गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 15 जुलै 2019 (16:14 IST)

200 रुपयांची उधारी देण्यासाठी 'तो' खासदार केनियावरून औरंगाबादला आला

हर्षल आकुडे
 
देश कोणताही असो. सर्वत्र शेतकऱ्याची संस्कृती मातीशी जोडलेली असल्याचं या घटनेवरून दिसून येतं.
 
काशिनाथ मार्तंडराव गवळी. वय 75. औरंगाबादच्या वानखेडेनगरचे रहिवासी. खाली किराणा दुकान आणि वरच्या बाजूला राहण्यासाठी चार मजले, अशा प्रकारचं त्यांचं घर.
 
रविवारी संध्याकाळी सातच्या सुमारास काशिनाथ नेहमीप्रमाणे घरी आले. थोडावेळ बसून हातपाय धुतले. रोजच्या वेळापत्रकानुसार साडेसातच्या सुमारास ते जेवायला बसले.
 
वयानुसार आपलं रात्रीचं जेवण ते लवकरच करतात. काशिनाथ गवळी जेवत असताना मुलगा नंदकुमार याने त्यांना हाक मारली. कुणीतरी आल्याचं त्यानं सांगितलं.
 
काशिनाथ यांनी जेवण पूर्ण करूनच बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. पंधरा ते वीस मिनिटांनी ते पुन्हा खाली दुकानात गेले.
 
पाहतात तर दुकानात एक मध्यमवयीन परदेशी व्यक्ती त्यांची वाट पाहत असल्याचं त्यांना दिसलं.
 
त्या व्यक्तीसोबत एक महिलासुद्धा होती. हे लोक कोण असतील याचा अंदाज घेत दुकानात जाताच ते दोघेही त्यांना पाहून उठून उभे राहिले.
 
काशिनाथ यांना पाहता क्षणीच त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. जवळपास पाच ते सात मिनिटं काहीच न बोलता ते गवळी यांच्यासमोर रडत होते.
 
गवळी यांना त्या व्यक्तीची ओळखच लागत नव्हती. त्यामुळे काय घडतंय हे त्यांना कळतच नव्हतं. पण त्यांना पाहून तेसुद्धा भावनिक झाले.
 
अखेरीस त्या मध्यमवयीन व्यक्तीने आपली ओळख सांगितली. त्यावेळी काशिनाथ गवळी यांना सगळ्या गोष्टी चुटकीसरशी आठवू लागल्या.
 
ही अनोखी कहाणी आहे 1985ची. औरंगाबादमधल्या मौलाना आझाद महाविद्यालयासमोरील वानखेडेनगर परिसरात भरतनगरमध्ये हडकोने वसाहत उभारली होती. त्यामध्ये रहिवाशांना घरंही मिळाली. पण अनेकांनी त्या घरांमध्ये राहण्याऐवजी महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना भाड्यानं घरं दिली. त्यामध्ये परदेशी विद्यार्थीही होते.
 
रिचर्ड न्यागका टोंगी नावाचा एक विद्यार्थीही त्यात होता. रिचर्ड 1985 मध्ये शिक्षणासाठी केनियाहून औरंगाबादमध्ये दाखल झाला होता. वानखेडेनगरमध्ये गवळी यांच्या दुकानाशेजारी तो भाड्याने राहायचा.
 
अनेकवेळा त्याला घरून पैसे लवकर येत नसत. त्यामुळे कधी-कधी त्याला गवळी यांच्या दुकानातून उधारीवर वस्तू घ्याव्या लागत. काशिनाथसुद्धा दूध, ब्रेड, अंडी, रवा, तूप अशा वस्तू फार खळखळ न करता त्याला उधारीवर देत.
 
1989 ला शिक्षण पूर्ण करून रिचर्ड पुन्हा मायदेशी परतले. पण तिथं गेल्यानंतर हिशेब करताना गवळी यांचे 200 रुपये उधारी परत देणं बाकी असल्याचं त्याच्या लक्षात आलं. तेव्हापासूनच रिचर्ड यांना ही सल कायमच बोचत होती.
 
पुढे दिवस पालटले. रिचर्ड यंनी राजकारणात प्रवेश केला. खासदारही झाले. इतक्या मोठ्या पदावर जाऊनसुद्धा गवळी यांच्या 200 रुपयांबाबत त्यांच्या मनात होतंच. ते पैसे दिले नाही तर परमेश्वराला काय तोंड दाखवू, असं ते पत्नीला म्हणत असत. तसंच भारतात जाण्याची संधी मिळण्यासाठी प्रार्थनाही करत असत.
 
30 वर्षांनंतर भारतात
ही संधी रिचर्ड यांना 30 वर्षांनंतर गेल्या आठवड्यात मिळाली. सध्या केनियाच्या संसदेत संरक्षण आणि परराष्ट्र समितीचा उपाध्यक्ष असलेल्या रिचर्ड यांचा भारतात भेट देणाऱ्या शिष्टमंडळात समावेश करण्यात आला.
 
दिल्लीतील काम आटोपून आपल्या डॉक्टर पत्नीसह ते रविवारी दुपारी औरंगाबादमध्ये दाखल झाले. वानखेडेनगरमध्ये येऊन त्यांनी शोधाशोध सुरू केली. हा परिसर पूर्णपणे बदलल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांना फक्त गवळी हेच नाव आठवत होते. त्या नावाचा उच्चारही ते 'गवया' असा करत होते. त्यामुळे लोकांना ते समजण्यास अडचणी येत होत्या.
 
शेवटी त्यांनी ते दुकानात बनियन घालून बसत असं सांगितल्यावर सर्वांना ते कोणाबाबत बोलत आहेत ते कळाले. योगायोगाने काशिनाथ यांचे चुलत भाऊ त्याठिकाणी होते. त्यांनी रिचर्ड यांना काशिनाथ गवळी यांच्या घरी नेले.
 
शेतकऱ्याचा मुलगा
रिचर्ड आणि काशिनाथ यांची भेट म्हणजे एक आनंददायी क्षण होता. काशिनाथ गवळी यांनी रिचर्ड यांना घरात चहापाण्यासाठी नेले. त्यांचा यथोचित सत्कार केला. रिचर्ड खासदार बनल्याचे कळताच काशिनाथ यांनाही अत्यंत आनंद झाला. ते जवळपास तीन तास काशिनाथ गवळी यांच्या घरी होते.
 
यादरम्यान बोलता बोलता रिचर्ड यांनी आपण 200 रुपयांचं देणं लागत असल्याचं सांगितलं.
 
त्यांनी 250 युरो त्यांना देऊ केले. काशिनाथ यांनी ते घेण्यास नकार दिला. तुम्ही भेटायला आलात त्यामुळेच खूप बरं वाटलं, असं काशिनाथ म्हणाले. पण रिचर्ड यांनी काशिनाथ यांना ते पैसे स्वीकारण्यास सांगितलं.
 
रिचर्ड म्हणाले, "वाईट वेळ असताना तुम्ही मला आधार दिला. हे मी कधीच विसरलो नाही. मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. उधारी ठेवून कधीच जगू शकत नाही. तुमचे पैसे दिले नाही तर परमेश्वराला काय म्हणून तोंड दाखवणार ?"
 
रिचर्ड यांनी असं बोलल्यानंतर काशिनाथ यांच्याही डोळ्यात पाणी आलं. मग त्यांनी हसत-हसत पैसे घेतले. यावेळी रिचर्ड यांनी केनियाला येण्याचं निमंत्रण देऊन सर्वांचा निरोप घेतला.
 
अनेक विद्यार्थ्यांना केली मदत
काशिनाथ यांनी आतापर्यंत अनेक गरिब विद्यार्थ्यांना अशा प्रकारे मदत केली आहे. विद्यार्थीही घरून पैसे आल्यानंतर लागलीच त्यांचे पैसे चुकते करत होते. त्यामुळे त्यांच्यात आणि या विद्यार्थ्यांमध्ये एक अनोखं नातं तयार झालं होतं. आजही अनेकजण येऊन त्यांची भेट घेत असतात.
 
काशिनाथ गवळी सांगतात, "हे सगळे विद्यार्थी शिक्षणासाठी लांबच्या गावावरून येत असतात. विद्यार्थ्यांचं दुःख माहित असल्यामुळे मी अॅडजस्ट करत होतो. त्याकाळी आम्हीसुद्धा गरीब असल्यामुळे गरिबांना जमेल तशी मदत करत राहिलो."
 
ते पुढे सांगतात, "अतिथी देवो भवः ही आपली संस्कृती आहे. त्यानुसारच मी आतापर्यंत काम केलं. प्रत्येक विद्यार्थ्याला शक्य असेल त्या प्रकारे मदत केली. या विद्यार्थ्यांमुळेच आमची प्रगती झाली. आम्ही घर बांधलं. हॉटेल सुरू केलं. विद्यार्थ्यांना मदत केल्याच्या पुण्याईमुळेच आजचे चांगले दिवस पाहता आले."