बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

गंगा नदीचे जुने फोटो आणि काँग्रेसचे नवे दावे - फॅक्ट चेक

काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर आणि फेसबुक पेजवर गंगा नदीचे काही फोटो शेयर करण्यात आले आहेत. याद्वारे पक्षानं भाजपच्या 'नमामी गंगे योजने'वर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला आहे.
 
गुजरातच्या युवक काँग्रेसनं #DeshKiBhoolKamalKaPhool या हॅशटॅगसह अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट केलं की, 25,000 कोटी रुपयांच्या 'नमामी गंगे प्रोजेक्ट' अंतर्गत गंगा नदी स्वच्छ होण्याऐवजी अधिक प्रदूषित झाली.
 
गुजरात प्रदेश कांग्रेस, मुंबई प्रदेश कांग्रेस सेवा दल आणि गोवा प्रदेश कांग्रेस आणि पक्षाच्या इतर काही अकाऊंटवरून #JaayegaTohModiHi आणि #NamamiGange या हॅशटॅगसह या दोन फोटोंना शेयर करण्यात आलं आहे.
 
जी गंगा भाजपच्या जाहिरातीत दिसते आणि जी गंगा भाजप दाखवू इच्छित नाही, असं दोन्ही फोटोंमध्ये तुलना करताना म्हटलं आहे. पण हे दोन्ही फोटो भाजप सत्तेवर येण्यापूर्वीचे (2014) आहेत, असं पडताळणीनंतर आमच्या लक्षात आलं.
स्वच्छ गंगा, पहिला फोटो
रिव्हर्स इमेजवरून कळतं की, गंगेचा हा फोटो 2012चा आहे, ज्याला नदी घाटापासून दूर अंतरावरून काढण्यात आलं होतं. आंतरराष्ट्रीय स्तरावर फोटो शेयरिंगसाठी प्रसिद्ध वेबसाईट 'पिक्साबे'वर हा फोटो उपलब्ध आहे.
 
'पिक्साबे'नुसार, 'oreotikki' नावाच्या एका यूझरनं 1 फेब्रुवारी 2012ला वाराणसीच्या गंगा घाटावर हा फोटो काढला होता. जून 2017ला पिक्साबेवर हा फोटो अपलोड करण्यात आला होता. फेब्रुवारी 2012मध्ये केंद्रात काँग्रेसची सत्ता होती आणि उत्तर प्रदेशात बसपाची सत्ता होती.
 
अस्वच्छ गंगा, दुसरा फोटो
काँग्रेसने जो फोटो मोदींच्या 'नमामी गंगा प्रोजेक्ट'चा अयशस्वीपणा म्हणून शेयर केला आहे, तो 2011चा आहे. आऊटलूक मॅगझीनचे फोटो एडिटर जितेंद्र गुप्ता यांनी हा फोटो काढला होता. काही दिवसांपूर्वी या फोटोचा वापर भाजपच्या काही नेत्यांनी केला होता.
 
तामिळनाडूमधील भाजपचे सरचिटणीस वनथी श्रीनिवासन यांनी हा फोटो शेयर करत म्हटलं होतं, काँग्रेसच्या काळात (2014) आणि आता भाजपच्या काळात (2019) गंगेच्या स्थितीत खूप बदल दिसत आहेत. भाजप नेत्यांच्या या दाव्याची पडताळणी करण्यासाठी आम्ही जितेंद्र गुप्ता यांच्याशी संपर्क साधला होता.
 
त्यांनी सांगितलं होतं की, 2011मध्ये गंगेच्या परिस्थितीवर फोटो स्टोरी करण्यासाठी ते वाराणसीला गेले होते. हा त्याच सीरिजमधील एक फोटो आहे, जो अनेकदा प्रातिनिधिक फोटो म्हणून बातम्यांमध्ये वापरण्यात आला आहे. प्रियंका गांधी टीम या काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांची अधिकृत टीम अशी ओळख असलेल्या अकाऊटनंही हा फोटो ट्वीट केला आहे.
 
असं नाही की काँग्रेसनं पहिल्यांदाच या 8 वर्षं जुन्या फोटोचा वापर केला आहे. ऑक्टोबर 2018मध्ये छत्तीसगड युवक काँग्रेसनं हा फोटो चुकीच्या दाव्यासहित शेयर केला होता.
 
गंगा स्वच्छतेचा रिअलिटी चेक
2014मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी देशातल्या लोकांना एक आश्वासन दिलं होतं. 2020 पर्यंत गंगा नदी स्वच्छ करू, असं त्यांनी म्हटलं होतं.
 
2015मध्ये भाजपनं त्यासाठी काम सुरू केलं आणि 300 कोटी रुपयांचं बजेट ठेवलं. गंगेमधील प्रदूषण कमी करण्यासाठी सरकार यशस्वी ठरलं आहे, असं डिसेंबरमध्ये वाराणसीतल्या एका सभेत मोदींनी म्हटलं. पण, सरकार या बाबतीत आश्वासन पूर्ण करू शकलं नाही, असा विरोधी पक्षाचा दावा आहे. बीबीसी रिअलिटी चेकनं या दाव्याची पडताळणी केली. तेव्हा लक्षात आलं की, गंगा स्वच्छतेचं काम खूपच धीम्या गतीनं सुरू आहे. यासाठी यापूर्वीही खूप पैसे खर्च करण्यात आले आहेत, पण असं नाही वाटत की, 1568 मैल लांबीची ही नदी 2020पर्यंत पूर्णपणे स्वच्छ होईल.