मनसे-भाजप युती होणार? संदीप देशपांडे म्हणाले…
मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यानंतर राजकीय महाराष्ट्राचं राजकारण अक्षरश: ढवळून निघालं आहे. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. ह्या सगळ्याचं कारण म्हणजे, राज ठाकरे ह्यांनी मेळाव्यातील भाषणा दरम्यान महाविकास आघाडीचा खरमरीत शब्दांत घेतलेला समाचार व भाजपवर टीका करण्यासाठी अवाक्षर न काढणं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी भाजपचे वरीष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी गेले. त्यामुळे आता आगामी निवडणूकांमध्ये भाजप- मनसेची युती पाहायला मिळणार का असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होतोय.
युतीच्या शक्यतेवर संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया-
“कालची भेट वैयक्तिक भेट होती. आतातरी भाजप-मनसे युतीची चर्चा नाही. परंतु शिवसेनेनं भाजप बरोबर युती केली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या विरोधात निवडणुक लढली आणि नंतरच्या काळात राष्ट्रवादीसोबत घरोबा केला. राष्ट्रवादीनं 2 दिवसाचं भाजपसोबत सरकारं स्थापन केलं. एवढा व्याभिचार केला आणि आमच्या केवळ अफवा उठल्या तरी यांना झोंबतात.” असं मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले.