- सोफिया स्मिथ गॅलर
'मुलांना शिकवा सेक्सबद्दल' हे वाक्य ऐकलं तरी बहुतेक लोक अंगावर पाल पडल्यासारखे किंचाळतील. काहीही काय? पण कधी नव्हे ते आता मुलांना सेक्सबद्दल शिकवण्याची गरज आलीये.
कारण सध्याच्या या डिजिटल जगात मुलांना एका अशा विश्वासार्ह माहितीच्या स्रोताची गरज आहे जिथे ते आपले प्रश्न घेऊन जाऊ शकतील आणि तिथे त्यांचं शोषण होणार नाही.
अनेक अभ्यासांमधून समोर आलंय लहान मुलांसाठी सेक्सची माहिती मिळवण्यासाठी सर्वांत चांगला स्रोत त्यांचे पालक आहेत.
मी 27 व्या वर्षी दुसऱ्या व्यक्तीला काँडम कसा घालायचा हे कसं शिकवायचा हे शिकत होते. वाचताना जरा गुंतागुंतीचं वाटेल, पण मी सेक्स एज्युकेटर बनण्याचा कोर्स करत होते.
जवळपास 15 सेक्स एज्युकेटर्स आणि मी असे सगळे आपआपल्या घरात कॉम्प्युटरसमोर बसलो होतो. आमच्या हातात एक केळ होतं आणि एखाद्याला काँडम कसा घालून दाखवायचा हे झूमवरून शिकत होतो.
आमचे ट्रेनर म्हणाले, "अनेकदा आपण फ्लेवर्ड काँडम्स वापरतो. कारण त्याचा वास अजून उत्तेजक वाटतो."
एवढं बोलून झाल्यावर त्यांनी एक मिनिटाचा पॉझ घेतला आणि आमच्याकडे बघितलं. आमचे हावभाव बघून ते म्हणाले, "हे पाहा आपण लाजून, किंवा अवघडून चालणार नाही. हे करताना तुम्ही सहजपणे करायला हवं, कारण हेच तुम्ही वयात येणाऱ्या मुलांना शिकवणार आहात. त्यांनाही अवघडलेपणा, लाजरे-बुजरेपणा आणि अपराधी वाटायला नको. तुम्ही त्यांना सुरक्षित सेक्सची साधनं वापरण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे."
अनेक पालकांना मुलांशी सेक्सबद्दल बोलताना असाच अवघडलेपणा जाणवतो. कसं बोलावं, काय बोलावं असा प्रश्न पडतो, लाज वाटते.
अर्थात अनेक देशांमध्ये सेक्स हा शब्दही पालक मुलांसमोर उच्चारत नाहीत तर काही देशांमध्ये मोकळेपणा आहे.
उदाहरणार्थ एका अभ्यासात दिसून आलं होतं की ब्रिटिश पालक त्यांच्या मुलांना सेक्सबद्दल माहिती देताना लाजतात, मोकळेपणाने बोलत नाहीत, त्यांना अनेकदा वाटतं की मुलांना शिक्षित करण्यासाठी ते योग्य व्यक्ती नाहीत.
या उलट या अभ्यासात दिसून आलं की नेदरलँड्स किंवा स्वीडनसारख्या देशांमध्ये पालक आपल्या मुलांशी सेक्सबद्दल मोकळेपणाने बोलतात. परिणामी या देशांमध्ये किशोरवयात गरोदरपण आणि लैंगिक रोगांचं प्रमाण जगातल्या इतर देशांच्या तुलनेत फारच कमी आहे.
जे पालक आपल्या मुलांना लैंगिक शिक्षण देण्यासाठी लाजतात त्यांना एका वेगळ्याच मानसिक द्वंव्दाला सामोरं जावं लागतं. एका बाजूला आजच्या डिजिटल युगात जिथे एका क्लिकवर मुलांना सेक्सची प्रचंड माहिती उपलब्ध आहे, तिथे आपल्या मुलांना योग्य माहिती मिळावी असंही त्यांना वाटतं, पण मुलांशी कसं बोलावं, कोणत्या वयापासून लैंगिक शिक्षण सुरू करावं अशा प्रश्नांची उत्तरं त्यांना सापडत नाहीत.
मोनक्लेर स्टेट विद्यापीठाच्या प्राध्यापक इव्हा गोल्डफ्रॅब यांनी गेल्या 30 वर्षात लैंगिक शिक्षणावर जे साहित्य आलं, जे अभ्यास झाले, त्यांचा सविस्तर अभ्यास केलेला आहे.
गोल्डफ्रॅब यांचं संशोधन शाळेत मुलांना देण्यात येणाऱ्या लैंगिक शिक्षणाशी संबधित असलं तरी त्यात पालकांसाठीही महत्त्वाचे धडे आहेत असं त्या म्हणतात.
यातला सगळ्यांत मोठा धडा म्हणजे लैंगिक शिक्षण दिल्याचा एक सकारात्मक, दीर्घकाळ टिकणारा परिणाम या मुलांच्या मनावर झाला. या मुलांना पुढच्या आयुष्यात सुदृढ नातेसंबंध, प्रेम मिळाले.
गोल्डफ्रॅब यांनी पालकांना सल्ला दिलाय की मुलांना लैंगिक शिक्षण देणं टाळू नका किंवा पुढे ढकलू नका.
या विषयावर तुम्ही त्यांच्याशी बोलणं फार महत्त्वाचं आहे.
"तुम्हाला वाटतं त्यापेक्षा थोडं लवकरच सुरू करा. अगदी लहान बालकांना पण आपल्या शरीराच्या भागांची माहिती असते, नावं माहिती असतात आणि शरीराचं खाजगीपण जपणं म्हणजे काय हे कळत असतं."
लहान मुलांशी बोलण्यात अनेक गोष्टींचा उल्लेख व्हायला हवा. असे अनेक विषय आहे जे सेक्सशी संबधित आहेत असं पालकांना वाटतही नाही, पण ते महत्त्वाचे असतात. कधी कधी सेक्सबदद्ल बोलण्यापेक्षा नातेसंबंधांबद्दल बोलणं महत्त्वाचं असतं.
"त्यांना सांगायला हवं की अनेकदा नात्यात असताना प्रत्येकवेळी आपल्या मनासारखं घडेलच असं नाही. पण आपण समोरच्या व्यक्तीशी प्रेमाने आणि आदराने वागणं गरजेचं असतं," त्या म्हणतात.
मुळात जर पालकांनी मुलांशी लहान वयापासूनच लैंगिक विषयांवर बोलणं सुरू केलं तर ते पालकांनाही सोप पडतं. मग बोलण्याच्या ओघात हे विषय येतात आणि पालकांना समजावून सांगणं सुकर होतं असं दुसरा एक अभ्यास सांगतो.
मुलांच्या प्रश्नांची सोप्या भाषेत, मोकळेपणाने आणि मुख्य म्हणजे प्रामाणिक उत्तरं दिली तर पुढे येणाऱ्या गुंतागुतींच्या विषयांवर बोलताना दडपण येत नाही.
असं हळूहळू बोलत राहणं, मुलांच्या वाढत्या वयानुसार विषयाचे सोपे ते गुंतागुतींचे असे पैलू उलगडणं लहान मुलांसाठीही फायद्याचं असतं. त्यांनीही आपली ओळख होते, आपण कुठून आलो हे चांगल्या प्रकारे कळतं.
याचं एक उदाहरणही या अभ्यासात दिलं आहे. ज्या मुलांचा जन्म स्पर्म डोनेशनव्दारे झाला आहे, आणि ज्यांच्या आईवडिलांनी त्यांना सुरुवातीपासून ती प्रक्रिया सोप्या शब्दात, पुस्तकांच्या, गोष्टींच्या माध्यमांतून समजावून सांगितली आहे, त्यांना अधिक आत्मविश्वास असतो. या तुलनेत ज्यांना आपल्या जन्माची कथा नंतर कळते, त्यांच्या मनात नकारात्मक भावना बळावतात.
ज्या पालकांना आपल्या मुलांना लैंगिक शिक्षण द्यायचं आहे, पण कसं सांगावं, किंवा कुठून सुरुवात करावी हे कळत नाही त्यांच्यासाठी या काही पद्धती आहेत.
तुम्हाला कशा प्रकारचं लैंगिक शिक्षण दिलं होतं आठवा
गेल्या काही वर्षांत, मी शेकडो सेक्स एज्युकेटर्सच्या मुलाखती घेतल्या. इतर बाबतीत त्यांची मतमतांतर असली तरी एका बाबतीत सगळ्यांचं एकमत होतं - दुसऱ्या कोणाला लैंगिक शिक्षण देण्याआधी तुम्हाला कशा प्रकारचं लैंगिक शिक्षण मिळालं होतं हे आठवा. तुमची लैंगिक शिक्षणाची पातळी कोणती हे तपासा.
अनेक अभ्यास आणि सर्वेक्षणातून हे समोर आलंय की अनेकदा प्रौढांनाही आपलं शरीर आणि सेक्सबद्दल तेवढी माहिती नसते जेवढी असायला हवी.
अनेकदा त्यांच्या समजुती चुकीच्या असू शकतात. बरेच गैरसमज असू शकतात. उदाहरणार्थ जगातल्या लाखो लोकांना वाटतं की एखाद्या महिलेच्या योनीपटलावरून ती व्हर्जिन आहे की नाही हे कळू शकतं. हा गैरसमज आहे, याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही.
पालकांना सेक्सबद्दल कितपत प्राथमिक माहिती आहे याचे स्तर वेगवेगळे असू शकतात. नामिबियात एक अभ्यास झाला होता. त्यात सहभागी झालेल्या पालकांपैकी अनेकांना लक्षात आलं की ते त्यांच्या मुलांशी सेक्सबद्दल बोलत नाहीत कारण त्यांना स्वतःला वाटत होतं की त्यांचं सेक्सबद्दलचं ज्ञान कमी आहे, किंवा जे माहितेय ते त्यांना नीट समजावून सांगता येणार नाही.
याउलट चीनमधल्या जवळपास 2000 पालकांना असं वाटलं की त्यांचं सेक्सबद्दलचं ज्ञान आणि अनुभव चांगले आहेत. पण त्यांना मुलांना कसं वाढवावं आणि त्यांच्याशी कसं बोलावं याबद्दल नीट माहिती नसल्याने ते त्यांच्या मुलांना योग्य रितीने लैंगिक शिक्षण देऊ शकत नव्हते.
नामिबियातल्या अभ्यासात सहभागी झालेल्या पालकांपैकी काही पालकांच्या दृष्टी सेक्स हा विषय निषिद्ध होता आणि जर याबद्दल मुलांशी बोललं तर त्यांना सेक्स करायला उत्तेजन दिल्यासारखं होईल.
अगदी अमेरिकेसकट पुढारलेली राष्ट्र किंवा जगातले इतर देश, सगळीकडेच एक ठाम विचार आढळतो तो म्हणजे जर मुलांशी सेक्सविषयी बोललो, किंवा त्यांना लैंगिक शिक्षण दिलं तर त्यांना लहान वयात सेक्स करण्यासाठी उत्तेजन दिल्यासारखं होईल.
अनेकांना वाटतं की लग्न होत नाही तोवर सेक्स करायचा नाही हेच मुलांना शिकवलं पाहिजे. त्यामुळे तरुण मुलं सुरक्षित राहातील आणि त्यांना कोणते लैंगिक आजार होणार नाहीत.
पण जगभरात या विषयांवर जे अभ्यास केले गेले, त्यातून अगदीच विरुद्ध निष्कर्ष समोर आले. किशोरवयीन मुलांना सेक्स करू नका अस सांगून काही फरक पडला नाही. अमेरिकन अकॅडमी ऑफ पिडिआट्रिक्स या संस्थेच्या मते मुलांना सेक्स करू नका असं सांगून काहीच उपयोग नाही.
उलट मुलांना सर्वांगिण लैंगिक शिक्षण दिलं तर त्यामुळे किशोरवयीन मुलींचं गरोदरपण, लैंगिक रोग यांचं प्रमाण कमी होतं. स्वीडन आणि नेदरलँड्समध्ये हेच आढळून आलेलं आहे.
मुळात जेव्हा पालक, विशेषतः आई आपल्या मुलींशी सुरक्षित लैंगिक संबंध याबद्दल बोलते तेव्हा या मुली पहिला सेक्स अगदी लहान वयात करत नाहीत, आणि जेव्हा करतात तेव्हा सुरक्षित रितीने करतात.
ब्रिटनमध्ये झालेल्या एका अभ्यासात दिसून आलं की वडिलांनीही आपल्या मुलग्यांशी या विषयावर बोललं पाहिजे कारण मुलग्यांना वाटतं की लैंगिक शिक्षणाची गरज मुलींना जास्त आहे.
थोडक्यात काय तर किशोरवयीन मुलांना शिकवलं पाहिजे की पहिल्यांदा (आणि नंतरही) सेक्स करताना काय काळजी घेतली पाहिजे. हे सांगितल्याने ते जास्त सुरक्षित राहातील.
कदाचित लैंगिक शिक्षण किंवा सेक्स एज्युकेशन हे नाव बदलण्याने फायदा होऊ शकतो. फिनलँडमध्ये अभ्यासकांनी सेक्स एज्युकेशन हे नाव बदलून 'बॉडी इमोशन एज्युकेशन' हे नाव ठेवलं. सोप्या शब्दात सांगायचं तर लैंगिक शिक्षण नाही तर 'शरीरभावना शिक्षण.'
यानंतर पालक, लहान मुलांच्या शिक्षकांना विचारलं की या बदललेल्या नावाबद्दल त्यांना काय वाटतं.
बहुसंख्य लोकांनी म्हटलं की हे नवीन नाव 'जास्त तटस्थ, सेक्सचं महत्त्व कमी करणारं आहे'.
या अभ्यासकांनी म्हटलं की लहान वयात लैंगिक शिक्षण देताना मोठ्यांच्या लैंगिक आयुष्याबद्दलचे शब्द न वापरता लहान मुलांना डोळ्यासमोर ठेवून नवीन शब्दयोजना करायला हव्यात. यामुळे लहान मुलांना लैंगिक शिक्षण देताना मोकळेपणाने बोलता येईल.
"लहान मुलांच्या लैंगिकतेसाठी वेगळे शब्द वापरण्यात गैर नाही, यात फसवेगिरी नाही आणि मागासलेपण तर नाहीच नाही. उलट यामुळे प्रौढांनाच कळेल की लहान मुलांचं लैंगिक शिक्षण आणि प्रौढांची लैंगिकता यात खूप फरक आहे. यातून प्रौढांचेही गैरसमज दूर होतील," असं या अभ्यासकांनी म्हटलं.
पण अशा बदलांमध्ये एक धोकाही संभावतो. भारतात झालेल्या एका अभ्यासानुसार लैंगिक शिक्षणाच्या कार्यक्रमाचं नाव 'जीवनशिक्षण कार्यक्रम' असं ठेवल्यामुळे मुळ मुद्द्याला बगल मिळाली आणि मुलांना लैंगिकदृष्ट्या साक्षर करण्याच्या हेतूलाच हरताळ फासला गेला.
त्यामुळे किशोरवयीन मुलांशी त्यांच्या वयात येण्याच्या अनुभवाबद्दल बोलताना, लैंगिक शिक्षणाबद्दल बोलताना वेगळे शब्द किंवा वाक्प्रचार वापरणं यामुळे ते शब्द, किंवा त्या क्रिया लपून करायच्या असतात असा संदेश जाऊ शकतो.
कधी कधी त्या शब्दांबद्दल मुलांच्या मनात शरम उत्पन्न होऊ शकते. हे शब्द मोकळेपणाने बोलताना सहजतेने यायला हवेत.
एकेक पायरी
ज्या पालकांना आपल्या मुलांशी कसं बोलायचं, नक्की कुठून विषयाला सुरुवात करायची हे कळत नाही त्यांनी शाळेतल्या लैंगिक शिक्षण अभ्यासक्रमाची मदत घ्यावी.
यूकेमध्ये 2016 साली झालेल्या एका अभ्यासात पालकांना लहान मुलांच्या शाळेतल्या लैंगिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमाची पुस्तकं दाखवली होती. ही पुस्तकं पाहिल्यानंतर या पालकांचं म्हणणं होतं की त्यांना हा विषय चांगल्या प्रकारे समजला आहे आणि ते मुलांशीही चांगल्या प्रकारे संभाषण करू शकतात.
इव्हा गोल्डफ्रॅब म्हणतात की पालकांनी शाळा सुरू होण्याआधी आपल्या मुलांच्या शाळेत लैंगिक शिक्षण हा विषय शिकवणाऱ्या शिक्षकांना जरूर भेटावं. यामुळे पालकांनाही आपल्या मुलांच्या अभ्यासक्रमात काय आहे हे कळेल.
लैंगिक शिक्षणाबद्दल असलेली आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्वं, युनेस्कोने तथ्यांवर आधारित जारी केलेली लैंगिक शिक्षणाची मार्गदर्शक तत्वं याचाही उपयोग पालक करू शकतात.
ज्या पालकांना आपल्या मुलांच्या वयानुसार त्यांना याविषयी काय शिकवावं हा प्रश्न पडत असेल त्या पालकांसाठी ही मार्गदर्शक तत्वं फार उपयुक्त आहेत.
युनेस्कोच्या गाईडलाईन्स सोप्या, स्पष्ट आहेत. शरीर, त्याबद्दलच्या जाणीवा, नातेसंबध याचा एकेक पैलू उलगडत जातात. उगाच एकच खूप मोठं संभाषण करण्यापेक्षा, संभाषणाची एकेक पायरी चढत जातात.
उदाहरणार्थ 5-8 या वयोगटातल्या मुलांना सांगितलं गेलंय की, "आपल्या शरीराला कोणी, कसा आणि कुठे हात लावावा हे ठरवण्याचा हक्क फक्त त्या व्यक्तीला असतो."
युनेस्कोच्या गाईडमध्ये किशोरवयीन मुलांसाठी सेक्स आणि मानसिक आरोग्याबद्दल चर्चा केलेली आहे. स्वतःची आणि दुसऱ्याची जबाबदारी घेणं म्हणजे काय, इतरांनी, विशेषतः मित्र-मैत्रिणींनी आपल्यावर दडपण आणलं तर त्याला कसं तोंड द्यायचं अशा मुद्द्यांची चर्चा केलेली आहे. त्याबरोबरीने गर्भनिरोधकं कशी वापरायची, काँडोम कसे वापरायचे याबद्दलही माहिती दिली आहे.
लैंगिक शिक्षण देताना एक महत्त्वाचा पैलू सुटून जातो तो म्हणजे आनंद. सेक्सचा आनंद याबद्दल फार कमी वेळा बोललं जातं. एका नव्या सर्वेक्षणानुसार जर सेक्सच्या आनंदाची माहिती असेल तर किशोरवयीन मुलं-मुली, तरूण-तरूणी सुरक्षित सेक्सचा मार्ग अवलंबतात हे दिसून आलं आहे.
त्यांना चांगल्या सवयी लागतात आणि असुरक्षित सेक्स करत नाहीत.
ऑक्सफर्ड विद्यापीठात एक्सपेरिमेंटल सायकोलॉजीमध्ये पीचडी करणाऱ्या तसंच या अभ्यासाच्या अनेक लेखकांपैकी एक मिरेला झानेव्हा म्हणतात, "सुरक्षित सेक्स करा, प्रोटेक्शन वापरा याच्या पलिकडे जाऊन सेक्सच्या आनंदाविषयी बोललं पाहिजे. काँडम वापरण्यात काय गंमत आहे, त्याने तुमच्या पार्टनरला कसा आनंद मिळेल हेही बोलायला हवं."
झानेव्हा यांच्यामते लैंगिक शिक्षणात आनंदाबद्दल कोणीच काहीच बोलत नाही. याचाच अर्थ जर तुमच्या मुलांना तुम्ही सेक्सच्या आनंदाबद्दल सांगत नसाल, तर शाळेतल्या लैंगिक शिक्षणाच्या वर्गातही कोणी सांगत नसेल.
"म्हणजे अनेक किशोरवयीन मुलांना सेक्सच्या सकारात्मक परिणाबद्दल काहीच कळत नाही," त्या म्हणतात.
विश्वासार्ह स्रोत शोधा
मुलांच्या लैंगिक शिक्षणाबद्दल सर्वांत पहिला माहितीचा स्रोत त्यांचे पालक असतात. पण याशिवाय, त्यांचे शिक्षक, त्यांचे मित्र-मैत्रिणी, सिनेमा, सिरीज आणि इतर मनोरंजनाची साधनं यातूनही त्यांना माहिती मिळत असते.
लैंगिक शिक्षणाबद्दल बोलताना फक्त पालकांनाच लाज वाटेल असं नाही. आर्यलंडमध्ये केलेल्या एका अभ्यासात असं दिसून आलं की पूर्वी जरी पालक योग्य माहिती देत नसल्यामुळे किशोरवयीन मुलांना लैंगिक शिक्षण मिळत नव्हतं, आता ती मुलंच स्वतः योग्य माहितीचा स्रोत अडवतात आणि म्हणतात की आम्हाला आधीच सगळं माहिती आहे.
त्यांच्याशी बोलायला गेलात तर ते चिडतात, वैतागतात आणि कधी कधी तिथून निघून जातात.
पण याचा अर्थ असा नाही की पालकांनी याबद्दल बोलायचंच नाही. आपल्या मुलांच्या कलाने संभाषण करायचं.
गोल्डफ्रॅब म्हणतात, "तुमच्या मुलांना आधीच सांगा की तुम्हाला त्यांच्याशी एका नाजूक विषयावर बोलायचं आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा हा विषय काढाल तेव्हा त्यांना खिंडीत गाठल्यासारखं वाटणार नाही. तुम्ही त्यांच्याशी बोलाल तेव्हा तेही तयारी करून येतील."
पालक जेव्हा त्यांच्या अवघडलेपणावर मात करून मुलांना लैंगिक शिक्षण देतात तेव्हा तो अनुभव फारच मुक्त करणारा असतो.
पालकांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की किशोरवयीन, तरूण मुलं त्यांच्या आयुष्याचा प्रवास सुरू करत असतात. या प्रवासात त्यांची मुल्यं, सवयी, प्राथमिकता सगळं ठरणार असतं. त्यांच्या नातेसंबधांचं भविष्य ठरणार असतं. हा विषय फक्त सेक्सपुरता मर्यादित नाहीये. पालकांना आपल्या मुलांच्या या प्रवासात त्यांना मार्गदर्शन करणं, त्यांना बोटाला धरून चालायला शिकवणं नक्की लाजिरवाणं वाटणार नाही.
लेखिका 'लुजिंग इट : सेक्स एज्युकेशन इन व्टेंटीफर्स्ट सेंच्युरी' या पुस्तकाच्या लेखिका आहेत.