टोकियो ऑलिम्पिक : विनेश फोगाटचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव
टोकियो ऑलिम्पकमध्ये पदकाची प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या कुस्तीपटू विनेश फोगाटला पराभवाचा सामना करावा लागला आहे. उपांत्यपूर्व फेरीत बेलारुसच्या वनिसा कलादजिस्कायानं तिला पराभूत केलं.
पहिल्या तीन मिनिटांमध्येच वनिसानं विनेशच्या विरोधात आघाडी घेतली होती. विनेशनं आक्रमक डाव टाकण्याचा प्रयत्न केला. पण वनिसाचा बचाव त्याच तोडीचा होता.
अखेरच्या एका मिनिटामध्ये आक्रमक डाव टाकण्याच्या प्रयत्नात विनेशचे दोन्ही खांदे जमिनीला टेकले आणि वेळ संपवण्यापूर्वीच तिचा पराभव झाला.
विनेशनं त्यापूर्वी स्वीडनच्या सोफिया मॅगडेलेना मॅटसनला पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. तिनं या सामन्यात 7-1 नं विजय मिळवला होता.
विनेशनं 53 किलो वजन गटात गेल्या काही महिन्यांमध्ये उत्तम कामगिरी केली होती. अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांत विजेतेपद पटकावत तिनं क्रमवारीत अव्वल स्थान मिळवलं होतं.
2016 मध्ये गुडघ्याच्या दुखापतीमुळं विनेशचं ऑलिम्पिक पदकाचं स्वप्न भंगलं होतं. त्यामुळं यावेळी तिच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण उपांत्यपूर्व फेरीत तिचा पराभव झाला.
आता रेपिचाझमध्ये संधी मिळाली तर विनेशला कांस्य पदकासाठी सामन्यात खेळता येईल.
उपांत्यपूर्व फेरीत वनिसानं विनेशला पराभूत केलं आहे. आता वनिसा फायनलमध्ये पोहचली तर रेपिचाझनुसार कांस्यपदकाच्या सामन्यासाठी विनेशला संधी मिळेल.
रेपिचाझ राऊंड म्हणजे तुम्हाला पहिल्या राऊंडमध्ये हरवणारा प्रतिस्पर्धी जर त्या गटात मेडल मॅचेसपर्यंत गेला तर तुम्हाला ब्राँझ मेडलची आणखी एक संधी मिळते.