जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी केल्यास सात वर्षांपर्यंत कैद- छगन भुजबळ
राज्यात जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी करून चढ्या दरानं विक्री केल्यास सात वर्षांपर्यंत कैद होऊ शकते. तसंच संबंधित व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.
राज्यात जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी आणि त्यांची चढ्या दरानं विक्री होत असल्याच्या अनेक तक्रारी मिळत आहेत. जीवनावश्यक वस्तूंची कोणतीही टंचाई नसून किराणा दुकानांमधून वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी सरकारी यंत्रणा खबरदारी घेत असल्याचं भुजबळ यांनी म्हटलं आहे.
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काही व्यापाऱ्यांकडून वस्तूंचा काळाबाजार आणि अतिरिक्त भाव वाढ केली जात आहे. राज्याच्या जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी आणि भाववाढ नियंत्रित करण्यासाठी पथकं तयार करण्यात आली आहेत. ही पथकं किरकोळ तसंच घाऊक व्यापार प्रतिष्ठानं, गोदामं, शीतगृहं इत्यादी ठिकाणी असलेल्या जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता आणि दरांची पडताळणी करून कारवाई करतील, असंही या बातमीत म्हटलं आहे.