शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. मुस्लिम
  3. मुस्लिम धर्माविषयी
Written By
Last Modified: सोमवार, 15 मे 2023 (07:29 IST)

हज यात्रेच्या नावाने होणारी फसवणूक कशी टाळायची?

hajj yatra
साधारण 2018 सालची ही गोष्ट आहे.
 
राजस्थानच्या कोटा शहरात राहणारे इलाही बक्श अन्सारी हज यात्रेला जाण्याच्या विचारात होते. सोबत पत्नीलाही घेऊन जावं असं त्यांच्या मनात होतं.
 
यात्रेला जाण्यासाठी त्यांना खासगी टूर ऑपरेटरची (दौऱ्याचे नियोजन करणारे) माहिती हवी होती. ती माहिती त्यांना त्यांच्या शेजाऱ्यांकडून मिळाली.
 
ही खासगी प्रवास कंपनी चालवणाऱ्या व्यक्तीचं नाव होतं जमीरुद्दीन. तो बुंदी गावात राहायला होता.
 
इलाही बक्श अन्सारी शिलाई काम करतात.
 
ते सांगतात, "मला माझ्या शेजाऱ्यांनी जमीरुद्दीनची माहिती दिली. त्यानंतर बुंदीत राहणाऱ्या एका नातेवाईकाने मला त्याची माहिती दिली. माझ्या नातेवाईकांनी सांगितलं की, त्याचे वडील काझी आहेत आणि मुलगा अत्यंत सज्जन आहे. हजला जाण्यासाठी मी सरकारी कागदपत्रांची पूर्तता केली. मात्र माझा नंबर लागला नाही. शेवटी मी खासगी प्रवास कंपनीच्या माध्यमातून जाऊ असं ठरवलं. "
 
ते सांगतात, जवळपास वीस लोकांनी जमीरुद्दीनवर विश्वास ठेवून हज यात्रेसाठी आगाऊ रक्कम दिली.
 
हजला जाण्याचं स्वप्न
इलाही बक्श अन्सारी सांगतात, "माझ्या पाचही मुलांची लग्न झाली आहेत. माझी एक जमीन होती, हजला जाण्यासाठी मी ती विकली आणि दोन लोकांसाठी जितकी आगाऊ रक्कम द्यावी लागते (जवळपास सत्तर हजार रुपये) तितकी दिली. माझ्याकडे पैसे भरल्याची पावती सुद्धा आहे."
 
शाहिद नावाच्या व्यक्तीची इलाही यांच्या दुकानात ये-जा असायची. याच दरम्यान हजचा विषय निघाला.
 
शाहिदला देखील आपल्या आई वडिलांना हजच्या उमरासाठी पाठवायचं होतं. उमरा देखील एक धार्मिक यात्रा आहे. हजच्या तुलनेत ही यात्रा लहान असते. म्हणजे हजसाठी वर्षातील पाच दिवस ठरवून दिलेले असतात. मात्र हे पाच दिवस सोडले तर उमरा यात्रा पूर्ण वर्षात कधीही करता येते.
 
शाहिद सांगतात, "मी थेट बँकेत गेलो आणि बँकेतूनच जमीरुद्दीनला 80 हजार पाठवले. आता हे पैसे मी पाठवलेत हे जरी समजत असेल तरी ते कोणत्या कारणासाठी पाठवलेत किंवा मी ते उमराहसाठी पाठवलेत याचा माझ्याकडे कोणताही पुरावा नाही."
 
शाहिद पुढे सांगतात, यात्रेसाठी इलाहीचा नंबर आल्याचं जेव्हा त्यांना समजलं तेव्हा ते खूप खुश होते.
 
ते सांगतात, "आम्ही तयारी सुरू केली. लोक अभिनंदन करू लागले. आधी त्याने दिल्ली विमानाचं आरक्षण करायला सांगितलं. पण पुन्हा ते रद्द करून मुंबई विमानाचं आरक्षण करायला सांगितलं."
 
"आणि त्यानंतर जमीरुद्दीन पळून गेल्याची बातमी आली. त्याने आमचे फोन उचलणं बंद केलं. त्यानंतर त्याचा फोन कधी लागलाच नाही."
 
पण नंतर फसवणूक झाली..
शाहिद सांगतात, "माझे आई वडील खूप दुःखी झाले. आम्ही चांगल्या कामासाठी पैसे दिले होते, पण आमची फसवणूक झाली."
 
ते सांगतात, "आम्ही त्याच्या गावी बुंदीला ही जाऊन आलो, त्याच्या कुटुंबाची भेट घेतली. पण तो इथे राहत नाही आणि जेव्हा तो येईल तेव्हा तुम्हाला सांगू असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. शिवाय आम्ही तुमचे पैसे घेतलेले नाहीत असंही त्यांनी सांगितलं."
 
इलाही सांगतात, "आमच्या कुटुंबातील कोणीही हजला गेलेलं नाही. या पवित्र यात्रेला जाणारे आम्हीच पहिले होतो. पण आम्ही हज करू शकलो नाही ही खेदाची बाब आहे."
 
"या बातमीनंतर माझ्या पत्नीची प्रकृतीही ढासळू लागली. आम्हाला आमचा पासपोर्ट परत मिळाला हेच आमचं नशीब आहे. नाहीतर आम्हाला आणखीन अडचणी आल्या असत्या."
 
या प्रकरणी इलाही आणि शाहिद या दोघांनी तक्रार नोंदवली नाही. पण काही लोकांनी गुन्हे दाखल केलेत.
 
इलाही सांगतात, जमीरुद्दीन आम्हाला म्हणाला की, तुम्ही तक्रार दाखल करू नका, मी तुमचे सगळे पैसे परत करतो. पण त्याने आम्हाला एक फुटकी कवडी सुद्धा दिली नाही.
 
अशी फसवणूक झालेले इलाही आणि शाहिद एकटेच नाहीयेत. पण अशा प्रकारच्या फसवणुकीची अधिकृत आकडेवारीही उपलब्ध नाहीये.
 
फसवणूक कशी टाळाल ?
 
जाणकार सांगतात की, हज किंवा उमरा या पवित्र यात्रा आहेत. यादरम्यान अशाप्रकारे आपली फसवणूक होईल हे लोकांच्या ध्यानीमनी देखील येत नाही.
 
हज यात्रेसंबंधी काही गोष्टी जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. जसं की सौदी अरेबिया आणि भारत सरकार यांच्यात हज कोट्याबाबत एक करार झाला आहे. त्यानुसार 80 टक्के जागा हज कमिटी ऑफ इंडियाला आणि 20 टक्के जागा हज ग्रुप ऑर्गनायझेशन म्हणजेच खासगी प्रवास कंपन्यांना मिळतात.
 
दिल्ली राज्य हज समितीचे माजी अध्यक्ष मुख्तार अहमद सांगतात की, ज्या कोणाला हजची यात्रा करायची आहे त्यांनी केवळ भारत सरकारने ठरवून दिलेल्या खासगी प्रवास कंपन्यांशी संपर्क साधावा.
 
ते पुढे स्पष्ट करतात की, "या यात्रेसाठी कोणतीही सबसिडी दिली जात नाही याची लोकांना माहिती असायला हवी. कोणी जर म्हणत असेल की तुम्हाला व्हीआयपी कोट्यातून पाठवतो तर अशा भूलथापांना बळी पडू नका."
 
त्यानंतरची प्रक्रिया समजावताना अफरोज आलम सांगतात की, "ज्या कोणी हजला जाण्यासाठी अर्ज केलेत त्यांनी अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने प्रसिद्ध केलेली यादी बघावी. यात आपण नोंद केलेल्या खासगी प्रवास कंपनीचं नाव आहे का ते पाहावं."
 
अफरोज आलम हे हज प्रकरणात वार्तांकन करणारे स्वतंत्र पत्रकार आहेत.
 
मौलाना मोहम्मद नसीमुद्दीन मिफ्ताही सांगतात की, "आमच्या औरंगाबादमध्ये 42 खासगी प्रवास कंपन्या आहेत. या कंपन्या सुरुवातीचे दोन तीन वर्ष चांगली व्यवस्था देतात, पण नंतर लोकांचे पैसे घेऊन पळून जातात. अशा खासगी कंपन्यांची चौकशी व्हायला हवी. जिथे पैशांचा व्यवहार केला जातो, त्यासंबंधीची कागदपत्रे ठेवायला हवीत."
 
कोणती काळजी घ्याल?
शहरांतील शिक्षित लोक हज कमिटीच्या वेबसाईटवर जाऊन माहिती बघू शकतात. पण अशिक्षित लोकांचं काय ? किंवा ज्यांना हजला जायचं आहे मात्र त्याविषयी माहिती नाही त्यांचं काय?
 
या प्रश्नावर मुख्तार अहमद सांगतात की, केंद्र सरकारतर्फे वेगवेगळ्या राज्यांना वेगवेगळा कोटा मिळतो. यामध्ये सरकारी आणि नंतर खाजगी अशी वेगळी विभागणी असते.
 
त्यांच्या म्हणण्यानुसार, "हज समितीचे सदस्य प्रत्येक राज्यात मुस्लिम वस्तीत जाऊन काउंटर उघडतात आणि फॉर्म भरून घेतात. हज यात्रेकरूंना मदत व्हावी या उद्देशाने हे काउंटर उघडतात. त्यांच्या पैशाचा गैरवापर होऊ नये म्हणून जागरूकता केली जाते."
 
"हजला जाणाऱ्या व्यक्तीची नोंद ठेवणं, पैशाचे व्यवहार, माहिती देणे, सौदी अरेबियाचा विमानप्रवास, तिथल्या मुक्कामाची सर्व व्यवस्था राज्य हज समितीचे प्रतिनिधी करतात. केंद्रीय हज समिती राज्य समित्यांच्या मदतीने काम करते."
 
पूर्वी हज कमिटी ऑफ इंडिया (एचसीओआय) हज यात्रेकरूंना 2100 रियाल द्यायची. पण 2023 मध्ये आलेल्या हज धोरणानुसार यात्रेकरूंना पर्याय देण्यात आलेत. यात त्यांनी स्वतः याची सोय करावी किंवा त्यांच्या गरजेनुसार पैसे न्यावेत.
 
पूर्वी प्रवाशांकडून घेतलेल्या आगाऊ रकमेतूनच 2100 रियाल दिले जायचे.
 
हजला जाण्याचे नियम आणि कायदे
 
महाराष्ट्रातील एका संस्था मागील तीस वर्षांपासून हज यात्रेकरूंना मार्गदर्शन करते आहे. या संस्थेचे प्रमुख मौलाना मोहम्मद नसीमुद्दीन मिफ्ताही सांगतात की, हजला जाण्यापूर्वी आम्ही लोकांना संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगतो.
 
मौलाना नसीमुद्दीन हे औरंगाबाद येथील खिदमत-ए-हुज्जाज कमिटीचे प्रमुख आहेत.
 
यावेळी औरंगाबाद जिल्ह्यातून सुमारे 1700 लोक हज यात्रेला जात असल्याचं त्यांनी सांगितलं.
 
त्यांच्या मते, हजला जाण्यापूर्वी त्यांना चार गोष्टी सांगितल्या जातात.
 
प्रवास कसा करावा, कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, कोणती कागदपत्रे जवळ बाळगावीत, विमानतळावर कोणत्या प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात अशा सर्व गोष्टी सांगितल्या जातात.
 
त्यानंतर अहराम (यात्रेकरूंनी परिधान केलेले न शिवलेले पांढरे कापड) आणि उमरा बद्दल सांगितलं जातं.
 
हजच्या पाच दिवसांत काय करतात याविषयीही सर्वकाही सांगितलं जातं.
 
इकडे इलाही बख्श अन्सारी रमजानपूर्वी पत्नीसोबत उमरा करून आले. पण शेवटी हजची यात्रा घडली नसल्याची सल त्यांच्या मनात कायम आहे.
Published By -Smita Joshi