काम करता करता सिगारेट ब्रेक घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. साधारणपणे, चहा, कॉफी किंवा सिगारेट यांच्यासाठी ब्रेक घेणं ही बाब इतकी मोठी मानली जात नाही. पण आता पुढे वारंवार सिगारेट ब्रेकसाठी गेलात तर खिशाला कात्री लागू शकते.
स्पेनच्या एका कंपनीने याबाबत एक याचिका कोर्टात दाखल केली होती. सिगारेट ब्रेक घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची पगारकपात करण्याबाबत स्पेनच्या एका कोर्टाने कंपनीच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यामुळे सिगारेट ब्रेक घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची पगार कपात करण्याचा अधिकार या कंपनीला प्राप्त झाला आहे.
या निकालाची अंमलबजावणी करणार असून कामाव्यतिरिक्त वेळ घालवणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार कापत असल्याचं ऊर्जा क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या गल्प या कंपनीनं म्हटलं आहे.
एखादी झटपट घेतलेला कॉफी ब्रेक असो किंवा सहकाऱ्यासोबत नाश्ता करण्यासाठी लागलेला वेळ, गल्पच्या धोरणांनुसार आता याचा पगार कापण्यात येत आहे. मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये ही नियमावली लागू करण्यात आली होती.
कर्मचारी संघटनांनी या निर्णयाचा विरोध करत कंपनीला कोर्टात खेचलं होतं.
स्पॅनिश कायद्यांच्या नुसार, कंपनीसाठीच्या नियमावलीत बदल करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांच्या येण्या-जाण्याच्या वेळेची नोंदणी करणं अनिवार्य करण्यात आलं.
ही देखरेख कर्मचाऱ्यांची होणारी पिळवणूक रोखण्यासाठी तसंच कामातील लवचिकता वाढवण्यासाठी करण्यात आली होती.
एका आकडेवारीनुसार, स्पेनमध्ये 2019 मध्ये तीस लाख तास ओव्हरटाईम करण्यात आलं. पण याचा मोबदला कर्मचाऱ्यांना मिळाला नाही. कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत असल्यामुळे तसंच त्यांना विनामोबदला ओव्हरटाईम करावं लागत असल्यामुळे त्यावर उपाय म्हणून वरील नियम लागू करण्यात आला.
पण या निर्णयाचा स्पेनमधील सुमारे 10 लाख धुम्रपानकर्त्या कर्मचाऱ्यांवर परिणाम झाला आहे.
कर्मचारी कार्यालयात कधी येतात, कधी जातात, या सगळ्यांची नोंद ठेवण्यात येऊ लागली. त्याद्वारे ते किती वेळ काम करतात याची आकडेवारी कंपन्या ठेवू लागल्या.
गल्प या कंपनीत आपल्या कामाच्या वेळेत जेवण करणाऱ्या किंवा सिगारेट ब्रेकसाठी बाहेर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना पूर्ण दिवसाचा पगार देण्यात आला नाही. या कालावधीतले त्यांचे पैसे कापण्यात आले.
आता स्पेनच्या हाय कोर्टानेही सिगारेट, कॉफी किंवा नाश्त्यासाठी ब्रेक घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्या वेळेचे पैसे देण्यात येऊ नयेत, असा आदेश दिला आहे. त्यामुळे सिगारेट ब्रेक घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची पगारकपात होणार हे निश्चित.
एका आकडेवारीनुसार युरोपीय देशांमध्ये स्पेनचे कर्मचारी सर्वांत जास्त काम करतात. पोर्तुगाल किंवा इटली यांच्याप्रमाणे स्पॅनिश लोक आपला जास्तीत जास्त वेळ कार्यालयाच्या ठिकाणी घालवतात.