शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 14 एप्रिल 2021 (21:22 IST)

महाराष्ट्र लॉकडाऊन नियम - तुमच्या मनातील 7 प्रश्न आणि 7 उत्तरं

-ऋजुता लुकतुके
राज्यात पुढच्या पंधरा दिवसांसाठी कडक निर्बंध लागू झाले आहेत. पण, या काळात नेमक्या कुठल्या सेवा सुरू राहणार, कुठल्या बंद राहणार याविषयी तुमच्या मनात अनेक शंका असतील. अशाच निवडक 7 प्रश्नांची ही उत्तरं.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जाहीर म्हणाले की जड मनाने काही कडक निर्बंध पुढच्या पंधरा दिवसांसाठी राज्यभर लागू करावे लागत आहेत. आणि त्यांनी राज्यावर कलम 144 लागू करण्याचा निर्णय जाहीर केला.
 
मुख्यमंत्र्यांनी याला लॉकडाऊन म्हणणं टाळलं आहे. 'ब्रेक द चेन' मोहिमेअंतर्गत पुन्हा कडक निर्बंध असं वर्णन काल त्यांनी केलं. पण, त्यांचं भाषण संपल्या संपल्या सोशल मीडियावर आणि बीबीसीच्या फेसबुक आणि युट्यूब चॅनलवरही सगळ्यांचे धडधडा प्रश्न यायला लागले.
 
कलम 144, संचारबंदी म्हणजे नेमकं काय? आम्हाला कुठल्या कामासाठी बाहेर पडता येईल? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात आहेत. अशाच महत्त्वाच्या 7 प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न इथं करणार आहोत. सगळ्यांत आधी हे कडक निर्बंध कधीपासून कधीपर्यंत लागू आहेत तर, बुधवारी 14 एप्रिलच्या रात्री 8 वाजल्यापासून ते 1 मे ला सकाळी 7 वाजेपर्यंत.
 
या काळात कलम 144 लागू असणार आहे. म्हणजे ढोबळ मानाने राज्यात संचारबंदी आणि जमावबंदी आहे असं म्हणता येईल. भारतीय दंडसंहितेचं कलम 144 हे 1973मध्ये बनवण्यात आलंय आणि राज्याचे किंवा विशिष्ट प्रांताचे प्रशासकीय प्रमुख ते लागू करू शकतात.
 
या कलमानुसार 4 किंवा त्यापेक्षा जास्त लोक या काळात एकत्र येऊ शकत नाहीत किंवा एकत्र संचार करू शकत नाहीत. हा नियम मोडणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो. अत्यावश्यक सेवेतल्या हालचाली यातून वगळण्यात आल्या आहेत.
 
एरवी जातीयवादी दंगली किंवा सामाजिक उद्रेक अशावेळी या कलमाचा वापर होतो. पण, आता आरोग्यविषयक आणीबाणीच्या वेळी दुसऱ्यांदा या कलमाचा वापर होत आहे.
 
नेमक्या कुठल्या सेवा आणि कार्यालयं या निर्बंधांच्या वेळेत सुरू ठेवता येतील याचा सविस्तर आराखडा राज्यसरकारने पत्रक काढून प्रसिद्ध केला आहे. त्यावर आधारित सविस्तर बातमीही बीबीसी मराठीच्या वेबसाईटवर आहेच.
 
पण, त्यानंतरही तुमच्या मनात याविषयी अनेक शंका आहेत. आणि त्या तुम्ही सोशल मीडिया पेजेसवर विचारल्या आहेत. त्यातल्या निवडक प्रश्नांची उत्तरं आता बघूया…
 
1. किराणा मालाची दुकानं, भाजीपाला घेण्यासाठी बाहेर जाऊ शकतो का?
याचं उत्तर खरंतर प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांनीच आपल्या भाषणात दिलंच आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात, 'अत्यावश्यक सेवा आणि अन्न-धान्य तसंच खाद्य पदार्थ पुरवणारी सगळी दुकानं निर्बंधांच्या काळात सुरूच राहतील.'
 
अन्न आणि त्यासाठीचा कच्चा माल यांची दुकानं या काळात उघडीच आहेत. त्यामुळे तुम्हीही गरजेप्रमाणे असा बाजारहाट करण्यासाठी बाहेर जाऊ शकता.
 
मांस, मटन यांचीही दुकानं सुरू राहतील. पण, तुम्ही कंटेनमेंट झोनमध्ये येत असाल किंवा तुमची बिल्डिंग आधीच्या नियमाप्रमाणे पाच पेक्षा जास्त कोरोनाग्रस्त रुग्ण असल्यामुळे सील झाली असेल तर तुमच्या भागातच या वस्तू पोहोचवण्याची सोय पालिका प्रशासनाकडून केली जाईल.
 
पण, तुम्हीही तुमच्याकडून काळजी घ्या. रोज बाहेर न पडता एकाच वेळी काही दिवसांचा किराणा आणि भाजी साठवून ठेवा. बाहेर पडाल तेव्हा मास्क विसरू नका. आणि गर्दीच्या वेळी भाजीपाला घेणंही टाळा. भाजीपाला, किरामा या वस्तूही तुम्ही हल्ली ऑनलाईन मागवू शकता आणि त्याला परवानगी आहे हे विसरू नका.
 
2. घरकाम मदतनीस घरी येऊ शकतील का?
हा सध्याचा मिलियन डॉलर प्रश्न झाला आहे. पण, दुर्दैवाने याचं उत्तर फक्त काही विशिष्ट परिस्थितीतच हो असं आहे.
 
म्हणजे असं की, त्या व्यक्तीला सुरक्षितपणे तुमच्या घरी आणण्याची हमी तुम्ही देणार असाल, म्हणजे व्यक्तीच्या वाहतुकीची 'कोरोनामुक्त' सोय करणार असाल, तुमची सोसायटी त्यासाठी तुम्हाला परवानगी देणार असेल तर आणि तरंच तुम्ही घरकाम करणाऱ्या कुणालाही घरी बोलावू शकता. पण, घरकाम मदतनीस ही काही अत्यावश्यक सेवेत येत नाही याबद्दल सरकारी पत्रकही ठाम आहे.
 
3. टेक अवे/पार्सल घेण्यासाठी बाहेर पडू शकतो का?
याचं उत्तर आहे हो. कुणाच्याही जेवणाची गैरसोय होऊ नये यासाठी अगदी रस्त्यावरच्या फूडव्हेंडर पासून ते हॉटेलनाही पार्सल सेवा सुरू ठेवण्याची परवानगी आहे. बेकरी किंवा चहा स्टॉलही सुरू राहतील. पण, तुम्ही तिथे थांबून हे पदार्थ खाऊ शकणार नाही. तुम्हाला पार्सल घरी आणावं लागेल.
 
4. वैध कारण असेल तर बाहेर पडू शकता, ते वैध कारण कुठलं?
घरात आरोग्यविषयक समस्या असतील, त्यासाठी मदत हवी आहे किंवा तुम्ही करणार असाल तर ते वैध कारण आहे. अत्यावश्यक सेवेशी संबंधित सगळे उद्योग सुरू आहेत, किंवा पावसाळी कामं थांबलेली नाहीत. अशा कामांसाठी तुम्ही बाहेर पडणार असाल तर ते वैध आहे. तुमच्या कंपनीने तुमच्या नेण्या-आणण्याची सोय केली असेल तर अशा कंपन्याही काम करू शकतात. अशावेळी घराबाहेर पडलात तर चालेल.
 
कामाच्या ठिकाणी तुमची राहण्याची सोय केली जात असेल तर असे लोकही काम करू शकतात. पण, लक्षात ठेवा तुम्हाला पोलिसांनी रस्त्यावर हटकलं तर तुम्हाला तुमचं बाहेर पडण्याचं कारण पटवून देता आलं पाहिजे.
 
अत्यावश्यक कामासाठी बाहेर गेल्यास तुम्हाला पोलीस त्रास देणार नाही असं पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी सांगितलं आहे.
 
पांडे म्हणाले, "अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडणाऱ्यांना पोलीस त्रास देणार नाहीत. मात्र, विनाकारण बाहेर पडून नियमांचं उल्लंघन केलं तर, पोलीस कारवाई करतील."
 
"अत्यावश्यक वाहतूकीसाठी पासची गरज नाही. 144 कलम लागू झाल्यानंतर पाचपेक्षा जास्त लोकांनी बाहेर पडू नये. लॉकडाऊन जनतेसाठी आहे," असं संजय पांडे पुढे म्हणाले. त्याचसोबत, कोणी नियमांचं उल्लंघन केल्यास लाठीचा वापर नको, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.
 
5. सार्वजनिक वाहतुकीवरच अवलंबून राहायचं का?
नाही. रिक्षा आणि टॅक्सी सुद्धा या काळात सुरू राहणार आहेत. पण, प्रवास करताना आपल्याला काही नियम पाळायचे आहेत. सार्वजनिक बसेसमध्ये पन्नास टक्के क्षमतेनं आसन व्यवस्था आणि उभं राहून प्रवासाला परवानगी नाही. तर टॅक्सीमध्ये चालक वगळता आणखी दोन जण बसू शकतात. रिक्षातही चालकासह दोन जण बसू शकतात. गरज असेल तरच बाहेर पडायचं आहे.
 
6. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात किंवा राज्यात जाता येईल का?
 
हो. तुम्ही कामानिमित्त हा प्रवास करत असाल आणि कोरोनाचे नियम म्हणजे निगेटिव्ह कोव्हिड रिपोर्ट आणि मास्क, सोशल डिस्टन्सिंग तुम्ही पाळत असाल तर सध्या तरी अशा प्रवासावर निर्बंध नाहीत.
 
तुमच्या पैकी अनेकांनी विचारलंय तुमचं ट्रेन तिकीट काढलेलं आहे, मग तुम्ही जाऊ शकता. पण, त्यासाठी तितकं ठोस कारण असेल तरंच बाहेर पडावं.
 
7. उद्योग, बांधकाम, कार्यालयं सुरू राहणार का?
 
याचं उत्तर तुम्ही कुठल्या उद्योगात काम करता यावर अवलंबून आहे. अन्न, अत्यावश्यक सेवा, आरोग्य अशा सगळ्या उद्योगांना परवानगी आहे. पण, बांधकाम आणि उत्पादन क्षेत्रासाठी काही निर्बंध आहेत. तुमच्या कंपनीला कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची कडेकोट काळजी घेत असल्याचं सिद्ध करावं लागेल. म्हणजे एकतर कर्मचारी एकाच वसाहतीत राहत असले पाहिजेत, तिथून थेट कंपनीत ने-आण करण्याची व्यवस्था कंपनीला करावी लागेल.
 
नाहीतर जिथे जिथे कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीची पूर्ण व्यवस्था कंपनीने घेतली असेल अशा ठिकाणी कंपनी किंवा कार्यालय सुरू ठेवता येईल. बांधकाम क्षेत्रातही जर बांधकामाच्या ठिकाणी मजूरांची पूर्ण सोय होत असेल तर ते सुरू ठेवता येईल. पण, त्यासाठी कर्मचाऱ्यांना किंवा मजुरांना मोकळं बाहेर फिरता येणार नाही.
 
याशिवायही अनेक प्रश्न तुमच्या मनात आहेत. काहींनी विचारलंय दारूची दुकानं सुरू राहतील का? नाही, असं त्याचं उत्तर आहे.