शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 22 ऑक्टोबर 2022 (22:25 IST)

कोरोनाची लागण झाल्यास काही वर्षांनी हार्ट अटॅक येऊन अचानक मृत्यू होऊ शकतो का?

heart attack women
गियरमो लोपेझ लुक
गेल्या वर्षभरात भारतात हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याच्या घटनांमध्ये वाढ झालीय. अचानक उठता- बसता, नाचताना, व्यायाम करताना हार्ट अटॅक आल्याचे व्हीडिओ समोर आलेत.
 
अचानकचं हार्ट अटॅक येऊन हे लोक जमिनीवर कोसळल्याचं व्हीडिओमध्ये दिसतं आणि नंतर तर या लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येते. यातल्या काही लोकांना आधीच हृदयाशी संबंधित आजार असल्याचंही समोर आलंय.
 
हार्ट अटॅकशी संबंधित काही प्रकरण नुकतीच समोर आली होती.
 
46 वर्षीय कन्नड अभिनेता पुनीत राजकुमारचं हार्ट अटॅकने निधन झालं
टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचं वयाच्या 41 व्या वर्षी हार्ट अटॅकने निधन झालं.
तर हल्लीच कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचा जिममध्ये व्यायाम करताना मृत्यू झाला. त्यांनाही हार्ट अटॅक आला होता आणि ते 59 वर्षांचे होते.
जम्मू-काश्मीरमध्ये 21 वर्षीय मुलगा स्टेजवर डान्स करताना कोसळला. हार्ट अटॅकने त्याचा मृत्यू झाला.
मुंबईत गरबा खेळत असताना एका 35 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला.
मागच्या आठवड्यात 33 वर्षीय जिम ट्रेनर बसलेल्या ठिकाणीच बेशुद्ध पडला. त्यालाही हार्ट अटॅक आला होता आणि यातच त्याचा मृत्यू झाला.
आता यातल्या किती जणांचा कोरोनाशी संबंध होता याची माहिती उपलब्ध नसली तरी आजकाल हार्ट अटॅकला कोरोनाशी जोडून पाहिलं जातंय.
 
सध्या भारतात कोव्हीडशी संबंधित रुग्णांची संख्या कमी झाली असली, तरी लोकांच्या आरोग्यावर याचे दूरगामी परिणाम होणार असल्याची चिंता यापूर्वीही डॉक्टरांनी व्यक्त केली होती.
 
त्यामुळे कोरोना आणि हार्ट अटॅक यांचा काही सहसंबंध आहे का? हृदयावर कोरोना लसीचा काही परिणाम होतोय का? हे बघायला हवं.
 
कोरोनामुळे आपल्याला सामान्य सर्दी पडशापासून ते न्यूमोनियापर्यंतचे आजार होतात. पण त्याव्यतिरिक्त श्वसनाशी संबंधित आणि हृदयाशी संबंधित इतर आजारही उद्भवण्याची शक्यता असते.
 
कोरोना संक्रमणानंतर जी माहिती समोर आली त्यात असं म्हटलंय की, कोरोनामुळे लोकांचं आयुर्मान कमी होतं. म्हणजेच लोकांचा अकाली मृत्यू होऊ शकतो.
 
स्पॅनिश फ्लूमुळे आपल्याला बऱ्याच गोष्टी समजल्या
1918 मध्ये स्पॅनिश फ्लू आल्यानंतर वैज्ञानिक साहित्यात काही गोष्टींची नोंद करण्यात आली. यात ब्रेन फॉग आणि सातत्याने येणाऱ्या थकव्याविषयी लिहून ठेवण्यात आलं. ब्रेन फॉग म्हणजे व्यक्तीच्या विचार प्रक्रियेत शिथिलता येते. त्यांना गोष्टी लक्षात ठेवायला अडचणी येतात, एका ठिकाणी लक्ष केंद्रित करणं कठीण होतं. कोरोनामध्येही या गोष्टी दिसून आल्या.
 
स्पॅनिश फ्लू मध्ये सामान्य लक्षणं तर आढळून आलीच पण त्याव्यतिरिक्त इतरही परिणाम दिसून आले. या फ्लू नंतर हार्ट अटॅकच्या प्रकरणात वाढ झालेली दिसून आली. 1940 ते 1959 च्या दरम्यान हार्ट अटॅकची अशी काही लाट आली होती की या लाटेने संपूर्ण जग हादरवून सोडलं होतं.
 
हार्ट अटॅकची एवढी प्रकरण समोर येणं आणि त्याची कारणं न समजणं खूप अवघड होतं. पण आज आपल्याला समजतंय की त्या स्पॅनिश फ्लूमुळे हार्ट अटॅकच्या प्रकरणात वाढ झाली होती. म्हणजे या व्हायरसच्या तावडीतून जे लोक सुटले त्यांच्यात एक प्रकारचा टाईम बॉम्ब लावण्यात आला होता. हे लोक बरे तर झाले होते, पण पूर्णपणे नाही.
 
हृदयाशी संबंधित या आजाराने पुरुषांना मोठ्या प्रमाणावर ग्रासलं होतं. याचं कारण असं होतं की, 1918 मध्ये 20 ते 40 वर्ष वयोगटातील पुरुषांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आणि नंतर त्यांना या आजारांनी ग्रासलं.
 
1918 मध्ये हा विषाणू आला होता. या काळात आईच्या पोटात असतानाच या फ्लूची लागण झालेल्या मुलांना 60 वर्षांनंतर देखील हृदयाशी संबंधित आजारांचा धोका असल्याचं उघड झालं.
 
त्यानंतर बरेच अभ्यास झाले. यात असं दिसून आलं की, इन्फ्लूएन्झा व्हायरसच्या संसर्गामुळे एथेरोस्क्लेरोटिक प्लेक्स वाढतात. हे प्लेक्स रक्तवाहिन्यांमध्ये जमा होतात आणि रक्तप्रवाहात अडथळा निर्माण करतात. यामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो. तेच दुसरीकडे रक्तवाहिन्यांमध्ये जे एंडोथेलियम असतं, त्याची हानी झाल्यासही प्लेक्स तयार होतात आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो.
 
कोरोना आणि हृदयाशी संबंधित आजार
साथीच्या सुरुवातीच्या काळात लोकांच्या आरोग्यासंबंधीचा बराच डेटा गोळा करण्यात आला होता. यात असं दिसून आलं की, कोरोनाचा संसर्ग झाल्यावर लोकांमध्ये हृदयाशी संबंधित आजारांमध्ये वाढ झाली आहे.
 
यात हार्ट फेल्युअर, मायोकार्डियल डॅमेज, अॅरिथमिया आणि अ‍ॅक्युट कोरोनरी सिंड्रोम यांसारखे आजार वाढल्याचं दिसलं.
 
कोरोना संसर्गामुळे हार्ट अटॅकच्या शक्यता वाढल्यात. यामागे दोन शक्यता देण्यात आल्या आणि यासाठी काही पुरावे देण्यात आले.
 
जेव्हा एखादा व्यक्ती कोरोनाने संक्रमित होतो तेव्हा त्याचं शरीर या विषाणूला रिअॅक्ट करतं. यात त्या व्यक्तीच्या हृदयाला नुकसान पोहोचण्याची शक्यता असते.
 
यात रक्तवाहिन्या मोठ्या होतात आणि रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण होतो. कारण रक्तप्रवाह सुरळीत राहण्यासाठी जागाच उरत नाही. याला व्हॅस्क्युलर इंफ्लेमेशन म्हणतात.
 
त्यात ज्यांना आधीच हृदयाशी संबंधित आजार आहेत त्यांची परिस्थिती आणखीनच अवघड होते.
 
एसीई-2 या प्रोटीनचा वापर करून कोरोना विषाणू माणसांच्या शरीरात प्रवेश करतो. आपल्या शरीरातील रक्तवाहिन्यांमध्ये असलेल्या एंडोथेलियल पेशींमध्ये या प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं.
 
हे प्रोटीन हृदय नीट सुरू राहावं यासाठी, ब्लड प्रेशर, इलेक्ट्रोलाइट कंट्रोल आणि मज्जातंतूंच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असतं.
 
गर्भपाताची प्रकरणं वाढली
कोरोना विषाणू थेट एंडोथेलियमवर अटॅक करत असल्याने प्लासेंटाला सुद्धा हानी पोहोचते आणि गर्भपात होतो. म्हणजे गर्भवती माता आणि अर्भक यांच्यात जी नाळ असते त्याचं नुकसान होतं. त्याचप्रमाणे गर्भवती महिलांना कोरोना विषाणूचं संक्रमण झाल्यावर त्यांचं ब्लड प्रेशर असंतुलित होतं आणि गर्भपात होतो.
 
याव्यतिरिक्त इतरही अनेक अभ्यास झाले. यात असं म्हटलंय की, जर महिला कमी महिन्यांची गरोदर असेल आणि तिला कोरोनाची लागण झाली तर भ्रूणाच्या अवयवांचं नुकसान होतं.
 
लस आणि मायोकार्डिटिस?
एंडोथेलियमवर जे प्रोटीन एस असतं त्याचा संबंध रक्तवाहिन्यांच्या नुकसानाशी जोडलेला आहे आणि याचं कारण एमआरएनए वॅक्सीन असल्याचं सांगितलं जातं. वॅक्सीनमध्ये जे एमआरएनए असतं ते शरीराच्या उतींमध्ये प्रोटीन एस बनवतं. जेणेकरून आपली रोगप्रतिकारक यंत्रणा विषाणूला ओळखून त्याच्यावर हल्ला करेल. मात्र यामुळे जे नुकसान होतं ते दाखवता येत नाही.
 
वॅक्सीनमुळे रक्तवाहिन्यांची हानी होत असल्याचे दावे करण्यात आले असले तरी वैज्ञानिक डेटा या दाव्यांचं समर्थन करताना दिसत नाही.
 
जेएएमए या मेडिकल जर्नलमध्ये एक आकडेवारी प्रकाशित करण्यात आली आहे. यात म्हटलंय की, अमेरिकेतील 19 कोटी 25 लाख लोकांना लस देण्यात आली. यातल्या 84 लाख लोकांमध्ये मायोकार्डिटिसची (हृदयाच्या नसांमध्ये सूज) लक्षणं आढळून आली. यातल्या 92 लोकांना विशेष उपचारांची आवश्यकता भासली. मात्र यात कोणाचाही मृत्यू झाला नव्हता.
 
आता या गोष्टींबद्दल विशेष अशी काळजी करण्याचं कारण नाही. लस घेतल्यानंतर लोकांमध्ये मायोकार्डिटिसची सौम्य लक्षणं आढळून आली आहेत. मात्र त्यांच्यात इनफ्लेमेशन वाढू शकतं. पण प्रोटीन एस मुळे नुकसान होतंय हे थेट काही दिसून आलेलं नाही.
 
किंबहुना लसीकरणानंतर रक्तातील प्रोटीन एसची पातळी खूपच कमी होते आणि एंडोथेलियमवर जो परिणाम होतो तो ही काही दिवसांत बंद होतो.
 
रक्तवाहिन्यांचं नुकसान टाळण्यासाठी लस
आतापर्यंत जो डेटा मिळालाय आणि भूतकाळात जी साथ आली होती त्यावरून आपल्याला असं म्हणता येईल की, कोरोनामुळे श्वसनासंबंधी आजारापेक्षा हृदय रोगाचा धोका वाढतो. यामुळे लोकांचं आयुर्मान कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोना संक्रमणानंतर लगेच महिन्यात असो वा काही वर्षांनंतर असो, मृत्यू होऊ शकतो.
 
पण यात चांगली गोष्ट काय असेल तर लसीकरण. कोरोना संसर्गावर लस प्रभावी ठरली आहे. म्हणजे लसीमुळे कोरोनाचा विषाणू आपल्या शरीरात येणार नाही. अर्थात रक्तात येणार नाही, मग त्याचा हृदयापर्यंत जाण्याचा संबंधच येत नाही.
 
शिवाय आपण कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून खबरदारी घेतली पाहिजे. कारण लसीकरणामुळे फक्त जीव वाचतो.
 
(हा लेख बीबीसी स्पॅनिश भाषेतील वेबसाईट बीबीसी मुंडोवर पब्लिश करण्यात आला आहे. गियरमो लोपेझ हे ल्यूक एंडालुसियन सेंटरमध्ये डेव्हलपमेंट बायोलॉजीचे प्राध्यापक आणि संशोधक आहेत. सोबतच त्यांनी सविल येथील पाब्लो दे ओलावाइड विद्यापीठात मेटाबॉलिजम, एजिंग, इम्यून आणि एंटीऑक्सीडेंट सिस्टमवर संशोधन केलंय. त्यांचा हा लेख 'द कनवर्सेशन' मध्ये प्रकाशित करण्यात आला होता. त्याची मूळ लिंक तुम्ही इथे पाहू शकता.)

Published By -Smita Joshi