शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

पुण्यात भिंत कोसळून 15 जणांचा मृत्यू, चार बालकांचा समावेश

पुण्याच्या कोंढवा भागातील तालाब कंपनीजवळ झोपडपट्टीवर भिंत कोसळून 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती NDRF च्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
 
मृतांमध्ये 10 पुरुष, एक स्त्री, आणि चार बालकांचा समावेश आहे. यापैकी दोन मृतदेह NDRF च्या अधिकाऱ्यांनी तर इतर मृतदेह पुणे महापालिका, अग्निशमन दल आणि स्थानिकांनी काढले.
 
काल पुण्यात सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू होता. त्याचप्रमाणे रात्रभर शहरामध्ये पाऊस पडत होता. काल मध्यरात्री ही घटना घडली आहे. NDRF च्या पथकाडून घटनास्थळी असून बचावकार्य सुरू आहे.
 
दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी राम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व मदत कार्याबाबत आवश्यक त्या सूचना केल्या.कोंढवा येथील दूर्घटनेवरून प्रथमदर्शनी असे लक्षात येते की बांधकाम मजुरांसाठी जी राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती, ती सुरक्षित नव्हती. जिल्हा प्रशासनाकडे या बांधकामविषयक सर्व माहिती उपलब्ध असून त्याची चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कारवाई केली जाईल, असंही जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले.
 
"मुसळधार पावसामुळे ही भिंत पडली आहे. बांधकाम कंपनीचा निष्काळजीपणा या घटनेमुळे उघड झाला आहे. 15 लोकांचा मृत्यू ही साधीसुधी बाब नाही." असं नवलकिशोर राम म्हणाले. मृत मजूर बिहार आणि पश्चिम बंगालचे आहेत. शासनातर्फे पीडितांना मदतीचं आश्वासनही दिलं.
 
पुणे पोलीस आयुक्त के.वेंकटेशम यांनीही घटनास्थळाला भेट दिली. ते म्हणाले, "आमची टीम या घटनेमागच्या कारणांची चौकशी करत आहे. जे लोक या घटनेला जबाबदार आहे त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.योग्य परवानग्या आणि खबरदारीचे उपाय घेतले की नाही याची आम्ही चौकशी करत आहोत."