शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. रशिया - युक्रेन संघर्ष
Written By
Last Modified: शनिवार, 26 मार्च 2022 (14:00 IST)

रशिया युक्रेन युद्ध : अनेक शहरांत एकटेच राहिले वाघ - सिंह आणि इतर पाळीव प्राणी

रशियाच्या आक्रमणानंतर युक्रेनमध्ये जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. नागरिकांचा जीव जातोय, दुखापती होतायेत किंवा देश सोडून पळून जावं लागतंय.
 
माणसांप्रमाणेच इतर प्राण्यांचीही हीच अवस्था युक्रेनमध्ये झालीय. त्यात प्राण्यांची काळजी घ्यायला कुणीच नसल्याची स्थिती आहे.
 
दोन मार्चला कीव्ह शहराजवळील हॉस्टोमेल शहरावर रशियन सैन्याने हल्ला केला.
 
या हल्ल्यात आसिया सर्पिनस्का यांच्या शेजारील घरालाही आग लागली. या घरात पाळीव प्राणी असण्याचा अंदाज सर्पिनस्का यांना आला आणि त्या सहकाऱ्यासोबत तातडीनं घटनास्थळाकडे धाव घेतली.
 
सर्पिनस्का म्हणाल्या, "आम्ही पक्षी-प्राण्यांचे पिंजरे उघडण्यात यशस्वी झालो. ससे, लहान कोल्हे यांना सोडलं."
तिथे 'रुरा' नावाची एक सिंहीण असावी म्हणून शोध घेत असताना त्यांना तळघरात दोन वर्षांचा प्राणी सापडला.
 
सर्पिनस्का सांगतात, "तिला खायला देण्यासाठी तिथं कोणीही नव्हतं आणि ती खूप अस्वस्थ दिसत होती. म्हणून आम्ही तिला डॉग फूड आणि पाणी देऊ लागलो."
 
78 वर्षांच्या सर्पिनस्का युक्रेनमधील कुत्र्यांचं सर्वात मोठं निवाराकेंद्र चालवतात.
सर्पिनस्का सांगतात, "आम्ही बरसणारे तोफगोळे थांबण्याची वाट पाहायचो आणि मग जाऊन तिला बघायचो, कारण ती तिथं एकटीच होती."
 
हॉस्टोमेलमधील मालवाहू विमानतळावर आक्रमण करून 24 फेब्रुवारीपर्यंत ते ताब्यात घ्यायचं, असं रशियन सैन्याने ठरवलं होतं. मात्र सर्पिनस्का यांच्या कुत्र्यांचं निवारास्थान असलेला भागावर 5 मार्चपर्यंत रशियन सैन्याला ताब्यात मिळवता आला नव्हता.
 
पुढचे नऊ दिवस सर्पिनस्का यांना घराबाहेर पडायला असुरक्षित वाटत होतं. पण रुराला अन्न आणि पाणी देण्यासाठी त्या 14 मार्चला घराबाहेर पडल्या. त्यावेळी वाटेत त्यांची भेट रशियन सैनिकांशी झाली. त्या सैनिकांनी सर्पिनस्का यांना सांगितलं की, आदल्याच दिवशी त्यांनी त्या सिंहीणीला अन्न आणि पाणी दिलं आहे. पण आता त्या भागात झालेल्या उत्खननामुळे त्या सैनिकांनासुद्धा त्या तळघरात जाता येत नाही.
 
यावर प्राण्यांसाठी काम करणाऱ्या अभियानाचे कार्यकर्ते सांगतात की, "रुरा हेच एक प्रकरण नाही. युक्रेनमधील घरांमध्ये सिंह, वाघ, अस्वल, लांडगे, मगरी आणि अजगर यांसह हजारो पाळीव प्राणी घरात अडकल्याचा अंदाज आहे."
 
या कार्यकर्त्यांना रशियन आक्रमणापूर्वीचं युक्रेनच्या ईशान्येकडील खारकीव्ह येथील साल्टिव्हका जिल्ह्यातील एका खाजगी घरातून दोन सिंह, एक जग्वार आणि एक वाघ सोडवायचा होता.
 
युक्रेनी असोसिएशन फॉर अॅनिमल अॅडव्होकेट्सच्या कार्यकर्त्या इरीना कोरोबको म्हणतात, "युद्ध सुरू झाल्यानंतर मालकांनी त्यांच्या प्राण्यांना आहे, त्या अवस्थेत सोडून शहर सोडलं. आणि आता त्या प्राण्यांचं भविष्य अंधारात आहे."
या भागावर बरसणाऱ्या बॉम्बमुळे आता कोणीही त्या भागात प्राण्यांची अवस्था बघायला जाऊ शकत नाहीत.
 
कोरोबको म्हणतात, "या युद्धादरम्यान घरात बंदिस्त असलेल्या या हजारो वन्य-प्राण्यांचं काय होणार आहे, हा एक मोठा प्रश्न आहे"
 
युक्रेनी असोसिएशन फॉर अ‍ॅनिमल अॅडव्होकेट्सच्या अध्यक्षा मारिया ट्रुनोव्हा सांगतात, बऱ्याचदा हे प्राणी भयंकर परिस्थितीत सापडले आहेत.
 
"अधिकार्‍यांनी याबद्दल काहीतरी करावं यासाठी आम्ही सतत धडपडत होतो. आणि आता या युद्धादरम्यान सतत गोळीबार होतोय. अशा परिस्थितीत या प्राण्यांना भीती, भूक आणि थंडीने आणखी त्रास होत असेल. यात त्यांचा मृत्यूही होऊ शकतो."
कार्यकर्त्यांच्या मते, युक्रेनमध्ये सिंह आणि वाघ यांसारखे प्राणी 1500 डॉलरमध्ये विकत मिळतात. आणि जोपर्यंत प्राणी बंदिवासात आहेत तोपर्यंत ते कायदेशीर आहेत. युक्रेनच्या रेस्टॉरंटमध्ये अशा बंदिस्त प्राण्यांचा वापर ग्राहकांच्या मनोरंजनासाठी केला जात होता. प्राण्यांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांनी याचा पाठपुरावा केल्यानंतर, युक्रेनी सरकारने गेल्यावर्षी रेस्टॉरंटमध्ये प्राण्यांच्या वापरावर बंदी घालणारा कायदा आणला.
 
बेघरांद्वारे होणाऱ्या प्राण्यांच्या वापरावरही बंदी घालण्यात आली. कीव्ह आणि इतर शहरांच्या रस्त्यांवर अस्वलांसह पर्यटकांचे फोटो काढले जायचे. या फोटोग्राफर्सच्या प्राण्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली.
 
फोर पाऊज या आंतरराष्ट्रीय प्राणी कल्याण संस्थेच्या मते, युक्रेनमधील 25 अस्वलांची सुटका करण्यात आली असून सुमारे 100 अस्वल अजूनही रेस्टॉरंट्समध्ये, देशातील खाजगी प्राणीसंग्रहालयात बंदिस्त आहेत.
प्राणी कल्याण संस्थेच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की, युद्ध सुरू झाल्यापासून काही वन्यप्राण्यांची सुटका करून त्यांना शेजारच्या देशांमध्ये हलवण्यात आले आहे. पण सोडवलेले प्राणी बहुतेक प्राणीसंग्रहालय आणि अभयारण्यांमधीलचं आहेत, घरातले नाहीत.
 
वन्य जीवजंतू आणि वनस्पतींच्या लुप्तप्राय प्रजातींसाठी काम करणारी आंतरराष्ट्रीय संस्था साइट्स म्हणते की, ते युक्रेनमधून प्राण्यांची सुटका करण्यासाठी ऍनिमल वेल्फेअर ग्रुप्सना मदत करण्याचा प्रयत्न करत आहे.
 
प्रवक्ता सोफी फ्लेन्सबोर्ग सांगतात, "साइट्स ही सामान्यतः वन्य प्राण्यांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर आणि हस्तांतरणावर नियमन ठेवते."
 
"मात्र अशा अपवादात्मक परिस्थितीत, साइट्सच्या सचिवालयाने शिफारस केलीय की, प्राण्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी युद्धकाळात युक्रेनने तयार केलेल्या कायद्यांना निलंबित करण्यात यावं."
 
आसिया सर्पिनस्का सांगतात, वन्य प्राण्यांना आश्रय देणाऱ्या संस्थेची मालक नतालिया पोपोवा, रुरा सिंहिणीला हॉस्टोमेलमधून बाहेर नेण्यासाठी तयार होती. मात्र रशियन सैनिकांनी तिला फ्रंटलाईन ओलांडायला परवानगी दिली नाही.
 
तर दुसरीकडे, विहिरीतून पाणी पुरवठा करणार्‍या पंपाचा जनरेटर, हल्ल्यात उद्ध्वस्त झाल्यानंतर सर्पिनस्का यांच्याकडील 1,000 कुत्री आणि 200 मांजरींसाठी असणारं अन्न आणि पाणी संपत आलं होतं.
 
यावर सर्पिनस्का सांगतात, "त्या कुत्र्यांना सोडण्याचा विचार करत होत्या जेणेकरुन ते आमच्यासमोर तरी मरणार नाहीत." परंतु रशियन सैनिकांनी आता कुत्र्यांचे अन्न आणि पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी लागणारी यंत्र पोहोचविण्यासाठी परवानगी दिली आहे.