गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 ऑगस्ट 2021 (08:01 IST)

Tokyo Olympic : दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताची ब्रिटनवर 3-2 ने आघाडी

कांस्य पदकासाठी आज भारतीय महिला हॉकी संघाचा सामना ब्रिटनच्या संघाबरोबर सुरू आहे.त्याआधी भारतानं प्रथमच ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरी गाठत ऐतिहासिक कामगिरी केली होती.
 
दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय महिला संघानं सामन्याचं पूर्ण रुप पालटून टाकलं. दोन शून्यानं पिछाडीवर गेलेल्या भारतीय महिला संघानं त्यानंतर उत्तम खेळ करत 3-2 नं आघाडी घेतली.
 
गुरजित कौरनं दोन गोल पेनाल्टी कॉर्नरवर गोल नोंदवले. तर वंदना कटारियानं केलेल्या गोलमुळं भारतानं इंग्लंडविरोधात आघाडी घेतली.
 
पहिल्या दोन क्वार्टरमध्ये गोलकिपर सविता पुनियानं उत्कृष्ट खेळ दाखवला. इंग्लंडचे चार गोल रोखत महत्त्वाची कामगिरी सवितानं केली. त्यामुळं भारताविरोधात इंग्लंडला आघाडी वाढवता आली नाही.
 
दुसऱ्या क्वार्टरमध्ये काय झालं?
 
दुसऱ्या क्वार्टरच्या पहिल्या तीस सेकंदांमध्येच इंग्लंड पहिला गोल नोंदवत आघाडी घेतली. दुसऱ्या क्वार्टरची सुरुवातच ब्रिटननं आक्रमकपणे केली. दुसऱ्या क्वार्टरमध्येच सारा रॉबर्टसननं इंग्लंडसाठी गोल करत इंग्लंडची आघाडी 2-0 वर नेली होती. त्याच्या पुढच्याच मिनिटाला भारतानं पेनाल्टी कॉर्नर मिळवला आणि गुरजित कौरनं संधीचं सोनं करत गोल केला आणि इंग्लंडची आघाडी एकनं कमी केली.
 
त्यानंतर पुढच्या दोन मिनिटांमध्येच भारताला आणखी एक संधी मिळाली आणि पुन्हा एकदा गोल करण्यात भारतीय महिलांना यश आलं. गुरजित कौरनं दोन्ही वेळा यशस्वीपणे चेंडू गोलपोस्टमध्ये पाठवला. त्यानंतर वंदना कटारियानं केलेल्या आणखी एका गोलच्या जोरावर भारतानं इंग्लंड विरोधात आघाडी घेतली.
 
पहिल्या क्वार्टरमध्ये कुणाचाही गोल नाही
इंग्लंड विरुद्ध भारतादरम्यानच्या कांस्य पदकासाठी हॉकी सामन्यात पहिल्या क्वार्टरमध्ये कोणत्याही संघाला गोल करता आला नाही.
 
पहिल्या 15 मिनिटांमध्ये भारतीय संघानं ब्रिटनच्या तुलनेत बचावात्मक खेळ अधिक केल्याचं पाहायला मिळालं. तर ब्रिटननं आक्रमक खेळ करत गोल करण्याचे प्रयत्न केले.
 
पहिल्या दोन मिनिटामध्येच इंग्लंडनं पेनाल्टी कॉर्नर मिळवला. पण भारताच्या गोलकिपर सविता पुनियानं गोल रोखत ब्रिटनला आघाडी मिळू दिली नाही.
 
त्यानंतर नवव्या मिनिटालाही इंग्लंडला एक पेनाल्टी कॉर्नर मिळाला. पण त्या संधीचाही फायदा इंग्लंडला घेता आला नाही.
 
उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाला अर्जेंटिनाविरुद्ध पराभवाला सामोरं जावं लागलं. अर्जेंटिनाने हा सामना 2-1ने जिंकला होता.
 
हॉकीशिवाय आज कुस्तीमध्येही भारतीय पहिलवानांवर नजर असणार आहे. महिलांमध्ये सीमा बिस्ला आणि पुरुषांमध्ये बजरंग पुनिया यांचे आज सामने होत आहेत.
 
खराब सुरुवातीनंतर कामगिरी उंचावली
भारतीय महिला संघ केवळ तिसऱ्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. 1980 मध्ये मॉस्को इथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय महिला संघ पहिल्यांदा क्रीडाविश्वातल्या या सर्वोच्च स्पर्धेसाठी पात्र ठरला.
 
त्यानंतर तब्बल 36 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारतीय महिला संघाला ऑलिम्पिकचे दरवाजे उघडले. मात्र हा आनंद फार काळ टिकला नाही. कारण भारतीय महिला संघाला एकही सामना जिंकता आला नाही. गटात तळाशी राहण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली.
 
यंदाही भारतीय संघाची ऑलिम्पिक मोहिमेची सुरुवात निराशाजनकच झाली. महिला संघाने सलग तीन सामने गमावले.

प्रशिक्षक जरोड मार्जिन यांनी संघाच्या कामगिरीवर जोरदार टीका केली होती. खेळाडू वैयक्तिक स्वरुपाचं खेळत असून त्यांनी संघ म्हणून खेळायला हवं असं त्यांनी म्हटलं होतं.
 
त्यानंतर मात्र भारतीय महिला संघाची कामगिरी उंचावत गेली आणि त्यांनी उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. आता उपांत्य फेरीत ब्रिटनचा पराभव करत महिला संघानंही कांस्य पदक जिंकल्यास देशवासियांचा आनंद नक्कीच दुणावणार आहे.