मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. सावरकर
Written By वेबदुनिया|

सावरकरांचे जातीनिर्मूलक विचार

प्रथम हे लक्षात ठेवले पाहिजे, की जन्मजात जातिभेदामध्ये जे काय आपणांस राष्ट्रीयदृष्ट्या अनिष्टतम असल्याने मुख्यत: उच्छेदावयाचे आहे ते आजच्या जातीतील जन्मजातपणाची नुसती उपपत्ति वा भावना ही नसून तिच्याशी घातलेली मानवी उच्चनीचतेची आणि विशिष्टाधिकारांची सांगड ही होय. अमुक मनुष्य ब्राह्मणकुलात जन्माला, म्हणूनच केवळ, त्याच्यात तसा विशेष गुण नसूनही, त्यास अग्रपूजेचा, वेदोक्ताचा, पूर्वीच्या निर्बंधानुसार अवघयत्वाचा इत्यादी जे विशिष्ट जन्मजात अधिकार वा सवलती देण्यात येतात, त्या तेवढ्या बंद करावयाच्या आहेत. 

अमुक मनुष्य क्षत्रिय कुलात जन्मला म्हणूनच काय ते त्याच्याअंगी तसा कोणताही विशेष गुण नसता, त्यास सिंहासनाचा नि वेदोक्त राज्याभिषेकाचा अधिकारी समजणें आणि शिवाजीसारख्या पराक्रमी पुरुषाने स्वतंत्र राज्य स्थापिले तरी 'तो क्षत्रिय नाही म्हणून सिंहासनाचा अधिकारी होऊ शकत नाही. त्यास आम्ही अभिषेकिणार नाही,' असे म्हणणे हे निर्भेळ मूर्खपणाचेच नव्हे तर घातक असल्याने क्षत्रियत्वाचे ते केवळ जन्मानेच देऊ केलेले विशिष्टाधिकार तेवढे छिनावून घेतले पाहिजेत!

कोणतीही जात दुसरीहून मूलत:च श्रेष्ठ वा कनिष्ठ आहे ही गोष्ट केवळ पोथीत तसे सांगितले आहे म्हणून गृहीत घेता कामा नये. जातिभेदातील ही जन्ममूलक नि केवळ मानवी अशी उच्चनीचतेची भावना आणि हे प्रकट गुणांवाचून मिळणारे विशिष्टाधिकार वजा घातले तर प्रस्तुतच्या जातिभेदांची जी इतर अनेक लक्षणे आहेत, ती आणखी कित्येक वर्षे तग धरून राहिली वा न राहिली तरी त्यामुळे फारशी हानी होणार नाही.

त्या त्या जातीचे धंदे, नांवे, त्यांचे संघ, वरील व्याख्येशी विरुद्ध न जाणारी नि दुसर्‍यास उपसर्ग न देणारी त्यांची विशिष्ट व्रतें, कुळधर्म, कुळाचार, गोत्रपरंपरा प्रभृती शेकडो ज्ञाती विशिष्ट बंधने त्या त्या ज्ञातींनी जरी आणखी काही काळ तशीच चालू ठेवली तरी त्यायोगे अखिल हिंदू राष्ट्राची म्हणण्यासारखी हानी होणार नाही.

मानयी उच्चनीचता नि प्रकट गुणांवाचून केवळ जन्मामुळेच मिळणारे विशिष्टाधिकार हे काढून घेतल्यानंतरही उरणारा जो जातिभेद, तो विषारी दात पाडून टाकलेल्या सापासारखा, आणखी काही काळ जरी वळवळत राहिला तरी फारशी चिंता नाही!अशा प्रकारच्या जातींचे गट म्हणजे आजच्या कूलांसारखेच निरुपद्रवी असतील ब्राह्मण जात म्हणून, गुण नसतानाही विशिष्ट अधिकार असा जर समाजात कोणताही मिळेनासा झाला किंवा भंगीजात म्हणून योग्यता असताही विशिष्ट अधिकारास वंचित व्हावे लागले नाही, तर कुण्या संघाने स्वत:स ब्राह्मण म्हणविले वा मराठा, वैश्य, महार म्हणविले तरी तेवढ्यामुळेच आपसांत परस्परांचा मत्सर वा द्वेष करण्याचे कोणतेही सबळ नि न्याय्य कारण उरणार नाही. आज जसे कोणाचे नांव रानडे असते तर दुसर्‍या कुळाचे आडनाव दिवेकर असते. पण तेवढ्यासाठी त्यांच्यात भांडण लागत नाही. तथापि जर रानडे कुळातील मनुष्य म्हटला की, त्याला गुणाने श्रेष्ठ असो व नसो, गंधाचा अग्रमान किंवा वैद्यभुषण पदवीच्या ताम्रपट दिलाच पाहिजे, नि दिवेकर
कुळातील मनुष्य म्हटला की तो रानड्याहून कितीही सच्छील वा वैद्यकतज्ज्ञ झाला तरी त्यास ते अधिकार मिळणार नाहीत अशी व्यवस्था ठरली - तर रानडे आणि दिवेकर कुळांत मत्सर नि द्वेष उत्पन्न झाल्याविना राहणार नाही.

प्रत्येक व्यक्तीचे नांव नि कुळाचे उपनांव (आडनाव) भिन्न असताही त्यास त्यामुळे जन्मत: कोणतेही विशिष्टाधिकार वा विशिष्ट हानी चिकटविली नसल्यामुळे त्यांच्यात जसे वैषम्य केवळ नामभिन्नतेने गाजत नाही तशीच स्थिती, जन्ममूलक पोथीजात उच्चनीचता आणि विशिष्टाधिकार काढून टाकले असता, ह्या जातींजातींच्या गटांचीही होईल. तेव्हा जन्मजात जातिभेदाचा उच्छेद करावयाचा म्हणजे ह्या जातीजातीतील मानवी उच्चनीच भावनेचा नि तदनुषंगिक विशिष्टाधिकारांचा तेवढा उच्छेद करावयाचा. प्रत्येकाने ही भावना ठेवायची की, जर कोण्‍या जातीत आणि व्यक्तीत एखादा गुण प्रकट होईल तरच नि त्याच प्रमाणात ती योग्य ठरून तदनुषंगिक अधिकारास पात्र होईल.

मोटारहाक्या तो की, जो स्वतः: मोटार चालविण्यात कुशल आहे. त्याचा बाप, आजा, पणजा, मोठा प्रवीण मोटारहाक्या असला तरी तेवढ्यामुळे त्याच्यातही मोटार हाकण्याचे गुण आनुवंशिकाने असलेच पाहिजेत असे गृहीत धरून, त्याच्या मोटारीत जर कोणी शहाणा बसेल तर कपाळमोक्षाचीच पाळी बहुधा येईल. तुला मोटारी हाकण्याचे प्रमाणपत्र मिळाले आहे का? हा मुख्य प्रश्न. जर त्यांच्यात तो गुण आनुवांशिकत: असेल तर तो प्रकट झाला पाहिजे, तो नुसता सुप्त आहे, म्हणून त्यास ते प्रमाणपत्र मिळतां कामा नये. मोटारहाक्याचा अधिकार त्यास गाजवू देता कामा नये! तीच स्थिती राष्ट्रीय प्रगतीच्या मोटारीची. ह्या कामास प्रत्यक्षपणे प्रकट गुणाने जो प्रवीण ठरला तो धुरीण. मग तो जातीने ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, भंगी असो. कपडा उत्तम शिवतो तो शिंपी. मग तो तथाकथित शिंपी जातीचा असो, वा वाणी वा कुणबी असो.