1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 9 मार्च 2023 (15:19 IST)

आई होण्यास अनेक चिनी महिलांचा नकार, हे आहे कारण..

- सिल्व्हिया चांग
“मुलांचं संगोपन करणं माझ्या आवाक्यात नाही,” असं ग्लोरिया म्हणते. ग्लोरिया विवाहित असून, ती आता तिच्या वयाच्या तिशीत आहे.
 
ग्लोरियानं बाळाचं संगोपन करण्यासाठी किती खर्च येऊ शकतो, याचा अंदाज बांधला असता, तिला लक्षात आलं की, चीनसारख्या देशात इतर सर्व खर्च वगळूनही महिन्याकाठी 2400 डॉलर इतका येईल. म्हणजे, भारतीय रुपयात हीच रक्कम दोन लाखांच्या जवळ जाते.
 
ग्लोरिया पुढे सांगते की, “अन्नासारख्या दैनंदिन खर्चासाठी 3 हजार युआन (436 डॉलर) खर्च असेल. केजीच्या शिक्षणासाठी 200 युआन, पार्ट टाईम चाईल्डकेअरसाठी 1000 युआन आणि शालेय शिक्षणासाठी कमीत कमी 10 हजार युआन लागेल.”
 
दक्षिण चीनमधील गुआंगडोंग प्रांतातल्या प्राथमिक शाळेत ग्लोरिया अर्धवेळ शिक्षिका म्हणून काम करते. यातून तिला महिन्याकाठी सरासरी सहा हजार युआन इतकी रक्कम पगार म्हणून मिळते.
 
चीनच्या वन-चाईल्ड पॉलिसीमुळे ग्लोरिया एकटीच आहे. त्यामुळे कर्जाची परतफेड करणं आणि वयोवृद्ध आई-वडिलांच्या देखभालीसाठी पैसे बचत करणं, याला ग्लोरिया सध्या प्राधान्य देतेय.
 
घटणारी लोकसंख्या
चीन लोकसंख्येच्या बाबतीतल्या बदलाचा अनुभव घेत आहे. गेल्या सहा दशकांच्या तुलनेत चीनमध्ये पहिल्यांदाच लोकसंख्या कमी होत असल्याचं दिसून आलंय.
 
नवीन आकडेवारी तर सांगतेय की, चिनी महिलांना वाटतंय की, एकतर एकच अपत्य असावं किंवा अपत्यच नसावं.
 
चायना पॉप्युलेशन अँड डेव्हलपमेंट रिसर्च सेंटरच्या सर्वेक्षणात असं आढळून आलंय की, अपत्य नसणाऱ्या महिलांची संख्या 2015 मध्ये 6 टक्के होती, हीच संख्या 2020 मध्ये 10 टक्क्यांवर गेली.
 
यावरून असं लक्षात येतं की, प्रजननक्षम महिलांना अपत्यांची संख्या कमी हवी आहे. 2021 मध्ये ही संख्या सरासरी 1.64 होती. 2017 मध्ये हीच संख्या 1.76 होती.
 
सिंगापूर, जपान आणि दक्षिण कोरियासारख्या इतर आशियाई देशांमध्येही प्रजनन क्षमतेचा दर दोनच्या खाली आहे. अनेकांना वाटतं की, आणखी दोन मुलांची इच्छा आहे. मात्र, चीनमध्ये हा प्रश्नच उद्भवत नाही.
 
“याचा अर्थ चीनमध्ये केवळ प्रजनन क्षमता कमी आहे असं नव्हते, तर प्रजननाची इच्छा देखील कमी आहे,” असं डॉ. शुआंग चेन म्हणतात. डॉ. चेन हे लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समध्ये इंटरनॅशनल सोशल अँड पब्लिक पॉलिसीचे सहाय्यक प्राध्यापक आहेत.
 
चीननं 4 मार्चपासून राजकीय बैठक सुरू केल्या आहेत. यात राजकीय सल्लागारांनी जन्मदर वाढवण्याबाबत विविध प्रस्ताव सादर केले आहेत. अविवाहित महिलांना स्त्रीबीज गोठवण्यास मदत करण्यासोबतच केजीपासून महाविद्यालयापर्यंतचे शिक्षण आणि पाठ्यपुस्तकांचे शुल्क माफ करणे अशा सूचनांचा समावेश आहे.
 
दुसरी कल्पना अशी मांडण्यात आलीय की, अविवाहित पालकांच्या अपत्यांना समान अधिकार देणं. चीनमध्ये, अविवाहित पालकांच्या पोटी जन्मलेल्या मुलांना शिक्षण, आरोग्य सेवा आणि सामाजिक कल्याणासाठी आवश्यक असलेली अधिकृत घरगुती नोंदणी ‘हुकू’ (Hukou) मिळवताना असंख्य अडचणी येतात. तसंच, प्रशासकीय शुल्कही जास्त असू शकतं.
जीवघेणी स्पर्धा
चीनमधील महिला बाळ जन्माला घालण्यास नकार देत आहे त्याचं कारण म्हणजे मुलांच्या संगोपनासाठी लागणारा अवाढव्य खर्च.
 
चीनमध्ये बाळ जन्मताच एका भयंकर स्पर्धेला सुरुवात होते. मुलाला चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देणं, शाळेच्या जवळच घर खरेदी करणं इथपासून शाळाबाह्य इतर कौशल्य विकासाच्या गोष्टी मुलांना उपलब्ध करूण देणं. पालकांची यासाठी अक्षरश: धावपळ आणि स्पर्धा असते.
 
“मला वाटत नाही की, एक नवीन जीवाला या अत्यंत जीवघेण्या स्पर्धेच्या वातावरणात आणावं,” असं 22 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थी असलेली मिया म्हणते.
 
चीनच्या उत्तरेकडील छोट्याशा गावात जन्मलेल्या मियाला वाटतं, तिचं सगळं आयुष्य परीक्षांभोवतीच गेलंय.
 
चीनमध्ये ‘गाओकाओ’ (Gaokao) म्हणून ओळखली जाणारी अत्यंत कठीण आणि उच्च दर्जाची परीक्षा दिली आमि बीजिंगमधील प्रतिष्ठित विद्यापीठात शिक्षण घेतलं. मात्र, तरीही मियाला वाटतं की, मी बराच वेळ तणावातच असते.
 
मियाच्या मते, परदेशात शिक्षण घेण्याची साधनं ज्यांच्याकडे आहे, त्यांच्याशी पदवीधरांनी स्पर्धा केली पाहिजे.
 
“अधिकच्या शिक्षणासाठी पैशांची गरज असते,” असं मिया म्हणते. तसंच, तिला असंही वाटतं की, इतकं तर कमावणं कठीण आहे की, तिच्या मुलांना हे सगळं शिक्षण देऊ शकेल.
 
“जर मी माझ्या मुलांना हे सगळं देऊ शकत नसेल, तर त्यांना या जगात आणावंच का?” असं प्रश्न मिया विचारते.
 
काम आणि दैनंदिन आयुष्यातील समतोल
बीबीसी चायनिजन मुलाखत घेतलेल्या महिलेनंही हेच सांगितलं की, अपत्य जन्माला न घालण्यामागचं कारण माझ्या करिअरवर या सगळ्याचा नकारात्मक परिणाम होईल.
 
ही महिला सांगते की, नोकरीसाठीच्या मुलाखतीत विचारलं गेलं होतं की, तुम्ही पुढच्या काही वर्षात बाळ जन्माला घालण्याचं नियोजन करत आहात का? जर या प्रश्नाचं उत्तर ‘होय’ असेल तर नोकरी मिळण्याची शक्यता कमी होत असे किंवा प्रमोशन मिळणं कठीण होत असे.
 
“उच्च शिक्षण घेणाऱ्या चिनी महिला बाळाला जन्म देण्याआधी त्यांचं दैनंदिन आयुष्य आणि काम यांच्यातील समतोलाचा अधिक विचार करतात,” असं डॉ. युन झोऊ बीबीसीशी बोलताना म्हणाल्या. त्या मिशिगन विद्यापीठात समाजशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापिका आहेत.
 
“काम हे त्यांच्यासाठी आत्मानुभूतीसारखं आहे. लैंगिक भेदभावानं भरलेल्या नोकऱ्यांच्या वातावरणात करिअर की बाळाला जन्म देणं यातली निवड करणं फार कठीण आहे,” असंही त्या म्हणतात.
 
‘बाळाला जन्म देणार नाही म्हटल्यावर मला ऑनलाईन ट्रोल केलं गेलं’
मियानं तिला बाळ जन्माला का घालायचं नाहीय, याबाबत व्हीडिओ रेकॉर्ड करूनसोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर तिला त्या पोस्टखाली भयंकररित्या ट्रोल करण्यात आलं. शेकडो आक्षेपार्ह कमेंट्स त्या व्हीडिओखाली आल्या.
 
अनेकांनी तिला स्वार्थी म्हटलं. काहीजण म्हणाले, ती तिच्या वयाच्या विशीत असल्यानं तिला अजून अक्कल आली नाहीय.
 
एका युजरनं लिहिलंय की, “हे बोलण्यासाठी आवश्यक परिपक्वता अद्याप तुझ्यात आली नाहीय, तू तुझ्या वयाच्या चाळीशीत असशील तेव्हा असं बोलून दाखव.”
 
“मी 10 हजार डॉलरची पैज लावतो की, तू या निर्णयानं पश्चाताप करशील,” असं आणखी एका युजरनं म्हटलंय.
 
काहींनी तर तिला ‘परदेशी शक्ती’ म्हटलं, जीइथल्या लोकांना मूल जन्माला न घालण्यासाठी उद्य्युक्त करतेय.
 
2020 मध्ये चीनमधील महिलांनी केवळ एक कोटी 20 लाख बाळांना जन्म दिला. 1961 नंतर पहिल्यांदाच ही संख्या सर्वात कमी होती. त्यामुळे मे 2021 मध्ये चीन सरकारने थ्री-चाईल्ड पॉलिसी आणली.
 
बाळ जन्माला घालावं, या उद्देशाला प्रोत्साहन देण्यासाठी चिनी सरकारनं गेल्या काही वर्षात अनेक नवीन धोरणं आखली. बाळ जन्माला न घालण्याचा निर्णय घेऊन महिला देशाला खाली खेचतायेत, असं काहींचं म्हणणं आहे.
 
मिया म्हणते की, “ही माझी वैयक्तिक निवड आहे. कुणीच बाळ जन्माला घालूच नये, असं माझं म्हणणं नाहीय. ज्यांना मुलं हवी आहेत, त्यांच्या मताचा मी आदर करते.”
 
‘मला लढाई लढावी लागली’
मुलं होण्याच्या कौटुंबिक अपेक्षांना आव्हान देणं कठीण आहे.
 
34 वर्षीय युआन झ्युपिंग म्हणतात, “मी मोठी लढाई लढली. एका ग्रामीण भागात जन्मलेल्या आणि वाढलेल्या, जिथे कुटुंबाला वंशाचा दिवा हवा म्हणून मुलाला जन्म देणं स्त्रीचं कर्तव्य मानलं जातं, तिथल्या माझ्यासारख्या महिलेनं बाळंतपणाला नाही म्हणण्यासाठी मोठा संघर्ष केलाय.
 
“माझे वडील काय म्हणायचे की, मुलींनी कॉलेजात जाऊन काय करायचंय? कारण शेवटी लग्न झाल्यावर मुलींना घरी राहून मुलाबाळांचं संगोपनच करायचं आहे.”
 
युआनच्याच वयाच्या तिच्या काकीचा घटस्फोट झाला, तेव्हा त्यांना दोन मुलं होती आणि त्यांच्या संगोपनाची जबाबदारी त्यांच्यावरच येऊन पडली होती. या सगळ्यांनं त्या अधिकच निराशेच्या गर्तेत गेल्या.
 
युआन गाव सोडून आता शहरात राहते. तिचं स्वातंत्र्य उपभोगते. ती म्हणते, “मला लग्नसंस्थेवर अजिबात विश्वास उरला नाहीय.”
 
“मी माझ्या फावल्या वेळात वाचन करते आणि मित्र-मैत्रिणींसोबत फिरायला जाते. मला मोकळं वाटतं,” असं युआन म्हणते.
 
(या वृत्तांकनासाठी लारा ओवेन यांनीही मदत केलीय.)