शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: हर्षल आकुडे , सोमवार, 15 जुलै 2019 (10:41 IST)

महाराष्ट्र काँग्रेस बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक गाजवणार?

संगमनेरचे आमदार आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली. कार्याध्यक्ष म्हणून विश्वजीत कदम, नितीन राऊत, बसवराज पाटील, यशोमती ठाकूर आणि मुजफ्फर हुसेन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकूणच प्रादेशिक आणि जातीय समीकरणं साधत या सगळ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 
लोकसभा निवडणुकीत पक्षाचा दारुण पराभव झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर या पदासाठी बाळासाहेब थोरात यांच्यासह पृथ्वीराज चव्हाण, हर्षवर्धन पाटील, विश्वजीत कदम यांच्या नावांची चर्चा होत होती. मात्र काँग्रेस हायकमांडने थोरात यांच्यावर विश्वास दाखवला.
 
2014च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने राज्यात दोन जागांवर विजय मिळवला होता. 2019 मध्ये काँग्रेस पक्ष मुसंडी मारेल असा अंदाज होता, मात्र प्रत्यक्षात उलट घडलं. पक्षाला केवळ एका ठिकाणी यश मिळालं आणि तो उमेदवारसुद्धा शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेला होता.
 
या निवडणुकीतील जागावाटप, उमेदवारांची निवड, प्रचार नियोजन या पातळीवर काँग्रेसमध्ये एकसूत्रता दिसून आली नाही, असं जाणकार सांगतात.
 
यानंतर पद्धतशीरपणे राधाकृष्ण विखे पाटीलही काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले. त्यानंतर इतरही काही आमदार भाजप किंवा सेनेत प्रवेश करतील, अशा चर्चा होत आहेत. अशा स्थितीत राज्यातील काँग्रेसची कमान बाळासाहेब थोरात यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
 
सलग सात टर्म आमदार, मवाळ, अजातशत्रू आणि स्वच्छ प्रतिमा असलेले बाळासाहेब थोरात या पदाची जबाबदारी कशा पद्धतीने सांभाळतात, हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे.
 
बाळासाहेब थोरातच का?
सध्या काँग्रेसकडे बाळासाहेब थोरात वगळता इतर कोणताच मोठा चेहरा नसल्याचं राजकीय अभ्यासक आणि ज्येष्ठ पत्रकार अशोक तुपे यांना वाटतं.
 
"विजय वडेट्टीवार यांना विरोधी पक्षनेतेपद देण्यात आलं आहे. भाई जगताप मुंबईबाहेर पडत नाहीत. हर्षवर्धन पाटील यांना मागच्या वेळी पराभवाचा सामना करावा लागला होता. सध्या फक्त इंदापूरच्या जागेवरून निवडून येऊन आमदार होण्याची त्यांची इच्छा आहे," असं ते सांगतात.
 
"पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यात फार कमी काळ काम केलं. ते कुशल संघटक म्हणून ओळखले जात नाही. त्यामुळे थोरात यांना प्रदेशाध्यक्ष पद देण्याशिवाय काँग्रेसकडे पर्याय नव्हता," असं तुपे सांगतात.
 
राहुल गांधींचे विश्वासू
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघात संगमनेरमध्ये प्रचारसभा घेतली होती. काही कारणामुळे त्यांनी अचानक संगमनेरमध्येच मुक्काम करणं पसंत केलं. यावेळी त्यांनी संगमनेरचे आमदार बाळासाहेब थोरात आणि युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्यासोबत वेळ घालवला.
 
राहुल गांधींच्या संपूर्ण दौऱ्याचे नियोजन थोरात यांनी यशस्वीपणे केलं. मराठमोळ्या पद्धतीनं त्यांनी त्यांचा पाहूणचार केला. नंतर नाशिकला हेलिकॉप्टरमधून जाताना राहुल गांधी यांनी थोरातांना सोबत नेलं. यावेळी राहुल गांधी यांनी थोरात यांच्यासोबत एक फोटो घेत आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तो शेअर केला.
 
या सगळ्या घडामोडींतून बाळासाहेब थोरात आणि राहुल गांधी यांची जवळीक वाढल्याचं दिसून आलं.
 
राहुल गांधींनीही विखे पाटलांना शह देण्यासाठी थोरात यांना बळ देणार असल्याचं दाखवून दिलं. त्याआधीही, गुजरात विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांनी पक्षाचे प्रभारी म्हणून काम केलं. ही जबाबदारी त्यांनी उत्तमरीत्या बजावली. त्यानंतर मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्येही स्क्रुटिनी समितीमध्ये चांगलं काम केलं. त्यानंतर त्यांना राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये कायम निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्त केलं होतं. त्यावेळीच त्यांचं पक्षातलं वजन वाढत असल्याचा स्पष्ट संदेश गेला होता.
 
पवारांशी सौहार्दाचे संबंध
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी थोरात यांची जवळीक असल्याचं अशोक तुपे सांगतात. "आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेससोबत समन्वय राखण्यासाठी त्याची मदत होईल. जागावाटपाचा तिढा, जागांची आदलाबदली, मित्रपक्षातील बंडखोरी रोखण्यासाठी हे महत्त्वाचं ठरेल. थोरात यांनी सहकार क्षेत्रात पवार यांच्यासोबत काम केलं आहे. दोघांनाही एकमेकांबाबत आपुलकी आहे."
 
तुपे पुढे सांगतात, "आघाडीचं राजकारण या दोन्ही नेत्यांच्या निर्णयावर अवलंबून असणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता समीकरणाच्या जवळ जात असतील तर थोरात मुख्यमंत्रिपदाचे दावेदार होण्याची शक्यताही नाकारता येत नाही."
 
वाद, गटबाजीच्या राजकारणात नाही
थोरातांची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागण्याचं आणखी एक कारण म्हणजे त्यांची स्वच्छ प्रतिमा असू शकते.
 
बाळासाहेब आतापर्यंत कधीच वादांमध्ये अडकलेले नाहीत किंवा त्यांनी कधीच स्वतःचा गट तयार करण्याचा प्रयत्न केला नाही. ते कधीच कोणाच्याही राजकारणात हस्तक्षेप करत नाहीत, अशं निरीक्षण तुपे नोंदवतात.
 
"थोरात यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यापासूनच त्यांना निष्ठावान म्हणून ओळखले जाते. शरद पवार काँग्रेसमध्ये असताना त्यांच्या नेतृत्वाखाली मनापासून काम केलं. त्यांनी काँग्रेस सोडल्यानंतरही त्यांनी विलासराव देशमुख, अशोक चव्हाण आणि पुढे पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबतही काम केलं. मंत्री म्हणून काम करत असतानाही ते कुठेही गेल्यास स्थानिक नेत्याला सोबत घेऊन काम करतात. गटबाजीच्या राजकारणात त्यांना स्वारस्य नाही," असं तुपे सांगतात.
 
थोरातांसमोरील आव्हानं
महाराष्ट्राच्या राजकारणात विखे पाटील हे एक जहाल नेते म्हणून ओळखले जातात. पण दुसरीकडे बाळासाहेब थोरात हे एक हळव्या मनाचे मवाळ नेते असल्याचं मत ज्येष्ठ पत्रकार अॅड. डॉ. बाळ बोठे पाटील नोंदवतात.
 
"सध्या सत्ताधारी भाजप-शिवसेना यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुलनेत आक्रमकपणे काम करत आहेत. अशा स्थितीत थोरात यांच्यासारख्या मवाळ नेत्याकडे काँग्रेसची सूत्रे गेल्यामुळे ते कितपत आक्रमक भूमिका घेतील, हा प्रश्नचिन्ह आहे," असं बोठे पाटील यांना वाटतं.
 
"या सर्वांना तोंड द्यायचं असेल तर त्यांना अधिक आक्रमकपणे काम करावं लागेल. नगर जिल्ह्यातल्या 12 विधानसभा मतदारसंघांपैकी केवळ त्यांचीच एक जागा काँगेस-राष्ट्रवादी आघाडीला मिळतील, अशी सध्या स्थिती आहे. फारतर अकोल्याची जागा त्यांना मिळवला येईल. त्यामुळे त्यांनी अधिक आक्रमकपणे काम करणं अपेक्षित आहे."
 
काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर थोरात यांनी असा विश्वास व्यक्त केला की पक्षांतरानंतर रिकाम्या झालेल्या जागी तरुणांना संधी दिली जाईल आणि आगामी मुख्यमंत्री आघाडीचाच असेल. काँग्रेसवर यापूर्वी अनेकदा आघात झाले पण जनतेनं पुन्हा काँग्रेसला संधी दिल्याचं थोरात म्हणाले.
 
मात्र त्यांच्यासाठी ही वाटचाल सोपी नसेल, हे मात्र नक्की.
 
ज्येष्ठ पत्रकार अॅड. डॉ. बाळ बोठे पाटील सांगतात की थोरात यांना रोखण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्नी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांना उभे करण्याची रणनीती आखली जाण्याची शक्यता आहे. असं झाल्यास थोरात मतदारसंघातच अडकून त्यांना ते जड जाऊ शकतं.
 
ते पुढे सांगतात, "सध्या शहरी भागासह ग्रामीण भागातही भाजपची ताकद वाढली आहे. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीत राज्याच्या राजकारणात थोरात यांचा काँग्रेसला किती फायदा होईल, याबाबत शंका आहे."