शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Updated : मंगळवार, 16 नोव्हेंबर 2021 (20:48 IST)

'भाई जगतापांनी माझ्या धर्माविषयी अपमानास्पद भाषा वापरली' - झिशान सिद्दीकींचा आरोप

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं असताना मुंबई काँग्रेसमधला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे दिसून येतंय.
 
मुंबई युथ काँग्रेसचे अध्यक्ष आमदार झिशान सिद्दीकी यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्याविरोधात पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
 
'काँग्रेसच्या आक्रोश मोर्चादरम्यान भाई जगताप यांनी आपल्याला धक्काबुक्की केली आणि माझ्याविषयी आणि माझ्या समुदायाविषयी अपमानास्पद भाषा वापरली,' असा आरोप झिशान सिद्दीकी यांनी केला आहे.
सोमवारी (15 नोव्हेंबर) काँग्रेसचे नेते केसी वेणुगोपाल आणि एचके पाटील यांच्या उपस्थितीत मोर्चा काढण्यात आला होता.
 
याआधी नेत्यांची काँग्रेस कार्यालय 'राजगृह' इथं बैठक पार पडली. या यादीत झिशान सिद्दीकींचं नाव नव्हते.
 
मुंबईतील काँग्रेस आमदार आणि यूथ काँग्रेस अध्यक्ष असूनही आपलं नाव यादीत का नाही? असाही प्रश्न झिशान यांनी उपस्थित केला आहे.
 
सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात त्यांनी काय म्हटलं?
'मुंबईत 14 नोव्हेंबरला निघालेल्या मोर्चात भाई जगताप यांनी माझ्यासोबत गैरवर्तन केलं. धक्काबुक्की केली. माझ्या धर्माविषयी अपशब्द बोलले. शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत माझा अपमान करण्यात आला.
पक्षाची प्रतिमा जपावी यामुळे मी तेव्हा काहीच बोललो नाही. परंतु यावर कठोर करावाई व्हावी,' अशी मागणी झिशान सिद्दीकी यांनी पक्ष नेतृत्वाकडे केली आहे.
 
झिशान सिद्दीकी म्हणतात, "पक्षाचा आमदार असल्याने मी राजगृहात गेलो होतो. लोकप्रतिनिधी असल्याने पोलिसांनीही मला प्रवेश दिला. पण जेव्हा भाई जगताप यांनी मला पाहिले तेव्हा त्यांनी मला रोखलं.
 
"ते मला म्हणाले, की आमदार असला तरी आत येता येणार नाही. जो भी हो सब बाहर...
 
"मी त्यांना म्हटलं की, भाई तुम्ही माझे आमदार आहात, माझं रक्षण करण्याऐवजी तुम्हीच माझा अपमान करत आहात हे योग्य नाही.
 
यावर ते म्हणाले, "जो करना है कर " हे ऐकून मला धक्का बसला.
 
"माझ्या युवक काँग्रेसच्या सहकार्‍यांनी मला धक्काबुक्की करताना पाहिल्यानंतर त्यांना मागे ढकलले. पक्षाच्या प्रतिमेसाठी मी हस्तक्षेप केला. पण माझ्यासारख्या आमदाराला ही वागणूक दिली जात असेल तर सामान्य कार्यकर्त्यांचे काय, त्यांच्या सुरक्षेचे काय?"
 
आपण धर्मनिरपेक्षता आणि समता या मूल्यांवर भाजपच्या विचारधारेशी लढत आहोत. पण भाई जगतापांची वागणूक निंदनीय आहे. यापूर्वीही सातत्याने भाई जगताप यांनी आपल्यावर अन्याय केला आहे, असं झिशान सिद्दकी यांनी म्हटलंय.
 
तर "आमच्या पक्षात लोकशाही आहे. त्यामुळे कोणीही सोनियाजी गांधींना पत्र लिहू शकतं. तो युथ कॉंग्रेसचा आपआपसातला वाद आहे. मला याबद्दल यापेक्षा जास्त काहीही बोलायचं नाही," असं याविषयी बोलताना भाई जगताप यांनी म्हटलंय.