शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 15 जून 2023 (15:40 IST)

विमानात एकदाही न बसता तो जगातल्या प्रत्येक देशात भटकून आलाय

जगातल्या प्रत्येक देशात जायचा तुम्ही विचार केला आहे का?
 
अब्जावधी लोकांपैकी 300 जणांनी हे स्वप्न प्रत्यक्षात साकारलं आहे. तीनजण असे आहेत ज्यांनी प्रत्येक देशाला भेट दिली आहे. दोघेजण तर घरीच परतलेले नाहीत. एकाने विमान प्रवास न करता हे साध्य केलं आहे.
 
माझं नाव तोरबोर्ज पेडरेसन. एखाद्या भटक्यासाठी हे नाव विचित्र आहे. तुम्ही मला थोर म्हणा. वन्स अपॉन अ सागा या वेबसाईटवर त्याने स्वत:ची ओळख अशी करुन दिली.
 
डेन्मार्कचे शास्त्रज्ञ पीट हेइन म्हणाले होते, जग गोल आहे हे समजून घेण्यासाठी जग फिरलं पाहिजे. या विचारांनीच मी प्रेरित आहे.
 
9 वर्षांपूर्वी जगभ्रमंतीसाठी थोर निघाला. सगळे देश पालथे घातल्याशिवाय परतायचं नाही असं त्याने ठरवलं होतं.
 
जगभ्रमंतीला निघण्यापूर्वी त्याने स्वत:साठी काही नियम तयार केले होते.
 
प्रत्येक देशात किमान 24 तास व्यतीत करायचे आणि या भटकंतीसाठी विमानाने प्रवास करायचा नाही. खुश्कीच्या मार्गाने किंवा जलवाहतुकीद्वारे प्रवास करायचा हे त्याने पक्कं केलं होतं.
 
अमुक ठिकाणापासून तमुक ठिकाणापर्यंत जायला गाडी विकत घ्यायची नाही, भाड्यानेही घ्यायची नाही किंवा उसनी कुणाकडून घ्यायची नाही. हा नियम अशासाठी कारण स्थानिक आणि भटक्या मंडळींबरोबर जास्तीतजास्त वेळ व्यतीत करता येईल. जग बघण्याचा हा सर्वोत्तम मार्ग असेल.
 
सगळे देश हिंडायला त्याला 3,512 दिवस लागले. पदभ्रमंती, गाडीने, बसने, बोटीने अशा पद्धतीने त्याने हे देश पालथे घातले. संयुक्त राष्ट्रांकडे नोंदणीकृत अशा 193 देशांपेक्षाही जास्त अशा 203 देशांना त्याने भेट दिली. यामध्ये दोन निरीक्षक देश आणि काही संवेदनशील प्रदेशांचाही समावेश आहे.
 
10 ऑक्टोबर 2013 रोजी त्याच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाला सुरुवात झाली. खरंतर ही भ्रमंती 2018 मध्ये संपणं अपेक्षित होतं पण ती संपायला 5 वर्ष लागली.
 
मे 2023 मध्ये तो मालदीवला पोहोचला. भारतीय महासागरातील बेटरुपी देशानंतर जाण्यासाठीच्या देशांची यादी संपली. बीबीसीशी बोलताना तो थिलाफुशी नावाच्या बेटावर होता.
 
तुझ्या भ्रमंतीमधली सगळ्यांत संस्मरणीय गोष्ट कोणती?
 
खूप साऱ्या गोष्टी. पहिल्यांदा लग्न केलं ते. दुसऱ्यांदा लग्न केलं ते. डोक्यावरुन रॉकेट गेलं तो क्षण. अंतराळात झेपावणारं रॉकेट असं जाताना मी पहिल्यांदाच पाहिलं.
 
कंटेनर शिपचा भाग असताना एका वादळाचा सामना केला तो क्षण विसरु शकणार नाही. व्हेल मासे झेपावत होते. सुदानमध्ये मला एका लग्नाला आमंत्रित करण्यात आलं.
 
तुम्ही पत्नीला कसं भेटलात? ते किती कठीण होतं?
 
जगात फिरत असताना 27 वेळा ती मला भेटायला आली. कोरोना काळात मी हाँगकाँगमध्ये अडकलो होतो. तो काळ सगळ्यांत कठीण होता.
 
हाँगकाँगमध्ये नियम अतिशय कठोर होते. जहाज पकडून मी कुठेही जाऊ शकलो नाही. बहुतांश देशांनी त्यांच्या सीमा बंद करुन घेतल्या होत्या.
 
माझी पत्नी मला भेटायला हाँगकाँगला येऊ शकली नाही कारण आम्ही औपचारिक लग्न केलं नव्हतं. मी हाँगकाँगचा नागरिक नव्हतो. यातून कसा मार्ग काढायचा त्यावर विचार करावा लागला.
 
मी नोकरी मिळवली आणि हाँगकाँगचा तात्पुरता नागरिक झालो. आम्ही उताह इथल्या एजन्सीच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने लग्न केलं.
 
डेन्मार्कमध्ये अशा लग्नाला परवानगी नाही. पण हाँगकाँगमध्ये आहे. लग्नाला परवानगी मिळाल्याने मी कागदपत्रांची पूर्तता केली आणि बायकोला व्हिसा पाठवला. त्यामुळे ती हाँगकाँगला येऊ शकली आणि आम्ही 100 दिवस एकत्र राहिलो.
कोणत्या देशात प्रवेश करताना त्रास झाला?
 
इक्वेटोरिअल ग्युएना. मी या देशात जाता येईल हा विचारच सोडून दिला होता. मी अडचणीत सापडलो होतो. मी 4 ते 5 देशांच्या दूतावासात गेलो. व्हिसा मिळवण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी मला दिलेली वागणूक चांगली नव्हती.
 
मी अनेक देशांमध्ये गेलो, बाहेर पडलो. अनेक चेकपॉइंट्स ठिकाणी गणवेशधारी मंडळींकडून मला त्रास झाला. कोणत्याही देशाची सीमा पार करणे सगळ्यांत कठीण होतं.
 
इक्वेटोरिअल ग्युएना इथे प्रवेश करण्यासाठी मला जवळपास चार महिन्यांचा कालावधी लागला.
 
तिथे जाणं आवश्यकच होतं का?
 
तो माझा 100वा देश होता. त्यामुळे तिथे जाणं माझ्यासाठी एकदम प्रतिष्ठेचं होतं. इक्विटोरिअल ग्युएना हा सुंदर देश आहे. तिथली माणसं अतिशय चांगली आहेत.
 
आपण एखाद्या नव्या ठिकाणी जातो, तिथून काही मानचिन्हं (स्मरणिका) घेऊन येतो. तुम्ही एवढ्या देशांना भेटी देता, तुम्ही घरी काय पाठवता?
 
माझ्या बॅगाबोजांमध्ये जे चालेल तेवढ्याच गोष्टी मी खरेदी करुन पाठवू शकलो.
 
मानचिन्हं वगैरे मी फारसे घेतले नाहीत, कारण मला ते घेऊन प्रवास करावा लागे. जोपर्यंत माझी बायको मला भेटत नाही तोवर मी तिला ते देऊ शकत नव्हतो. तिला ते परत घेऊन जावे लागणार. यामुळे मी फारसं काही खरेदी केलं नाही.
 
पण काही मोजक्या वेळेला मी मानचिन्हं खरेदी केले. लोकांनी मला भेटवस्तू दिल्या. लोकांनी मला भरभरून दिलं.
 
डॅनिश रेडक्रॉस संघटनेचा मी सदिच्छादूत आहे. 190 देशांमध्ये मी रेड़क्रॉसच्या माणसांना भेटलो आहे.
 
ते कॉफी मग देतात. 10 रेड क्रॉसला भेट दिल्यानंतर माझ्याकडे 10 रेडक्रॉस कॉफी कप आहेत.
 
जेव्हा तू डोक्यावरुन विमान उडताना पाहतोस, तेव्हा त्यात बसून गेलं तर विश्वभ्रमंती किती सोपी होईल असं तुला वाटत नाही का?
 
हो, नक्कीच वाटतं. तुम्हाला माहिती नाही की कितीवेळा मी तासनतास चालणारा बस प्रवास केला आहे. त्यावेळी मी निळ्या निरभ्र आकाशात विहरणाऱ्या विमानकडे बघत असे. मी हे काय जगतोय असंही अनेकदा वाटे.
 
माझा एक बसप्रवास 54 तासांचा होता. इतके तास बसून माझी काय अवस्था झाली असेल याची तुम्ही कल्पनाच करु शकत नाही.
 
एवढ्या प्रदीर्घ प्रवासात तुला कंटाळा आला का?
 
अर्थातच. सहा महिने किंवा वर्षभरापेक्षा जास्त काळ प्रवास केलेली खूप माणसं मी पाहिली नाहीत. काही वर्ष प्रवास करणारी माणसं भेटली. पण ते म्हणजे युनिकॉर्नला भेटण्यासारखं आहे.
 
दोन वर्ष मोठा कालावधी आहे. मी असंख्य देशात गेलो. वेगवेगळ्या देशात गेलो, निरनिराळ्या प्रकारचं जेवलो. अनेक वाहतुकीच्या प्रकारातून प्रवास केला. कागदपत्रं, खेटे घालणं सगळं काही केलं. आता मी घरी जायला सज्ज आहे.
 
मला डेन्मार्कला म्हणजे मायदेशी 2015 पासूनच जायचं आहे. पण मी माझ्यासमोर एक उद्दिष्ट ठेवलं होतं. ते आधी कुणीही केलं नाहीये. मूल्यनिहाय मला ते खूपच महत्त्वाचं वाटलं. मी जे करत होतो, करणार होतो ते माझ्यासाठी अतिशय प्रेरणादायी आणि पुरेसं प्रोत्साहन देणारं होतं.
 
ते उद्दिष्ट गाठण्यासाठी मी जीवाचं रान केलं.
 
2019 मध्ये मी खरोखरंच खूप दमलो होतो. फार देश उरले नव्हते. बोट कंपन्यांनी मला सांगितलं की ते मला 10 महिन्यात उरलेल्या देशांना भेट देऊन मायदेशी नेऊ शकतात.
 
पण नंतर कोरोना आला. त्यामुळे माझं सगळं वेळापत्रक कोलमडलं. सगळं काही तीन वर्ष पुढे सरकलं.
 
आता मी घरी जाण्यासाठी तयार आहे.
 
दशकभरापूर्वी डेन्मार्क सोडलं तेव्हा थोरला माहिती नव्हतं की त्याच्या धाडसी मोहिमेचं उद्दिष्ट काय?
 
पण भ्रमंतीदरम्यान त्याला काय साध्य करायचं आहे ते सापडलं. त्याने वेबसाईटवर त्याविषयी लिहिलं आहे.
 
1. हे याआधी कुणीच केलेलं नाहीये
 
नवं काहीतरी करणं नेहमीच उत्साह वाढवणारं असतं. त्यातही आधी कुणीही न केलेली गोष्ट करायला मिळणं दुर्मीळ आहे.
 
2. डॅनिश रेड क्रॉसचा सदिच्छादूत म्हणून मी सगळीकडे गेलो. लाखो लोकांच्या आयुष्यात बदल घडवून आणणाऱ्या स्वयंसेवकांना भेटणं उत्साह वाढवणारं होतं.
 
3. आपल्याला जसं वाटतं तसं जग नाहीये
 
मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमं दहशतवाद, भ्रष्टाचार, नैसर्गिक अपघात, मृत्यू, जहालवादी असं खूप काही दाखवत असतात.
 
मला हे जाणवलं की जग परफेक्ट असं नाहीये. अनेक माणसं आपल्यासारखी आहेत. त्यांच्यासाठी आशादायी आणि अर्थपूर्ण जग आहे.
 
जगात काही देशांसाठी राजाकारण आणि धर्म फार महत्त्वाचे आहेत. पण, माझ्या एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे – कुटुंब, चांगलं जेवण, संगीत, खेळ आणि हवापाण्याच्या गप्पा या पाच गोष्टी सर्वांसाठी फारच महत्त्वाच्या आहेत.
 
प्रत्येक देशाला जगातील सर्वोत्तम देश होण्याची मनीषा आहे.
 
4. कमी पैशातही तुम्ही जग फिरू शकता
 
कमी पैसे असणं कधीतरी तुम्हाला त्रासदायक वाटू शकतं. कधीतरी मला छानसा बेड, अधिक सुखसोयी मिळाव्यात असं वाटे.
 
पणी मी कमी पैशातच फिरायचं ठरवलं होतं आणि त्याचं पालनही केलं. काही लोकांच्या योजना पैसे किंवा वेळ नसेल तर थंडावतात.
 
तुम्हाला वेळ काढावा लागेल. पण माझ्या कहाणीतून तुम्हाला हे समजेल की फिरण्यासाठी तुम्हाला लखपती असण्याची आवश्यकता नाही. तुम्ही अत्यंत कमी पैशात फिरू शकता, वेगवेगळ्या संस्कृती कशा नांदतात ते पाहू शकता. नवे मित्रमैत्रिणी मिळवू शकता.
 
5. थोर याचं कुतुहूल विलक्षण होतं. त्याला जग जाणून घ्यायचं होतं. एक वाक्य त्याच्या प्रवासाचं वैशिष्ट्य म्हणता येईल.
 
अनोळखी माणूस तुमचा मित्र होऊ शकतो, गरज आहे त्याला भेटण्याची, मैत्र वाढवण्याची. उद्या मी कोणाला भेटणार? हा प्रश्न थोरच्या मनात कायम असे.