'भेजा फ्राय' चित्रपटांचा यंदाही 'ब्लॅक फ्रायडे'
चित्रपट हे स्वप्नरंजनाचे माध्यम असल्याचा समज करून देणाऱ्या काळातही वर्तमानाचे बोट धरून चालणारेही काही चित्रपट येत आहेत. सरत्या वर्षातही असे काही चित्रपट येऊन गेले. त्यांनी आजूबाजूच्या वास्तवावर बोट ठेवताना त्याचे अस्वस्थ करणारे रूपही लोकांपुढे मांडले. पण भेजा फ्राय करणाऱ्या या चित्रपटांचा ब्लॅक फ्रायडे यंदाही काही टळला नाही.
बिमल रॉय आणि ह्रषिकेश मुखर्जी यांच्यानंतर हिंदी चित्रपट प्रामुख्याने दोन श्रेणीत विभागला जातो. कलात्मक आणि व्यावसायिक चित्रपट. पण गेल्या काही वर्षात या दोहोतील भेदही काहीसा कमी होऊ लागला आहे. काही दिग्दर्शक कला व व्यावसायिकतेचा संगम करून चित्रपट काढत आहेत. त्याचवेळी निखळ कलात्मक म्हणून (म्हणजे काही लोकांपुरते मर्यादीत राहणारे व न चालणारे) चित्रपट अगदी अल्प प्रमाणात येत आहेत. बाकी व्यावसायिक सिनेमा म्हणजे वास्तवाशी नाते तोडलेले चित्रपट म्हणूनच उरले आहेत. म्हणूनच अशा परिस्थितीत वेगळी वाट चोखाळणाऱ्या चित्रपटांची दखल घ्यावीच लागते.
भेजा फ्राय, हनीमून ट्रॅव्हल्स प्रा. लि., मेट्रो, चीन कम, परझानिया, ब्लॅक फ्रायडे हे त्यातील काही चित्रपट. पण याची सुरवात २६ जानेवारीला प्रदर्शित झालेल्या परझानियाने केली. राहूल ढोलकिया याचा हा चित्रपट गुजरात दंगलीवर आधारीत होता. या दंगलीत आपला मुलगा गमावलेल्या पारशी कुटुंबाची ही संवेदनशील कहाणी अतिशय चांगली मांडली होती. तत्कालीन राज्यकर्त्यांचा आणि हिंदूत्ववाद्यांचा उन्माद मांडताना चित्रपट लाऊडही झाला नाही. त्यामुळेच तो लक्षात रहाणारा ठरला. अर्थातच तो चित्रपट फारच मर्यादीत प्रेक्षकांनी पाहिला. गुजरातमध्ये तर त्यावर बंदीची भाषाही बोलली गेली. पण समीक्षकांनी चित्रपटाचे कौतुक केले. पण वर्षातील चांगला ऑफ बीट चित्रपट म्हणायचा झाल्यास ब्लॅक फ्रायडेचे नाव घ्यावे लागेल. अनुराग कश्यप दिग्दर्शित हा चित्रपट मुंबई बॉम्बस्फोटावर आधारीत होता. या चित्रपटाची डॉक्युमेंटरी होण्याचा धोका होता, पण अनुरागने चित्रपट असा काही हाताळला आहे, की वास्तवाचे दूसरे रूप हा चित्रपट वाटतो. बॉम्बस्फोटाच्या कटापासून त्याच्या आरोपींच्या शोधापर्यंतचा सगळा प्रवास खुर्चीला खिळवून ठेवणारा आहे. शिवाय चित्रपट हे सगळे दाखवून या साऱ्याची कारणे सांगताना भाष्यही करून जातो. ही कारणे पटोत न पटोत पण चित्रपटाची दखल मात्र घ्यावी लागते. यात मुंबईचे तत्कालीन सहआयुक्त राकेश मारीया यांची के. के. मेनन याने वठवलेले भूमिका लाजवाब होती.