गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25
Written By
Last Modified: गुरूवार, 25 जुलै 2024 (09:15 IST)

बजेटमधल्या ‘या’ तरतुदीमुळे घर विकताना तुम्हाला भरावा लागू शकतो जास्त टॅक्स, जाणून घ्या

tax budget 2020
अर्थसंकल्पामध्ये बदललेल्या टॅक्स स्लॅब्सबद्दल तर तुम्हाला माहिती असेलच. लाँग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स मध्ये बदल केल्याचंही तुम्ही वाचलं - ऐकलं असेल.
 
पण याच बजेटमध्ये करण्यात आलेल्या एका बदलाचा परिणाम तुम्ही घर विकत असताना होणार आहे आणि त्यासाठी 2001 हे वर्षं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे.
 
कारण तुम्हाला घर विकल्यानंतर जास्त टॅक्स भरावा लागणार का, हे या 2001 वर अवलंबून असेल.
 
काय बदललंय नेमकं...जाणून घेऊयात.
 
कॅपिटल गेन्स टॅक्स म्हणजे काय?
Capital Gains Tax जो आकारला जातो Capital Assets वर.
 
कॅपिटल असेट्स म्हणजे तुमच्याकडे असणारी immovable property म्हणजेच अचल मालमत्ता. यामध्ये घर, ज्वेलरी, बाँड्स, शेअर्स, म्युच्युअल फंड्स, पेटंट्स, ट्रेडमार्क या सगळ्याचा समावेश होतो.
 
यापैकी काही विकलं तर त्यावरच्या नफ्यावर जो टॅक्स लागतो तो - Capital Gains Tax.
 
हा दोन प्रकारचा असतो. शॉर्ट टर्म किंवा लाँग टर्म. तुमच्याकडे ही immovable property किती काळ होती यावर हे ठरतं.
 
शेअर्स, म्युच्युअल फंड्स, बाँड्स तुमच्याकडे 1 वर्षापेक्षा जास्त काळ होते आणि मग विकलेत तर त्यावर Long Term Capital Gains (LTCG) टॅक्स लागतो. त्या आधी विकलेत तर त्यावर Short Term Capital Gains Tax लागतो.
 
घरांसाठी ही मुदत 2 वर्षांची आहे.
 
आता याच लाँग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्समध्ये बदल करण्यात आलाय. हे काय बदल आहेत?
 
LTCG टॅक्समध्ये कोणते बदल झाले?
घर विकलं तर त्यावरच्या नफ्यावर आतापर्यंत 20% LTCG आकारला जात होता. तो कमी करून आता 12.5% वर आणण्यात आलाय. आता तुम्ही म्हणाल, हे बरं झालं...टॅक्स उलट कमी झालाय.
 
पण हे इतकं सोपं नाहीये. 20 टक्के LTCG आकारला जात असताना त्याला Indexation Benefit मिळत होता. साडेबारा टक्के करत आकारताना हा बेनिफिट मिळणार नाहीये. जर तुमचं घर 2001 पूर्वी तुम्ही विकत घेतलं असेल किंवा वारशातून - Inheritance ने मिळालं असेल तर तुम्हाला हे घर विकताना Indexation चा फायदा यानंतरही घेता येईल.
 
पण 2001 नंतरच्या घरांची विक्री करताना इंडेक्सेशनचा फायदा मिळणार नाही.
 
Indexation म्हणजे नेमकं काय?
Indexation म्हणजे Cost of Asset म्हणजे तुमच्या घराची मूळ किंमत (खरेदी केली तेव्हाची) Inflation - चलनवाढीच्या दरानुसार टॅक्स आकारणीसाठी अॅडजस्ट करणं.
 
समजा काही वर्षांपूर्वी तुम्ही एक घर घेतलं होतं - 50 लाखांना
 
आता तुम्हाला हे घर विकायचंय आणि त्यासाठी मिळतायत - 70 लाख
 
मग आता या 20 लाखांच्या फरकावर टॅक्स लागणार का... तिथेच गोष्टी बदलल्यात.
 
म्हणजे पूर्वीच्या नियमांनुसार जिथे इंडेक्सेशन नंतर 20% कर होता.
 
तिथे केंद्र सरकारच्या Cost Inflation Index नुसार घराची किंमत आताच्या महागाईच्या दरानुसार अॅडजस्ट झाली असती.
 
याला म्हणतात - Indexed cost of acquisition.
 
त्यामुळे समजा 50 लाखांच्या घराची अॅडजस्टेड किंमत झाली 65 लाख. विकलं गेलं 70 लाखांना.
 
70 -65 लाख म्हणजे 5 लाख तुमचा नफा. आणि त्यावर 20% टॅक्स - रु. 1,00,000
 
पण आता हे इंडेक्सेशन नसेल. तर मग LTCG आकारला जाईल 20 लाखावर.
 
20 लाखांवर 12.5% टॅक्स होईल - रु. 2,50,000
 
म्हणजे तुमचं 1 एप्रिल 2001 नंतरचं घर विकताना आता जास्त टॅक्स भरावा लागेल.
 
पण तुमचं घर 2001 पूर्वीचं असेल तर ते विकताना तुम्हाला इंडेक्सेशनचाही फायदा मिळेल आणि तुमच्यासाठी LTCG टॅक्सही कमी झालाय.
 
घर विक्रीचे पैसे नवीन घर खरेदीसाठी वापरले तर?
जुनं घर विकून मिळालेले पैसे नवीन घर विकत घेण्यासाठी वा बांधण्यासाठी वापरले जाणार असतील, तर त्यावर इन्कम टॅक्स अॅक्टच्या सेक्शन 54 नुसार LTCG टॅक्समधून Exemption मिळत होतं. आणि हे exemption यापुढेही कायम राहणार आहे.