शनिवार, 1 ऑक्टोबर 2022
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified मंगळवार, 16 नोव्हेंबर 2021 (11:59 IST)

कोरोना लशीचा प्रभाव कमी होतोय, तिसरा डोस घ्यावा लागणार?

लशीमुळे निर्माण होणारी प्रतिकारशक्ती क्षीण होऊ लागल्यामुळे कोव्हिड लशीचे दोन डोस घेतलेल्या व्यक्तींचाही मृत्यू होत असल्याचा इशारा डॉक्टर आणि युकेमधील हेल्थ सिक्युरिटी एजन्सीनं दिला आहे. त्यामुळे कोव्हिड लशीमुळे आपण खरंच सुरक्षित आहोत का प्रश्न उपस्थित होत आहे.
 
पण या प्रश्नाचं उत्तर शोधण्याआधी आपण काही अगदी मूलभूत गोष्टींचा विचार करूया.
 
शरीराची प्रतिकारशक्ती दोन पातळ्यांवर काम करते- संसर्ग होण्यापासून वाचवते आणि जर संसर्ग झालाच तुमच्या शरीरातून तो दूर करणं.
 
आता तुम्ही तुमच्या कल्पनाशक्तीला थोडासा ताण द्या आणि एखाद्या किल्ल्याचं चित्र डोळ्यांसमोर आणा...या किल्ल्याभोवती शत्रूचा वेढा पडला आहे आणि कोरोना विषाणूंचं सैन्य आत घुसण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
किल्ल्याची पहिली संरक्षक भिंत असेल सगळ्यांत बाहेरची तटबंदी ज्यावर गस्त घालणारे तिरंदाज आहेत. आपल्या शरीराचा विचार केला तर हे तिरंदाज म्हणजे न्यूट्रलायजिंग अँटीबॉडीज.
 
जर या अँटीबॉडीज विषाणूंचा संसर्ग थोपवू शकल्या, तर तुम्हाला संसर्ग होत नाही. पण जर ही तटबंदी कोसळली आणि तीरंदाज अँटीबॉडीज निष्प्रभ ठरल्या तर विषाणू शरीरात प्रवेश करतात. त्यावेळी तुम्हाला संसर्ग होतो.
 
पण तरीही फार धोका नसतो, तुमच्या किल्ल्याच्या आतमध्येही सैन्य असतं. ते म्हणजे तुमच्या मेमरी B आणि मेमरी T पेशी. या पेशी म्हणजे घोड्यावर स्वार होऊन लढणारे योद्धे असतात. ते तुमच्या शरीरात घुसलेल्या घातक विषाणूंना पिटाळून लावू शकतात.
 
कोव्हिडची लस ही तुमच्या शरीरातील या सैनिकांना- ज्यामध्ये अँटीबॉडीज आणि मेमरी पेशींचा समावेश असतो- कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यावर कशी प्रतिक्रिया द्यायची याचं प्रशिक्षण देत असते.
या दोघांपैकी एका सैनिकाची शक्ती क्षीण होत आहे आणि यात काही आश्चर्य आहे. हे प्रत्येक लशीनंतर किंवा संसर्गानंतर होत असतं.
 
"काळासोबत अँटीबॉडीज क्षीण होतात हे दिसून आलं आहे. त्यातून आपल्यामध्ये काही कमतरता निर्माण होतात," असं प्रोफेसर एलिनॉयर रिले यांनी म्हटलं. ते एडिनबर्ग युनिव्हर्सिटीमध्ये इम्युनोलोजिस्ट आहेत.
 
आपल्या शरीरातील अँटीबॉडीजचा पाडाव होणं हे डेल्टा व्हेरिएंट आल्यापासून अधिक प्रमाणात होत आहे. या विषाणूची संसर्गक्षमता अधिक आहे. एका अर्थानं कोरोना व्हायरसचा डेल्टा व्हेरिएंट हे असं सैन्य आहे, जे आपल्या शरीराच्या किल्ल्याची तटबंदी म्हणजेच अँटीबॉडीजचा पाडाव करून आतमध्ये घुसतं.
 
याचे परिणाम तुम्ही स्वतः अनुभवले असतील- ज्या लोकांनी कोव्हिड लशीचे दोन डोस घेतले आहेत, त्यांनाही कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. एका प्रसिद्ध न झालेल्या संशोधनातून असं समोर आलं की, अस्ट्राझेन्का लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर कोव्हिडची लक्षणं 66 टक्क्यांनी कमी झाली होती. पाच महिन्यांनंतर हे प्रमाण 47 टक्क्यांवर आलं.
 
फायझर लशीसाठी हे प्रमाण 90 टक्क्यांवरून 70 टक्क्यांपर्यंत घसरलेलं पाहायला मिळालं.
 
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सरकारांसाठी ही आकडेवारी निश्चितच चिंता वाढवणारी आहे.
 
कारण प्रतिकारशक्तीच्या यंत्रणेतील पहिल्या फळीचा बचाव मोडून शरीरात घुसणाऱ्या कोरोना विषाणूला थांबवणं हे दुसऱ्या फळीसाठी आव्हान ठरतं. अर्थात, लशीमुळे काही लोकांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळ येत नाही हेही खरं आहे.
ब्रिस्टल विद्यापीठातील प्राध्यापक आणि सरकारचे लसीकरणासंबंधीचे सल्लागार प्रोफेसर अडम फिन सांगतात, "लस न घेतलेल्या आणि लस घेतलेल्या लोकांचंही रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण लक्षणीय आहे. तुलनेनं सौम्य अशा संसर्गामुळे मिळालेलं संरक्षण हे चटकन क्षीणही होत आहे."
 
संसर्गामुळे रुग्णालयात दाखल होण्याचा किंवा अगदी प्राणांवरही बेतण्याचा धोका हा वयस्कर लोकांमध्ये अधिक आहे. कोव्हिड लशीचे दोन डोस झाल्यानंतरही कोरोना संसर्गामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांमध्ये 70 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांच प्रमाण अधिक आहे. दोन डोस घेतल्यानंतर कोरोना संसर्गामुळे मृत्युमुखी पडण्याचा धोका तरुणांमध्ये कमी आहे.
 
वयोमानानुसार आपल्या शरीरातील पेशींची पण झीज होत असते- प्रतिकारशक्ती निर्माण करणाऱ्या पेशींचाही याला अपवाद नाही. त्यामुळे वय जसं वाढतं, तसं शरीराच्या प्रतिकार क्षमतेला लशीच्या माध्यमातून प्रशिक्षित करणं कठीण बनतं.
 
त्यामुळेच संसर्ग झाल्यानंतर शरीराच्या प्रतिकारशक्तीचा प्रतिसाद क्षीण असतो. कदाचित शरीरातील अँटीबॉडींची बरीचशी झीज झालेली असल्यामुळे असेल, प्रतिकारशक्तीमधला हा कमकुवतपणा संसर्गासमोर उघड होतो.
 
"ज्येष्ठ नागरिकांना सुरुवातीच्या काळात नक्कीच संरक्षण मिळालं असेल, पण आता अँटीबॉडीज क्षीण झालेल्या असताना त्यांच्या शरीरातील संरक्षणाची दुसरी यंत्रणा कार्यक्षम असेलच असं नाही," प्राध्यापक एलिनॉयर रिले सांगतात.
 
"कदाचित त्यामुळेच वृद्ध, नाजूक प्रकृतीच्या व्यक्तींना दोन डोसनंतरही धोका असतो."
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासूनच संसर्गाचा धोका वाढण्यामध्ये वय हा घटक महत्त्वाचा ठरत होता. त्यामुळे बहुतांश देशांनी ज्येष्ठ नागरिकांना सर्वांत आधी लस द्यायला सुरूवात केली, जेणेकरून त्यांची प्रतिकारशक्ती ही अधिक काळ टिकून राहील.
 
कॅन्सरचे रुग्ण किंवा अवयव प्रत्यारोपण झालेल्या व्यक्ती यांची प्रतिकारशक्ती कमकुवत झालेली असते, त्यामुळे त्यांचं शरीर लशीला प्रतिसाद देण्यात अडचणी येतात.
 
ऑक्सफर्ड-अस्ट्राझेनेका आणि फायझर-बायोएनटेक लशींनी कोरोनापासून युकेमधील लोकांचा बचाव करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली हे नाकारताही येणार नाही.
 
प्रतिकार यंत्रणेच्या वेगवेगळ्या भागांसाठी या लशी उपयुक्त ठरल्या असल्याचं डॉ. पॅरी यांनी म्हटलं.
 
" mRNA लस (फायझर) ही अँटीबॉडी तयार करण्यासाठी उपयुक्त आहे, तर ऑक्सफर्ड-अस्ट्राझेनेकाची लस ही टी-पेशींचा प्रतिसाद वाढवायला मदत करते."
 
आता आपण आपल्या किल्ल्याकडे परत जाऊया. फायझरची लस आपल्या किल्ल्याची बाहेरची तटबंदी सांभाळते, तर अस्ट्राझेनेकाची लस आतली बाजू लढवते.
 
तयार झालेली प्रतिकारशक्ती हळूहळू क्षीण होत जात असली, तरी या दोन्ही अत्यंत उत्तम लशी आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर लोकांना अशा लशीची अपेक्षा होती की, ज्यामुळे मृत्यूदर 50 टक्क्यांनी कमी होईल.
 
प्रतिकारशक्ती क्षीण होत असली आणि संसर्गाचा धोका असलेल्या वयोगटात हे प्रमाण अधिक असलं, तरी लशीमुळे मिळणारं संरक्षण हे 80-90 टक्क्यांच्या दरम्यान आहेच.
या सगळ्यांत दिलासा देणारी बाब म्हणजे युकेमध्ये बूस्टर डोस द्यायला सुरूवात झाली आहे. सध्याच्या घडीला 11 दशलक्ष लोकांना बूस्टर डोस देण्यातही आला आहे. याचाही सकारात्मक परिणाम दिसत आहे.
 
ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिक्सच्या आकडेवारीवरून असं समोर आलं आहे की, बूस्टर डोसमुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये अँटीबॉडीजचं प्रमाण वाढलं आहे.
 
आता बूस्टर डोसमुळे कोरोना संसर्गाचं प्रमाण आणि मृत्यूदर कमी होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.