बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. विठ्ठल
Written By
Last Modified: मंगळवार, 13 जून 2023 (09:03 IST)

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याला पिंपरी-चिंचवडमधून भक्तिभावाने निरोप

palkhi 9
पिंपरी :  पहाटेचं आल्हाददायक वातावरण, दिंड्यांमधून ऐकू येणारे अभंगांचे स्वर व दर्शनासाठी भाविकांनी केलेली गर्दी असं चित्र सोमवारी पिंपरी-चिंचवडमध्ये दिसले. निमित्त होते, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे. आकुर्डी येथील मुक्काम संपवून सोहळा पुण्याकडे मार्गस्थ झाला.
 
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा रविवारी सायंकाळी आकुर्डीतील विठ्ठल रखुमाई मंदिरात मुक्कामी पोचला होता. रात्री पालखी तळावर कीर्तन झाले. त्यानंतर जागर झाला. सोमवारी (ता. १२) पहाटे पाच वाजता सोहळा पुण्याकडे मार्गस्थ झाला. तत्पूर्वी संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांच्या उपस्थितीत महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, त्यांच्या पत्नी ईशा सिंह यांच्या हस्ते मंदिरात पादुकांची महापूजा झाली. काकड आरती झाली. त्यानंतर सोहळा मार्गस्थ झाला. पहाटेपासूनच नागरिक जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर दुतर्फा थांबलेले होते. खंडोबा माळ चौकातून सोहळा मुंबई-पुणे महामार्गाने पुण्याकडे निघाला. साडेसातच्या सुमारास पालखी खराळवाडी येथील विठ्ठल मंदिरात सकाळच्या विसाव्यासाठी थांबली. दिंड्याही थांबल्या. तिथे न्याहरी केल्यानंतर सोहळा पुढे निघाला. साडेअकराच्या सुमारास पालखी दापोडी येथे पोहोचली. दुपारची विश्रांती घेतल्यानंतर हॅरीस पुलावरून पुण्यातील बोपोडी प्रवेश केला. आकुर्डी पासून दापोडी पर्यंत रस्त्याच्या दुतर्फा थांबून भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. पारंपारिक वेशभूषा केलेले नागरिक व महाविद्यालयीन तरुणाई पालखीजवळ सेल्फी व फोटो काढताना दिसले. स्थानिक नागरिकांकडून वारकऱ्यांना चहा व नाश्‍ताचे वाटप केले. भक्तीमय वातावरणात पिंपरी-चिंचवडमधील भाविकांनी पालखीला निरोप दिला.