गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 21 फेब्रुवारी 2022 (22:50 IST)

शिवसेना विरुद्ध नारायण राणे संघर्ष भाजपच्या फायद्याचा की शिवसेनेच्या?

"बाहेरचे लोक येऊन आम्हाला त्रास देतात. महाराष्ट्र आमच्या बापाचा आहे. शालेय शिक्षणात मराठी भाषा सक्तीची केली याविरोधात कोर्टात याचिका दाखल करणारे किरीट सोमय्याच होते," असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली होती.
 
15 फेब्रुवारी रोजी संजय राऊत यांनी आपल्या पत्रकार परिषदेत सातत्याने शिवसेनेच्या नेत्यांवर आरोप करणाऱ्या किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला. यावेळी शिवसेनेने मराठी विरुद्ध अमराठी वादाचा मुद्दा उपस्थित केला.
 
या पत्रकार परिषदेनंतर दुसऱ्याच दिवशी भाजपकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर टीका केली.
 
मुंबईसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या वक्तव्याकडे पाहिलं जात आहे. किरीट सोमय्या यांच्यासोबत नारायण राणे यांना मैदानात उतरवण्याची ही राजकीय खेळी असल्याचं काही राजकीय विश्लेषक सांगतात.
 
याचे नेमके राजकीय अर्थ काय आहेत? ठाकरे कुटुंबाविरोधात बोलण्याची एकही संधी न सोडणारे राणे भाजपसाठी अधिक फायद्याचे आहेत का? आणि राणेंविरोधात टोकाची भूमिका घेणाऱ्या शिवसेनेलाही याचा राजकीय फायदा होतोय का? याचा आढावा आपण घेणार आहोत.
 
अमराठी प्रतिमा भाजपसाठी धोक्याची?
आगामी महापालिका निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. आरोप-प्रत्यारोपांचे फड रंगू लागलेत. गेल्या काही महिन्यांपासून माध्यमांसमोर सतत दिसणाऱ्या किरीट सोमय्यांसोबत आता नारायण राणेंनीही पुन्हा ठाकरे कुटुंबावर आरोप करण्यास सुरुवात केली आहे.
किरीट सोमय्या यांना प्रत्युत्तर देताना संजय राऊत म्हणाले, "शिवसेना हा केवळ पक्ष नसून महाराष्ट्र आहे. सबंध महाराष्ट्राने ही पत्रकार परिषद ऐकावी. कुणीही येतो आणि महाराष्ट्राची बदनामी करतो. महाराष्ट्र आता हे सहन करणार नाही.
 
"तो अन्यायाविरोधात लढेल. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंश आहोत हे दाखवून देऊ. महाराष्ट्र आमच्या बापाचा आहे." असं म्हणत संजय राऊत यांनी किरीट सोमय्या हे अमराठी आहेत आणि महाराष्ट्रात राहून मराठी माणसावर निशाणा साधतात हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला.
 
मुंबई महापालिका निवडणुकांकडे पाहता भाजपसाठी किरीट सोमय्या यांची अमराठी प्रतिमा फायद्याची नाही असं काही राजकीय विश्लेषक सांगतात.
 
ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक अभय देशपांडे म्हणाले, "भाजपसाठी नक्कीच मराठी विरुद्ध गुजराती अशी प्रतिमा घातक आहे आणि ते याची काळजी घेणार. म्हणूनच नारायण राणे, आशिष शेलार, अतुल भातखळकर अशा नेत्यांकडे बोलण्याची जबाबदारी दिली आहे."
 
शिवसेनेने किरीट सोमय्या यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना ते कसे मराठी विरोधी आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते.
 
म्हणूनच मराठी विरुद्ध अमराठी आणि राज्य विरुद्ध केंद्रीय तपास यंत्रणा अशा अर्थाने टीका केली जाते असंही ते म्हणाले.
शिवाय, नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांचा जुना वाद, कोकणात शिवसेनेला आव्हान देण्यासाठी नारायण राणेंचे राजकारण, मंत्री आणि मुख्यमंत्री पदाचा अनुभव अशी बरीच कारणं नारायण राणेंच्या बाबतीत भाजपच्या फायद्याची आहेत आणि याच आधारावर राणेंना केंद्रात मंत्रिपद सुद्धा मिळालं.
 
"2017 मध्ये पार पडलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला पोलरायझेशनचा फटका बसला होता. त्यामुळे यावेळी भाजपकडून याची काळजी निश्चित घेतली जाईल. मराठी आणि अमराठी वादामुळेच दहिसर ते वांद्रे या संपूर्ण पट्ट्यात भाजपला जागा जिंकता आल्या नव्हत्या. त्यामुळे निवडणुकांमध्ये मुंबईसाठी केवळ किरीट सोमय्या भाजपचा चेहरा म्हणून समोर येणं त्यांच्या फायद्याचं नाही याची कल्पना त्यांनाही आहे," असंही अभय देशपांडे सांगतात.
 
राणेंनी नुकत्याच एका पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा मुंबईत दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणाचा उल्लेख केला. यावरूनही त्यांनी ठाकरे कुटुंबाला लक्ष्य केलं. मुंबई महापालिकेची निवडणूक ही शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची आहे आणि युती तुटल्यानंतर भाजपसाठीही ती आव्हानात्मक आहे.
 
ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानीवडेकर म्हणाल्या, "शिवसेना आणि ठाकरे कुटुंबावर आरोप करू शकणाऱ्या सर्व नेत्यांना भाजप बोलण्याची संधी देणार आणि ते आरोप करत राहणार. सत्ताधाऱ्यांच्या वर्तनाबद्दल आक्षेप निर्माण करणं हा सध्या भाजपचा मुख्य उद्देश दिसतो."
त्या पुढे सांगतात, "हे आरोप भाजप पक्ष म्हणून थेट करत नसले तरी वेगवेगळ्या नेत्यांच्या माध्यमातून असे आरोप केले जातात. म्हणून नारायण राणे भाजपच्या फायद्याचे आहेत. किरीट सोमय्या अमराठी आहेत म्हणून राणे सोयीचे आहेत असं मला तरी वाटत नाही. भाजपचे हे दोन्ही नेते सतत शिवसेनेवर जहरी टीका करत आले आहेत आणि भाजपला ते हवं आहे."
 
"हे खरं आहे की शिवसेनेचे विरोधक म्हणूनच नारायण राणेंचं पक्षात स्थान आहे. युती होती तेव्हा नारायण राणेंना भाजपमध्ये प्रवेश दिला नव्हता हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. जसजशा निवडणुका जवळ येतील तसं जितक्या तोंडांनी टीका करता येईल तितकं विरोधक करत राहणार ही रणनीती सध्या दिसते,"
 
शिवसेनेलाही राणेंचा फायदा?
किरीट सोमय्या यांच्या पाठोपाठ नारायण राणे यांनीही पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर जहरी टीका केली. यानंतर शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महानगरपालिकेकडून राणेंच्या मुंबईतील निवासस्थानी नोटीस पाठवण्यात आली.
 
21 फेब्रुवारीला मुंबई महापालिका पथकाने राणे यांच्या मुंबईतल्या जुहू इथल्या बंगल्याची पाहणी केली.
 
नारायण राणे यांनी शनिवारी (19 फेब्रुवारी) पत्रकार परिषद घेऊन अनधिकृत बांधकाम प्रकरणी करण्यात येत असलेल्या आरोपांबाबत स्पष्टीकरण दिलं होतं. या इमारतीचे आर्किटेक्ट हे नामांकित आहेत. 13-14 वर्षे बांधकामाला झाली आहेत. त्यानंतर एक इंचही बांधकाम केलं नसल्याचं स्पष्टीकरण राणेंनी दिलं.
 
शिवसेना विरुद्ध नारायण राणे हा संघर्ष महाराष्ट्रासाठी नवीन नाही. आगामी काळात हा वाद टोकाला जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
 
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने नारायण राणे मुख्यमंत्री झाले आणि उद्धव ठाकरे यांच्याशी जमलं नाही म्हणून बाळासाहेबांच्या उपस्थितीतच राणेंनी शिवसेना सोडली असा राग शिवसैनिकांमध्ये आहे.
 
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नारायण राणे यांनी सातत्याने शिवसेना आणि ठाकरे कुटुंबावर घणाघाती टीका केली आहे. त्यामुळे हा संघर्ष केवळ 'मातोश्री' विरुद्ध राणे असा नसून राणे विरुद्ध शिवसैनिक असा आहे. कारण नारायण राणे हा विषय शिवसैनिकांसाठी केवळ राजकीय नसून भावनिक आहे.
 
नारायण राणे यांनी बाळासाहेब ठाकरेंना सोडलं हे शिवसैनिकांना आवडत नाही. पक्ष सोडल्यावरही ज्याप्रमाणे राणेंनी कायम ठाकरे कुटुंबाला लक्ष्य केलं यामुळेही शिवसैनिकांमध्ये रोष आहे असं राजकीय विश्लेषक सांगतात.
 
ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान सांगतात, "राणे बोलतात तेव्हा शिवसैनिक आक्रमक होतात हे स्पष्ट आहे. नारायण राणे उभे राहतात तेव्हा राणेंनी बाळासाहेबांशी गद्दारी केली असं शिवसेना सांगते आणि शिवसैनिक त्यांच्या विरोधात उभे राहतात. यामुळे संघटनात्मक बळ आणखी वाढतं. राज्यभरात त्याचे पडसाद दिसतात."
 
"महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेनंतर नारायण राणेंचं महत्त्व वाढलं. राणे दीर्घकाळ शिवसेनेत राहिले आहेत. राणेंचा मुळात राजकीय संघर्षच उद्धव ठाकरेंसोबतचा आहे. आता केंद्रीय मंत्री करुन भाजपने त्यांना आणखी ताकद दिली आहे. ही ताकद देण्यामागचा हेतूच हा आहे की राणेंनी निवडणुकांवेळी टीका करावी, शिवसेनेला लक्ष्य करावं. एकीकडे किरीट सोमय्या बोलतील, दुसरीकडे नारायण राणेही बोलतील,"
नारायण राणे यांचा कायम मुंबईशी संबंध राहिला आहे. राणेंनी अनेक वर्षे मुंबईत राजकारण केलं आहे आणि जवळून अनुभवलं आहे. शिवसेनेच्या जुन्या नेत्यांशी त्यांचे संबंध आहेत, अनेकांना त्यांनी वैयक्तिक मदत केली आहे असंही प्रधान सांगतात.
 
"भाजपला या कारणांसाठी त्यांचा फायदा होऊ शकतो. पण शिवसेना या परिस्थितीला अनुकूल कसं करून घेण्याचा प्रयत्न करणार हे पक्षावर अवलंबून आहे. राणे बोलले की शिवसैनिकांना बाळासाहेंबांसोबत केलेलं बंड आठवतं आणि शिवसैनिक पेटून उठवतात. याचा फायदा शिवसेनेलाही होऊ शकतो,"
 
आगामी महापालिका निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. दावे-प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोप यापुढे आणखी तीव्र होतील असंही चित्र आहे.
 
"भाजपसाठी मुंबईत आशिष शेलार यांच्यासह आता नारायण राणे हा सुद्धा एक मराठी चेहरा आहे. किरीट सोमय्या आणि राणे या दोन्ही नेत्यांकडे पाहणारा वेगवेगळा मतदार आहे. वेगवेगळ्या अर्थाने राणेंकडे शक्ती आहे. आर्थिक ताकद, मनगट शक्ती आहे, मराठी चेहरा त्यामुळे शिवसेनेही प्रत्युत्तर देताना आक्रमक असेल," असंही संदीप प्रधान म्हणाले.