करावा लागला. त्यांना झालेला त्रास, त्यांची नाराजी पंकजा मुंडेंना जवळून पाहिली आहे."
 
"गोपीनाथ मुंडे आपली नाराजी बाहेर सांगायचे नाहीत. पण, पदाचा राजीनामा देतो, असा दबाव तयार करायचे. पण, पंकजा गोपीनाथ मुंडेंसारखा आक्रमक नाहीत. त्या धक्कातंत्र, वापरून पक्षाला ताकद दाखवू शकत नाहीत," असं ते पुढे सांगतात.
 
कोरोनाकाळात काम नाही?
पंकजा मुंडे जिल्ह्यात कमी आणि मुंबईत जास्त असतात अशी टीका त्यांच्यावर वारंवर करण्यात येते.
 
संजय वरकड म्हणतात, कोरोनाकाळात लॉकडाऊनमुळे त्या मुंबईत होत्या. त्यांनी गावा-खेड्यात काम केलं नाही ही वस्तुस्थिती आहे. मात्र, मंत्री असताना त्या गावांशी संपर्कात होत्या.