शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. डॉ.आंबेडकर
Written By
Last Modified: मंगळवार, 21 जानेवारी 2020 (11:35 IST)

डॉ. बाबासाहेबांची सजगता

राज्य संस्थेच्या सनदशीर राज्य पद्धतीविषयी तयार केलेला नियमावलींचा मसुदा किंवा संहिता म्हणजे आपली राज्यघटना होय. या राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील वंचित घटकांचा विकास व्हावा यासाठी 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' असा मंत्र सर्वच वंचित घटकांना दिला होता. संघटित शक्तीतून समाजाचा विधायक विकास साध्य करता येतो. संघटित होण्याची प्रक्रिया ही आपल्या कुटुंबापासून सुरु होऊन ती देशार्पंत पोहोचावी, हाच गर्भित अर्थ बाबासाहेबांना अभिप्रेत होता. संघटित होणे ही प्रक्रियाच मुळात प्रत्येकाला उत्कर्षाकडे घेऊन जाणारी आहे, हेच खरे.
 
आपल्याला लाभलेले महापुरुष आणि त्यांचे कार्य, त्यांचे विचार ही आपली संस्कार शिदोरी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, वीर सावरकर, शाहू महाराज, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, अहिल्याबाई होळकर यांसारख्या अनेक थोर महापुरुषांनी आपापल्या काळामध्ये तत्कालीन परिस्थितीला अनुसरून विधायक कार्य केले. हे सगळे महापुरुष त्यांच्या कार्याच्या माध्यमातून एका वेगळ्या उंचीवर पोहोचलेले आहेत, आपल्याला त्यांना समजूनउमजून घ्यावे लागेल. ह्या महापुरुषांच्या केवळ मूर्तींचा किंवा छायाचित्रांचा उत्सव साजरा न करता त्यांच्या थोर विचारांचा उत्सव साजरा करणे, त्यांचे विचार आपल्या हृदयात सामावून घेणे ही आजची गरज बनली आहे.
 
बाबासाहेबांनी समाजातल्या वंचित घटकांच्या विकासाच्या मुद्द्याबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा विचारही तितक्याच प्रभावीपणे मांडला आहे. ज्या निसर्गावर मानवाचे संपूर्ण आयुष्य अवलंबून आहे, त्या निसर्गाची काळजी आपण घेत राहणे, त्या निसर्गावर मनापासून प्रेम करत राहणे हे बाबासाहेबांना अपेक्षित होते. भारतीय राज्यघटनेची पायाभूत कर्तव्ये या भागामध्ये, 'पर्यावरण संरक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.' असा उल्लेख आहे. अनुच्छेद 51 मध्ये, 'अरण्ये, सरोवरे, नद्या व अन्य जीवसृष्टी या नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे आणि सजीव प्राण्यांबाबत दयाबुद्धी बाळगणे.' असे नमूद केले आहे. त्याचप्रमाणे कलम 14,19 आणि 48-क या भागामध्ये पर्यावरण संरक्षण संदर्भात विस्तृत माहिती दिली आहे. 
 
पर्यावरण संवर्धनाबरोबरच बाबासाहेबांनी या अनुच्छेदामध्ये विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन आत्मसात करणे आवश्यक असल्याचेही सांगितले आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या माध्यमातून आपल्याला नेहमी जागरूक आणि सतर्क राहता येणे शक्य आहे. त्याचबरोबर आपल्या देशाचे सार्वभौमत्व, एकता व एकसंधता कायम राखणे, विविध धर्मीय लोकांमध्ये बंधुत्वाची भावना दृढ करणे, राष्ट्रीय संपत्तीचे रक्षण करणे, हिंसाचार निषिद्ध मानणे व नशाबंदी यांचा समावेश आहे. आपल्या संविधानात असलेले र्पावरण विषयक मूलंना फाटा देत आर्थिक विकासाच्या मागे लागणे समर्थनीय नाही. जागतिकीकरणाच्या आजच्या आधुनिक युगात निसर्गामध्ये हस्तक्षेप करण्याचे प्रमाण प्रचंड वाढलचे कटू वास्तव आहे. आपण सार्‍यांनी 'पर्यावरण स्नेही' बनणे अपेक्षित आहे. अनेक महत्त्वाच्या विषयांसोबत, विचारांसोबत 'निसर्ग' संवर्धनाचा विचार जोपासणे आणि ज्या निसर्गावर सस्त सजीवांचे अस्तित्व टिकून आहे, त्या निसर्गाचा विचार व त्या संदर्भातली कृतिशील वाटचाल निरंतर करत राहणे किती महत्त्वाचे आहे याची कल्पना आपल्या सर्वांना असणे अभिप्रेत आहे. मानव आणि पर्यावरणाचं नातं अधिक दृढ करण्यासाठी आणि हे नातं चिरकाल टिकवण्यासाठी आपण सारे आता आपल्या चौकटीतून बाहेर पडून पर्यावरण संवर्धनाचे विधायक कार्य हाती घेणे आवश्यक आहे. आपण पर्यावरण रक्षणाची शपथ घेताना कुठल्याही प्रकारचे प्रदूषण मग ते जलप्रदूषण असो, ध्वनिप्रदूषण किंवा वायुप्रदूषण असो, या संदर्भातली जागरूकता जागी ठेवू या. आपल्याला आपल्या महापुरुषांची चरित्रे अजातशत्रू-पद्धतीने वाचायला लागतील, त्यांचे कार्य समजून आणि उमजून घेऊन राष्ट्रबांधणीसाठी निरंतर विधायक कार्य करत राहावे लागेल.

अरविंद म्हेत्र