शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. साईबाबा
Written By
Last Updated : शनिवार, 23 एप्रिल 2022 (16:10 IST)

साईसच्चरित - अध्याय १५

Sai Satcharitra Marathi adhyay 15
॥ श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥ श्रीकुलदेवतायै नम: ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नम: ॥ श्रीसद्नुरुसाईनाथाय नम; ॥
फळलीं जयांचीं पुण्यें अगाधें । तयांसीच साईदर्शन लाधे । त्रिविधताप तयां न बाहे । साधन साधे परमार्था ॥१॥
कृपा करा जी श्रोतेजन । क्षणैक करोनि निजगुरूचिंतन । कथेसी करा सादर मन । द्या अवधान मजकडे ॥२॥
आहांत तुम्ही ठावे आम्हां । व्यर्थ परिश्रम कां हे तुम्हां । ऐसें न म्हणा करा क्षमा । उपमा तुम्हां सागराची ॥३॥
भरला जरी अपरंपार । तरी न सरिते परववी सागर । घन वर्षतां सहस्त्राधार । तयासही थार देई तो ॥४॥
तैसे तुम्ही श्रोते सज्जन । तुम्हांमाजीं करावें मज्जन । इच्छा धरिली न करा तर्जन । दीनवर्जन बरवें ना ॥५॥
येवो गंगेचें जल निर्मळ । अथवा गांवींचा लेंडओहोळ । सागरापोटीं दोहींसी स्थळ । संगमीं खळबळविरहित ॥६॥
म्हणोनि तुम्हां श्रोतियां चित्ता । संतकथाश्रवणीं जे आस्था । तेचि स्वयें पावेल साफल्यता । कृपेनें पाहतां मजकडे ॥७॥
सबूरी आणि श्रद्धायुक । सादर सेवितां हें कथामृत । आतुडेल भक्ति प्रेमयुत । श्रोते कृतकृत्य होतील ॥८॥
भक्तां सहज परमप्राप्ति । श्रोतयां भक्ति आणि मुक्ति । भावार्थियां सौख्यशांति । निजविश्रांति सकळिकां ॥९॥
गुरुमुखींच्या गोड कथा । ऐकतां निरसेल भवभयव्यथा । होईल आनंद श्रोतियांच्या चित्ता । स्वयें निजात्मता प्रकटेल ॥१०॥
ये अध्यायीं निरूपण । प्रेमळ भक्तांचें साईंस प्रार्थन । दर्शन देऊनि साई प्रसन्न । होती कैसेनि त्यां परिसा ॥११॥
नुकतीच पाजूनि गेली बाहेरी । मागुतेनि आली जरी मार्जारी । तरी फिरफिरोनि पोरें तिजवरी । धांवती प्रेमभरीं लुंचावया ॥१२॥
मग ते कंटाळुनी गुरगुरे । क्षणैक जरी दबती पोरें । आई निवांत बैसली पुरे । घालोनि भंवरे लुंचती ॥१३॥
लुंचतां ढोसतां प्रेमभरें । आईलागीं पान्हा पाझरे । मग तीच पूर्वील गुरगुरणें विसरे । प्रीतीनें पसरे क्षितीवरी ॥१४॥
प्रेमोदयीं हरपे कंटाळा । चौपायीं कवटाळी द्दढ निजबाळां । वरचेवरी चाटी अवलीळा । काय तो सोहळा अलोलिक ॥१५॥
पोरांच्या तीक्ष्ण नखप्रहारें । जों जों मातेची ओंटी विदारे । तों तों अधिक प्रेमाचे झरे । दुग्ध ओझरे बहुधारा ॥१६॥
जैसी त्या बाळांची अनन्य भक्ति । मातेसी करी दुग्धोत्पत्ति । तैसीच तुमची साईपदासक्ति । द्रववील चित्तीं साईंतें ॥१७॥
एकदां हरिभक्तिपरायण । गुणदासांचें सुश्राव्य कीर्तन । कौपीनेश्वर - सन्निधान । ठाणियाचे जन करविती ॥१८॥
पडलिया शिष्टांचा आग्रह । गणुदास करिती कथानुग्रह । एका कवडीचाही परिग्रह । किंवा दुराग्रह तेथें ना ॥१९॥
कीर्तना नलगे देणें कवडी । तनु उघडी डोईं न पगडी । कांसेसी साधीच पंचेजोडी  । अनिवार उडी श्रोत्यांची ॥२०॥
या पोषाखाची ही कथा । मौज वाटेल श्रवण करितां । अवधारा ती स्वस्थचित्ता । पहा आश्चर्यता बाबांची ॥२१॥
एकदां गणुदासांची कथा । शिरडी ग्रामीं होणें असतां । अंगरखा उपरणें फेटा माथां । पोषाखसमन्विता निघाले ॥२२॥
शिष्टाचारानुसारता । आनंदें बाबांस वंदूं जातां । ‘वाहवा नवरदेव कीं सजलासि आतां’ बाबा वदतां देखिले ॥२३॥
‘जातोसि कोठें ऐसा सजूनी’ बाबा पुसती तयांलागुनी । कीर्तन कराया जातों म्हणुनी । दासगणूंनीं कथियेलें ॥२४॥
पुढें बाबा वदती तयांस । ‘अंगरखा उपरणें फेटा कशास । किमर्थ केलास इतुका प्रयास । नलगती आपुल्यास तीं कांहीं ॥२५॥
काढ कीं तीं मजसमोर । कशास अंगावर यांचा भार’ । तंव तीं तयांच्या अनुज्ञेनुसार । तेथेंच चरणावर ठेविलीं ॥२६॥
तैपासूनि उघडे सोज्ज्वळ । हातीं चिपळी गळां माळ । कीर्तनसमयीं सर्वकाळ । गणुदास हा वेळपर्यंत ॥२७॥
तर्‍हा ही जरी जनविरुद्ध । तरी ती अत्यंत पायाशुद्ध । कीं जो प्रबुद्धांचा प्रबुद्ध । नारद - प्रसिद्ध हा मार्ग ॥२८॥
ही नारदीय मूल गाडी । येथूनचि हरिदासांची मांदी । बाह्य रंगाची न ज्यां उपाधी । अंत:शुद्धि ध्येय ज्यां ॥२९॥
अधोभागचि वस्त्राच्छादित । चिपळ्या वीणा वाजवीत । मुखीं हरिनाम गर्जत । ध्यान विश्रुत नारदाचें ॥३०॥
साईसमर्थांचे कृपेनें । स्वयें रचूनि संतांचीं आख्यानें । मोलावीण करिती कीर्तनें । ख्याती तेणें पावले ॥३१॥
उल्हास साईभक्तीचा । दासगणूनें विस्तारिला साचा । वाढविला साईप्रेमरसाला । स्वानंदाचा सागर ॥३२॥
भक्तशिरोमणि चांदोरकर । तयांचेही अत्यंत उपकार  । साईचरणभक्ति - विस्तार ।  कारण साचार हें मूळ ॥३३॥
दासगणूंचें इकडे येणें । एका चांदोरकरांच्या कारणें । जागोजाग तयांचीं कीर्तनें । साईंचीं भजनें चाललीं ॥३४॥
पुणें नगर सोलाप्रप्रांतीं । पूर्वींच महाराजांची ख्याती । परी या कोंकणच्या लोकांप्रती । लाविली भक्ति या दोघीं ॥३५॥
मुंबई प्रांतीं जी साईभक्ति । तियेचें मूळ या दोन व्यक्ति । साईमहाराज कृपामूर्ति । तयांचे हातीं प्रकटले ॥३६॥
श्रीकौपीनेश्वरमंदिरीं । साईकृपेच्या कीर्तनगजरीं । हरिनामाच्या जयजयकारीं । उठली लहरी चोळकरां ॥३७॥
हरिकीर्तना बहुत येती । श्रवणा - श्रवणाच्या अनेक रीती । कोणा आवडे बुवांची व्युत्पत्ति । हावभाव - स्थिति कवणा ॥३८॥
कोणा आवड गाण्यापुरती । वाहवा बुवा काय हो गाती । काय ते विठ्ठलनामीं रंगती । कथेंत नाचती प्रेमानें ॥३९॥
कोणास पूर्वरंगीं भक्ति । कोणाची कथाभागीं आसक्ति । कोणास हरिदासी नकला रुचती । आख्यानीं प्रीति कोणास ॥४०॥
बुया प्राकृत कीं व्युत्पन्न । कीं पदपदार्थ - बव्हर्थसंपन्न । कीं केवळ उत्तरंगप्रवीण । कथाश्रवण येपरी ॥४१॥
ऐसे श्रोते बहुत असती । परी श्रवणें जोडे श्रद्धा भक्ति । ईश्वर वा संतचरणीं प्रीति । ही श्रोतृस्थिती दुर्मिळ ॥४२॥
श्रवण केलें भाराभर । परी अविद्येचे थंरावर थर । तें काय श्रवणाचें प्रत्यंतर । व्यर्थ भाराभर श्रवण तें ॥४३॥
न घडे जेणेनि मळक्षाळण । त्यातें काय म्हणावें साबण । न करी जें अविद्यानिरसन । तें काय श्रवण म्हणावें ॥४४॥
आधींच चोळकर श्रद्धाळू । आला साई प्रेमाचा उमाळू । मनांत म्हणती बाबा कृपाळू । करा सांभाळू दीनाचा ॥४५॥
बिचारा गरीब उमेदवार । पोसूं असमर्थ कुटुंबभार । सरकार - पदरीं मिळावा शेर । बाबांसी भार घातला ॥४६॥
नवस करिती कामुक जन । होईल जरी अभीष्टसंपादन । तरी घालूं इच्छाभोजन । करूं ब्राम्हाणसंतर्पण ॥४७॥
श्रीमंतांचें नवस - वचन । म्हणती घालूं सह्स्रभोजन । अथवा करूं शतगोदान । मनकामना तृप्त होतां ॥४८॥
चोळकर आधींच निर्धन । नवस करावया झालें मन । आठवूनि श्रीसाईंचे चरण । दीनवदन तो बोले ॥४९॥
वाबा गरीबीचा संसार । नोकरीवरी सारी मदार । कायमचा व्हावया पगार । परीक्षा पसार हों लागे ॥५०॥
परिश्रमांतीं केली तयारी । पास होण्यावर भिस्त सारी । नातरी गांठीची भाकरी । उमेदवारी जाईल ॥५१॥
झालों कृपेनें पास जर । होईन आपुले पायीं सादर । वांटीन नांवानें खडीसाखर हाचि निर्धार पैं माझा ॥५२॥
एणेंपरी नवस केला । मनाजोगा आनंद झाला । नवस फेडाया  विलंब लागला । त्याग केला साखरेचा ॥५३॥
वाटेंत गांठीस कांहीं व्हावें । रिक्तहस्तें कैसें जावें । आजचें उद्यांवर लोटावें । दिवस कंठावे लागले ॥५४॥
ओलांडवेल नाणेघांट । सह्याद्रीचा कडाही अफाट । परी प्रापंचिका हा उंबरेघांट । बहु दुर्घट ओलांडूं ॥५५॥
नवस न फेडितां शिरडीचा । असेव्य पदार्थ साखरेचा । चहाही बिनसाखरेचा । चोळकरांचा चालला ॥५६॥
जातां ऐसे कांहीं दिवस । आली वेळ गेले शिरडीस । फेडिला तैं केलेला नवस । आनंद मनास जाहला ॥५७॥
होतांचि साईंचें दर्शन । चोळकर घालती लोटांगण । वंदोनियां बाबांचे चरण । आल्हादपरिपूर्ण ते झाले ॥५८॥
मन करूनियां निर्मळ । वांटिती साखर अर्पिती श्रीफळ । म्हणती आजि मनोरथ सकळ । झाले सफळ कीं माझे ॥५९॥
आनंदले साईसर्शनें । सुख जाहलें संभाषणें । होते चोळकर जोगांचेचि पाहुणे । आलें जाणें जोगांकडे ॥६०॥
जोग उठले पाहुणे निघाले । बाबा जोगांस वदते झाले । “पाजीं यांस चहाचे प्याले । भले भरले साखरेचे” ॥६१॥
खुणेचीं अक्षरें पडतां कानीं । चोळकर चमत्कारले मनीं । आनंदाश्रु आले नयनीं । माथा चरणीं ठेविला ॥६२॥
कौतुक वाटलें जोगांना । त्याहूनि द्विगुण चोळकरांना । कारण ठावें तयांचें त्यांना । पटल्या खुणा मनाच्या ॥६३॥
चहा नाहीं बाबांस ठावा । येक्षणींच कां आठवावा । चोळकरांचा विश्वास पटावा । ठसा उमटावा भक्तीचा ॥६४॥
इतक्यांत पुरता दिला इशारा । कीं “पावली वाचादत्त शर्करा । तुझ्या त्यागाचा नेमही पुरा । चोळकरा झालासे ॥६५॥
नवस - वेळेचें तुझें चित्त । दीर्घसूत्रतेचें प्रायश्चित्त । हें जरी तुझें ठेवणें गुप्त । तें मज समस्त कळलें गा ॥६६॥
तुम्ही कोणी कुठेंही असा । भावें मजपुढें पसरितां पसा । मी तुमचिया भावासरिसा । रात्रंदिसा उभाच ॥६७॥
माझा देह जरी इकडे । तुम्ही सातांसमुद्रांपलीकडे । तुम्ही कांहींही करा तिकडे ।  जाणीव मज तात्काळ ॥६८॥
कुठेंही जा दुनियेवर । मी तों तुम्हांबरोबर । तुम्हां ह्रदयींच माझें घर । अंतर्यामीं तुमचे मी ॥६९॥
ऐसा तुम्हां ह्रदयस्थ जो मी । तयासी नमा नित्य तुम्ही । भूतमात्राच्याही अंतर्यामीं । तोच तो मी वर्ततों ॥७०॥
यास्तव तुम्हांस जो जो भेटे । घरीं अथवा वाटे । ते ते ठायीं मीच रहाटें । मीच तिष्ठे त्यामाजीं ॥७१॥
कीड मुंगी जलचर खेचर । प्राणिमात्र श्वान शूकर । अवघ्या ठायीं मीच निरंतर । भरलों साचार सर्वत्र ॥७२॥
मजशीं धरूं नका अंतर । तुम्ही आम्ही निरंतर ॥ ऐसें मज जो जाणील नर । भाग्य थोर तयाचें” ॥७३॥
दिसाया हे वार्ता तोकडी । परी गुणानें बहु चोखडी । किती त्या चोळकरा गोडी । दिधली जोडी भक्तीची ॥७४॥
होतें जें जें तया अंतरीं । तें तें बाबांनीं एणेपरी । दाविलें तयासी प्रत्यंतरीं । काय भक्तीस डोल दाविती ॥७६॥
चातक - तृष्णेच्या परिहारा । मेघ सदयता वर्षे धारा । परिणामीं निवे अखिल धरा । तेच तर्‍हा हे झाली ॥७७॥
चोळकर बिचार कोठील कोण । निमित्तास दासगणूंचें कीर्तन । नवस करावया झालें मन । बाबाही प्रसन्न जाहले ॥७८॥
तेणेंच हा चमत्कार । कळलें संतांचें अंतर । उपदेशार्थ बाबा तत्पर । ऐसे अवसर आणीत ॥७९॥
चोळकरांचें केवळ निमित्त । सकळ भक्तांचें साधावया हित । अकळ बाबांची कळा नित । विलोकीतचि रहावें ॥८०॥
ऐसीच आणीक कला वर्णून । मग हा अध्याय करूं पूर्ण । कैसा एकें केला प्रश्न । कैसें तन्निरसन बाबांनीं ॥८१॥
एकदां बाबा मशिदींत । असतां आपुले आसनीं स्थित । भक्त एक सन्मुख बैसत । ऐके चुकचुकत पाल एक ॥८२॥
पल्लीपतन पल्लीवचन । पुढील भविष्यार्थाचें सूचन । सहज बाबांसी करी प्रश्र । जिज्ञासासंपन्न होउनी ॥८३॥
बाबा ही पाठीसी भिंतीवरी । किमर्थ हो पाल चुकचुक करी । काय असावें तियेचे अंतरीं । अशुभकारी नाहीं ना ॥८४॥
तयास बाबा झाले वदते । पालीस आलें आनंदभरतें । कीं औरंगाबादेहूनि येते । बहीण येथें भेटावया ॥८५॥
आधीं पाल तो जीव काय । तिला कैंचा बाप माय । कैंची बहीण कैंचा भाय । संसार - व्यवसाय काय तिये ॥८६॥
म्हणोनि बाबा हें कांहींतरी । बोलिले विनोदें प्रत्युत्तरीं । ऐसें मानूनियां अंतरीं । स्वस्थ क्षणभरी बैसला ॥८७॥
इतुक्यांत औरंगाबादेहून । गृहस्थ एक घोडयावरून । आला घ्यावया बाबांचें दर्शन । बाबा तैं स्नान करीत ॥८८॥
तयास जाणें होतें पुढें । चंदीवाचून चालेना घोडें । हरभरे विकत घ्यावया थोडे । बाजाराकडे निघाला ॥८९॥
पालीचा प्रश्न विचारणारा । साश्चर्य पाहे नव सौदागरा । इतुक्यांत त्यानें खाकेचा तोबरा । झटकला कचरा झाडावया ॥९०॥
उपडा आपटतांच क्षितीवर । पाल एक पडली बाहेर । घाबर्‍या घाबर्‍या धांवली सरसर । नजरेसमोर सकळांच्या ॥९१॥
प्रश्नपुसत्या बाबा वदती । आतां लक्ष ठेवीं तिजवरती । पालीची त्या बहीण हीच ती । पहा चमत्कृती तियेची ॥९२॥
ती जी तेथूनि निघाली तडक । ताई करीत होतीच चुकचुक । धरूनियां त्या आवाजावर रोख । चमकत ठुमकत  चालली ॥९३॥
बहिणी - बहिणींची ती गांठ । बहुतां दिसीं झाली भेट । चुंबिती मुख आलिंगिती दाट । प्रेमाचा थाट अनुपम ॥९४॥
एकमेकींस घालीत गिरक्या । आनंदानें मारीत भिरक्या । गेल्या उभ्या आडव्या तिरक्या । स्वच्छंद फिरक्या मारीत ॥९५॥
कोठें तें औरंगाबाद शहर । कोठें शिरडी काय हा प्रकार । कैसा यावा अवचित हा स्वार । पालही बरोबर तयाच्या ॥९६॥
असेल पाल औरंगाबादीं । असेल शिरलेली तोबर्‍यामधीं । परी त्या प्रश्नोत्तरासंबंधीं । कैसी ही संधी पातली ॥९७॥
पाल काय चुकचुकावी । प्रश्नस्फूर्ति ती काय व्हावी । अर्थोपपत्ति काय कथावी । प्रचीति यावी तात्काळ ॥९८॥
ऐसा हा योग अप्रतिम । विनोदावर सार्वत्रिक प्रेम । संत साधनयोजूनि अनुपम । भक्तक्षेम वाढविती ॥९९॥
पहा हा येथें जिज्ञासु नसता । अथवा कोणीही न प्रश्न पुसता । कैसा साईंचा महिमा समजता । कोणास कळता हा अर्थ ॥१००॥
अनेक वेळीं शब्द करितां । अनेक पाली ठाव्या समस्तां । कोण पुसे त्या शब्दांच्या अर्थां । अथवा वार्ता तयांची ॥१०१॥
सारांश हा जगाचा खेळ । सूत्रें गुप्त आणि अकळ । कोणास व्हावी तरी ही अटकळ । आश्चर्य सकळ करितात ॥१०२॥
उलट या पाली ठाव्या समस्तां । कोण पुसे त्या शब्दांच्या अर्थां । अथवा वार्ता तयांची ॥१०१॥
सारांश हा जगाचा खेळ । सूत्रें गुप्त आणि अकळ । कोणास व्हावी तरी ही अटकळ । आश्चर्य सकळ करितात ॥१०२॥
उलट या पाली शब्द करितां । दर्शविती कीं अनर्थसुचकता । ‘कृष्ण कृष्ण’ वाचे म्हणतां । टळते अनर्थता जन वदती ॥१०३॥
असेना कां कैसीही व्युत्पत्ति । परंतु ही काय चमत्कृति । भक्त जडवावया निजपदाप्रति । उत्तम ही युक्ति बाबांची ॥१०४॥
वाचील जो हा अध्याय आदरीं । अथवा नेमानें आवर्तन करी । तयाचें संकट गुरुराय निवारी । खूण अंतरीं द्दढ बांधा ॥१०५॥
अनन्यभावें चरणीं माथा । जो जो वाही तयासी तत्त्वतां । त्राता पाता अभयदाता । कर्ता हर्ता तो एक ॥१०६॥
अंतर मानूं नका येथ । ऐसाच आहे हा साईनाथ । निजानुभवाचा गुह्य भावार्थ । भक्तकल्याणार्थ मी कथितों ॥१०७॥
जगीं संपूर्ण मीचि एक । दुजें न मजविण कांहीं आणीक । नाहीं केवळ हाचि लोक । अखिल त्रैलोक्य मीचि मी ॥१०८॥
ऐसें अद्वितीयत्व जेथें स्फुरे । तेथें भयाची वार्ताचि नुरे । निरभिमानें निरहंकारें । चिन्मात्र सारें भरलें ज्या ॥१०९॥
हेमाडपंत साईंसी शरण । सोडूं नेणे क्षण एक चरण । कीं त्यांत आहे संसारतरण । गोड निरूपण अवधारा ॥११०॥
पुढील अध्यायीं प्रसंग सुंदर । निर्माण करितील साई गुरुवर । ब्रम्हाज्ञान कैसें वाटेवर । चिटकीवारी जन मागे ॥१११॥
कोणी एक लोभी जन । पुसेल साईंसी ब्रम्हाज्ञान । तें तयाचेच खिशांतून । देतील काढून महाराज ॥११२॥
श्रोतीं परिसतां हें कथानक । दिसूनि येईल बाबांचें कौतुक ।  लोभ सुटल्यावांचूनि निष्टंक । ब्रम्हा नि:शंक अप्राप्य ॥११३॥
कोण तयाचा अधिकारी । त्याचा कोणीही विचार न करी । कोणा तें प्राप्त कैशियापरी । तेंही विवरतील महाराज ॥११४॥
मी तों तयांचा दासानुदास । पदर पसरितों करितों आस । कीं हा साईप्रेमविलास । अति उल्हासें परिसा जी ॥११५॥
चित्तही होईल प्रसन्न । लाधेल चैतन्य समाधान । म्हण्वून श्रोतां द्यावें अवधान । संतमहिमान कळेल ॥११६॥
स्वस्ति श्रीसंतसज्जनप्रेरिते । भक्तहेमाडपंतविरचिते । श्रीसाईसमर्थसच्चरिते । चोळकरशर्कराख्यानं नाम पंचदशोऽध्याय: संपूर्ण: ॥
 
॥ श्रीसद्गुरुसाईनाथार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥