सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. व्हॅलेंटाईन डे
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2023 (09:59 IST)

Teddy Day: असा झाला टेडी बेअरचा जन्म...

डेव्हिड कॅनडाइन,
'व्हॅलेन्टाइन डे'पूर्वीचा आठवडा प्रेमाचा मोसम असतो आणि त्यातला 10 फेब्रुवारी हा 'टेडी डे' म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्त टेडी बेअरचा इतिहास जाणून घेण्याचा हा प्रयत्न-
 
1924 साली जन्मलेल्या सर रॉबर्ट क्लार्क या असामान्य व्यक्तिमत्वावरचा मृत्युलेख मी काही काळापूर्वी वाचला. दुसऱ्या महायुद्धादरम्यान चर्चिल यांच्या 'स्पेशल ऑपरेशन्स एक्झिक्युटिव्ह'मध्ये त्यांना भरती करून घेण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना इटलीमध्ये शत्रूशी लढायला पाठवण्यात आलं, तेव्हा ते पकडले गेले आणि त्यांना युद्धकैदी म्हणून तुरुंगात डांबण्यात आलं.
 
त्यानंतर 'डिस्टिंग्विश्ड सर्व्हिस क्रॉस' हा सन्मान मिळाल्यानंतर ते लंडन शहरातील एक विख्यात व्यक्तिमत्व झाले. ब्रिटिश सरकार अनेकदा त्यांना सल्ल्यासाठी बोलावत असे. ते 'अतिशय विलक्षण माणूस, अत्यंत हुशार, आणि त्याच वेळी नम्रसुद्धा' होते, असं वर्णन त्यांचे एक सहकारी करतात.
 
पण या सभ्य आणि नम्र चेहऱ्यामागे समर्थ इच्छाशक्ती व पोलादी स्वभाव होता. सर रॉबर्ट क्लार्क यांचं 3 जानेवारी 2013 रोजी निधन झालं आणि त्यांच्यावरील मृत्युलेख वाचताना एक तपशील मला विशेष लक्षणीय वाटला.
 
1926 सालच्या आसपास ते दोन वर्षांचे होते, तेव्हा त्यांना एक टेडी बेअर देण्यात आलं आणि त्याला ते 'फेला' असं म्हणून लागले.
 
क्लार्क यांच्या प्रदीर्घ व वैविध्यपूर्ण कारकीर्दीत फेला सर्वत्र त्यांच्या सोबत असायचा. अगदी शत्रू प्रदेशात त्यांना पॅराशूटने उतरवण्यात आलं, नंतर ते युद्धकैदी होते, त्या काळातही फेला त्यांच्या सोबत होता.
 
फेलाच्या या असाधारण एकनिष्ठेबद्दलचं ऋण म्हणूनच बहुधा सर रॉबर्ट क्लार्क नंतरच्या काळात टेडी बेअरचे हौशी संग्राहक झाले. अखेरीस त्यांच्याकडे तीनशेहून अधिक टेडी बेअर जमा झाले होते.
 
परंतु, माणूस आणि टेडी बेअर यांच्यातील असं आयुष्यभराचं निष्ठावान नातं अजिबातच अपवादात्मक नाही. जॉन बेजेमान यांना त्यांच्या लहानपणीच्या 'आर्चिबाल्ड ऑर्म्स्बी-गोअर' या टेडीचं खूप कौतुक वाटत असे.
 
आर्चीवरून स्फुर्ती घेऊन एवलीन वॉ यांनी एलोयसिअस या टेडी बेअर पात्राची निर्मिती केली. वॉ यांच्या ब्राइड्सहेड रिव्हिजिटेड कादंबरीतील लॉर्ड सेबास्टिअन फ्लाइटकडे हे टेडी बेअर असतं.
 
आज आपण वास्तवात आणि कथाकादंबऱ्यांमध्येही कापूस भरलेल्या बाहुल्यारूपी प्राण्यांना टेडी म्हणून स्वीकारतो, आणि अनेकांच्या बालपणीचा- काहींच्या बाबतीत तर प्रौढ वयामधलाही- तो अविभाज्य भाग झालेला असतो.
 
पण यासाठी मुळात अमेरिकी राष्ट्राध्यक्ष थिओडोर रूझवेल्ट यांचे आभार मानायला हवेत- कारण, त्यांचं टोपणनाव टेडी असं होतं आणि त्यावरूनच बाहुल्यारूपी बेअरना म्हणजे अस्वलांना 'टेडी बेअर' हे नाव पडलं.
 
रॉबर्ट क्लार्क यांचा जन्म व्हायच्या साधारण दोनेक दशकं आधी रूझवेल्ट मिसिसिपी राज्यातील गव्हर्नरच्या बोलावण्यावरून अस्वलाची शिकार करायला तिथे गेले होते.
 
एकदा बराच वेळ, थकवणारा पाठलाग करून झाल्यावर रूझवेल्ट यांच्या काही मित्रांनी एका काळ्या अमेरिकन अस्वलाला गाठलं आणि ते अस्वल एका वाळंजाच्या झाडाला बांधून ठेवलं.
 
राष्ट्राध्यक्षांनी येऊन त्याला गोळी घालावी म्हणून रूझवेल्ट यांना बोलावण्यात आलं. पण रूझवेल्ट यांना ही विनंती स्वीकारणं उमदेपणाचं वाटलं नाही. नंतर या प्रसंगासंदर्भात क्लिफोर्ड बेरिमन यांनी काढलेलं व्यंगचित्र वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालं आणि हा प्रसंग अजरामर झाला.
 
योगायोगाने बेरीमन यांचं व्यंगचित्र रशियातून अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या ज्यू समुदायातील मॉरिस मिश्टम यांच्या नजरेला पडलं. मिश्टम दिवसाच्या वेळेत ब्रूकलीनमधल्या त्यांच्या दुकानात कँडी विकायचे नि रात्री त्यांची पत्नी रोझ हिच्यासोबत कापसाने भरलेल्या प्राण्यांच्या बाहुल्या तयार करायचे.
 
पेपरातल्या व्यंगचित्रावरून प्रेरणा घेऊन त्यांनी कापूस भरलेलं अस्वलाचं पिल्लू तयार केलं, त्या सोबत 'टेडीज् बेअर' असं लिहिलं. याचं एक मॉडेल करून त्यांनी आधीच रूझवेल्ट यांना पाठवलं होतं आणि रूझवेल्ट यांनीही स्वतःचं नाव वापरण्याची परवानगी लगोलग दिली.
 
हे नवीन खेळणं लगेचच लोकप्रिय झालं. या टेडींची विक्री इतक्या झपाट्याने झाली की, मिश्टन यांनी पुढे 'आयडिअल नॉव्हेल्टी अँड टॉय कंपनी'च स्थापन केली. त्याच दरम्यान आणि बहुधा पूर्णतः योगायोगाने जर्मनीतही कापसाने भरलेल्या अस्वलांच्या बाहुल्या बाजारात आल्या होत्या.
 
1880च्या दशकापासून कापसाची खेळणी तयार करणाऱ्या मार्गारेट स्टेइफ यांनी जर्मनीत हे खेळणं बाजारात आणलं. त्या वेळी नुकताच त्यांचा भाचा रिचर्ड त्यांच्या व्यवसायात सहभाग घेऊ लागला होता.
 
रिचर्ड स्टेइफ यांनी स्वतःचा एक वेगळा टेडी तयार करून 1903 साली लेइपझिग टॉय फेअरमध्ये प्रदर्शनासाठी ठेवला. त्यांचं हे कापसाचं अस्वलही तत्काळ लोकप्रिय झालं आणि स्टेइफ यांनी ब्रिटन, अमेरिका व जगाच्या इतर भागांमध्ये हजारो बेअरची निर्यात सुरू केली.
 
त्यानंतर टेडी बेअरांनी जागतिक पातळीवर प्रस्थापित केलेलं वर्चस्व महाकाय राहिलं आहे. आजकाल केवळ टेडी बेअर विकणारी दुकानं असतात, अनेक देशांमध्ये टेडी बेअरची संग्रहालयं आहेत आणि ऑस्ट्रेलिया, अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, जर्मनी व जपान इथे नियमितपणे टेडी बेअर समारोहांचं आयोजन केलं जातं.
 
दरम्यान, ब्राइड्सहेड रिव्हिजिटेडमधील अलोयसिअसच्या दाखल्याप्रमाणे टेडी बेअर हे कायमस्वरूपी सांस्कृतिक खूण म्हणून स्वीकारलं गेलं. डेसी एक्सप्रेस या वृत्तपत्रात 1920 साली रूपर्ट बेअर हे लहान मुलांच्या व्यंगचित्रमालिकेतील पात्र म्हणून अवतरलं.
 
त्यानंतर ए.ए. मिल्ने यांनी 'विनी द पू'ची गोष्ट लिहिली. मिल्ने यांच्या मुलाकडील टेडीच्या नावाचं अस्वल हे या गोष्टीतील मध्यवर्ती पात्र होतं.
 
1932 साली जॉन वॉल्टर ब्रेटन यांनी संगीतबद्ध केलेलं, आणि जिमी केनेडी यांनी शब्दरचना केलेलं, टेडी बेअर्स पिकनिक हे गाणं प्रचंड गाजलं.
 
वीस वर्षांनी हॅरी कॉर्बेट यांची निर्मिती असलेलं सूटी हे बाहुलीच्या रूपातील अस्वल बीबीसी वाहिनीवर अवतरलं, आणि 1958 साली पॅडिंग्टन बेअरची पुढे उल्लेखनीय ठरलेली कारकीर्द सुरू झाली. लंडनमधील पॅडिंग्टन रेल्वे स्थानकावरून त्याचं नाव पडलं आणि या स्थानकावर त्याच टेडी बेअरचा कास्याचा पुतळा उभारण्यात आला.
 
सर्वसामान्य जनतेला करमणूक, विरंगुळा, सवय इत्यादींसाठी साथ देणारं टेडी बेअर सर रॉबर्ट क्लार्क व सर जॉन बेजेमान यांच्यासारख्या व्यक्तिमत्वांनाही साथ देत होतं.
 
टेडी बेअरची जितकी रूपं बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत साधारण तितकीच टेडी बेअरची पात्रं साहित्यामध्ये सापडतात.
 
पण या घडामोडी काहीशा विचित्र आणि उकल करता येणार नाहीत अशाही आहेत. खरी अस्वलं प्राणी म्हणून निःसंशयपणे असाधारण आणि विलक्षण असतात. त
 
पकिरी अस्वल असो की ग्रिझ्ली प्रकारातलं अस्वल असो अथवा धृवीय अस्वल असो, ते काही गोंडस पाळीव प्राणी नव्हेत, तर आक्रमक शिकारी म्हणून त्यांची ओळख असते. वन्यप्रदेशात मानवांनी अस्वलांना सामोरं जाणं टाळावं, असाच सल्ला दिला जातो.
 
टेडी रूझवेल्ट यांचं टोपणनाव वेगळं असतं तर? किंवा त्यांनी मिसिसिपीच्या गव्हर्नरचं शिकारीचं निमंत्रण नाकारलं असतं तर? तरीही पुढील शंभर वर्षांच्या कालावधीत कापसाने भरलेल्या अस्वलरूपी बाहुल्या इतक्या लोकप्रिय झाल्या असत्या का?
 
टेडी बेअरच्या इतिहासातील हे काही अनुत्तरित प्रश्न आहेत. अर्थात, कापसाच्या असो वा खऱ्याखुऱ्या असो, अस्वलाची असाधारण भुरळ मात्र नाकारता येत नाही.
 
मी लहान होतो तेव्हा लंडनमधल्या रेजन्ट्स पार्क प्राणिसंग्रहालयातलं ब्रूमस हे धृवीय अस्वल बघून ब्रिटनमधले लाखो लोक भारावून जात असत.
 
युनायटेड किंगडममध्ये बंदिस्त अवकाशात वाढवलेलं हे पहिलंच अस्वल होतं. रेजन्ट्स पार्कमध्ये 1949 साली त्याचा जन्म झाला होता.
 
अलीकडे बर्लिन झूऑलॉजिकल गार्डन्समध्ये जन्मलेलं क्नट हे अस्वल आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये प्रिय झालं होतं. ते हयात असताना त्याची बरीच प्रसिद्ध होत असे आणि त्याच्या मृत्यूनंतरही मोठ्या प्रमाणात शोक व्यक्त करण्यात आला. महाकाय पांडांमध्येसुद्धा अशाच प्रकारची भावनिक गुंतवणूक होताना दिसते.
 
लहानपणीचा आपला एखादा मित्र कधीच आपला विश्वासघात करत नाही किंवा आपल्यापासून दुरावत नाही, अशा मैत्रीची सुरक्षितता बहुधा टेडी बेअरच्या रूपात अनुभवायला मिळत असावी.
 
कारणं काहीही असोत, हत्ती किंवा वाघ किंवा माकडं किंवा शहामृग यांच्या रूपातल्या कापसाच्या बाहुल्या टेडी बेअरसारख्या सर्व वयोगटांतील लोकांना आकर्षून घेणाऱ्या ठरत नाहीत.
 
अलीकडे टेडी बेअरशिवाय जगाची कल्पना करणंही जणू काही अशक्य झालं आहे. म्हणजे विसाव्या शतकातील सर्वांत लक्षणीय शोधांमध्ये आणि सर्वांत टिकाऊ निर्मितीमध्ये टेडी बेअरचा क्रमांक वरचा लागायला हवा.
 
सर जॉन बेजेमान यांचं निधन झालं, तेव्हा त्यांच्या हातात आर्चिबाल्ड ऑर्म्स्बी-गोअर होतं. तसंच सर रॉबर्ट क्लार्क यांना आयुष्यभर साथ करणारा फेलाही मृत्यूसमयी त्यांच्या जवळ होता.
 
आता आज रात्री तुमच्यातील कितीजण स्वतःकडील टेडी बेअर सोबत घेऊन झोपी जातील? असा प्रश्नही विचारायला नको.
 
आणि मी स्वतःचा टेडी बेअर सोबत घेऊन झोपणार आहे का? याचंही वेगळं उत्तर मी द्यायला नकोच.
Published By -Smita Joshi